....अधिकस्य अधिकं फलम ...धोंडा झाला बरं का :)
सूर म्हणतो साथ दे, दिवा म्हणतो वात दे
शपु (शरद पुराणिक) मात्र म्हणतो
फ़क्त आणि फ़क्त प्रेमाची सावली दे
....अधिकस्य अधिकं फलम ...धोंडा झाला बरं का :)
सध्या अधिकमास सुरू आहे ..आणि विविध ठिकाणी विविध रुपात तो साजरा होत आहे. धार्मिक, कौटुंबिक आणि पारमार्थिक असे अनंत सोहळे होताना दिसतंय. या महिन्यात प्रत्येक जावई हा खुष असतो. विष्णु ची उपासना हे या महिन्याचे विशेषत्व आहे. जावयाला महत्व का ? लेक जावयाला लक्ष्मीनारायण जोडा असं संबोधन आणि धारना आहे, म्हणून जावयाला विष्णुरूपात दान केल्याने प्रत्यक्ष विष्णु ला दान केल्याचे पुण्य मिळते.
मी जसं नेहेमीच प्रत्येक सणवार आणि त्यात कालानुरूप होणारे बदल या विषयी कायम लिहितो. तसंच या ही बाबतीत झालंय. यालाही खूप भव्यदिव्य स्वरूप आलंय त्याविषयी फार जास्त न लिहिता, मुख्य विषयाकडे वळतो.
तर झालं असं दोन महिण्यापूर्वी म्हणजे 17 मे रोजी लग्नाच्या वाढदिवशी संजू (हा माझ्या बायकोचा मामे भाऊ...संजय वैद्य-पालकर) चा फोन आला होता आणि त्याच दिवशी त्याने अधिकमासाचं आमंत्रण देऊ केलं. लगेच हो म्हणुन टाकलं आणि बघता बघता तो दिवस येऊन ठेपला. खरंतर शनिवारीच पोचण्याचा बेत होता पण कार्यालयीन जबाबदारी असल्याने ते शक्य झालं नाही...एक क्षण असाही आला की जाणं होईल की नाही? पण दैवी इच्छा आणि संजूचं मनःपूर्वक आमंत्रण जिंकलं आणि खाजगी वाहनातून रात्री उशिरा पोचलो. पुणे ते संभाजीनगर अंतर 5 ते 6 तास, त्यात इकडे रिपरीप सुरू ...पोचायला खुप उशीर होता, तेंव्हा वाटेतच जरा जठराग्नी शांत करुन (पावभाजी खाऊन) मध्यरात्री पोचलो. बहिणीकडे मुक्काम करून, सकाळी न्याहारी आटोपून इप्सितस्थळी पोचलो.
समोर गुरुमाऊली नुकतेच आसनस्थ होऊन त्यांची पाद्यपूजा सुरू होणारच होती. मंत्र म्हणणार होतो पण वेशभूषा साजेसी नसल्याने ते टाळलं अन कार्यक्रमाचा निखळ आनंद घेत बसलो, फोटो काढणे, आलेल्या पाहुण्यासोबत गप्पा असं सुरू होतं. साधारणपणे 300 च्या वर लोक प्रसादासाठी निमंत्रित होते त्यात अनेक नातेवाईक ही होते. साग्रसंगीत गुरुपुजन, गुरुमंत्र, वायनदान, आभूषणे, बत्तासे, अनारसे, करंजी, धोंडे असे अनंत पदार्थ तिथे येत होते. आदरणीय गुरू माऊली ने ते फ़क्त स्पर्श करुन सर्वांना खाण्यासाठी देऊन टाकले. गुरुचरणी अर्पण करण्यासाठी विविध वस्तु आल्या, 33 मेव्हण भोजन संकल्प झाला आणि भोजनाच्या पंगती सूरु झाल्या. हा हा म्हणता चार, पाच अशा त्या वाढत गेल्या. सुंदर आणि नेटका तो मंडप, चेहऱ्यावर आनंदलहरी असा तो मस्त माहोल असा काही बहरला. त्याच आनंदात पाऊस ही भिजवुन गेला.
खरंतर दिवसभर आणि त्या अगोदर झालेली दगदग यांनी सर्व खरंतर थकले होते...पण संध्याकाळ होताच पुन्हा चैतन्यमय झाला तो माहोल. एक मोठा गठ्ठा समोर आला आणि संजू त्यासमोर ठाण मांडुन बसला, आणि कसल्यातरी चिठ्ठ्या लिहीत होता ....नंतर कळलं की एकाच pattern च्या विविधरंगी साड्या आहेत आणि त्यावरुन काही चर्चा नको म्हणुन चक्क सोडत काढूली ....काय भन्नाट कल्पना... त्या सोबत अनेक गमती जमती अन सुरू झाला तो मुख्य सोहळा ज्यासाठी आम्ही गेलो होतो ....औक्षवणाचा प्रथम मान मिळवुन (हे अहंकाराने नाही तर आनंदाने) आम्ही बसलो, औक्षवण झाले, वायनदान घेतले, सोडतीत मिळालेली साडी आणि इतरवस्तू चे दान घेऊन स्थानापन्न झालो. एका मागोमाग स्वाती, प्रतीक्षा, नम्रता या हिच्या बहिणी यांचेही असेच आणि त्याच आनंदाने सोपस्कार झाले. नंतर आमच्या सर्व सासू, सासऱ्यांचे , जे नाहीत त्यांच्या उत्तरार्धी सदस्यांना ही ते दान झालं....खरंतर दुपारीच एवढया पंगती झाल्यानंतर ही नव्या जोमाने पुन्हा मेजवानी ची तयारी...मानलं राव या परिवाराला, प्रत्येक सदस्याला. दोनीही मामी, मोठया मामी, सुरेश मामा, संजू-रेणुका, सचिन-मोहिनी, आशिष-अस्मिता, अमोल-नीता, अभिजित-श्रद्धा, उलकेश ...आमचे मेहुणे अनंत जोशी याचाही वेगळा असा हा कार्यक्रम करायचा खुपच आग्रह होता, पण वेळेमुळे ते शक्य झाले नाही...पण पुन्हा तो करू असं आश्वासित करून त्याची समजूत काढली...चला जाऊन कपडे घेऊ असाही आर्जव त्याने केला...त्याने ही गुरुचरणी भारी वस्त्र अर्पण केली. या वेळी विशेष कौतुक होतं ती काल परवा पर्यंत फ़क्त दंगा करणारे छोटे आणि छोट्या राबत होते आणि आनंदाने पडेल ते काम करत यात सिंहाचा वाटा उचलला. तन्वी, तेजस, आदित्य, तन्मय, मार्विका, शमिका, पार्थ, सानिका, सार्थीका, रुद्र...यांनी बहार आणली .. काय राव पोरांनो तुम्हींतर कमालच केलीत ... हे असते एका पिढीने दुसऱ्या पिढीला दिलेले संस्कार ..... या साऱ्याला शोभा आणण्यासाठी जे हजर होते .. दुपारी 300 आणि संध्याकाळी 50 ते 60 जण ......म्हणूनच देवाला मागणं, हे प्रेम असंच सतत उधळत असु दे जे मी नाचत अंगावर घेऊन त्या रंगात न्हाऊन निघेल ...
खरं तर सोनं हिऱ्या मोती पेक्षाही अमूल्य असा माणसांचा ठेवा भेट मिळालेला असताना बाकी साऱ्या भेटी या पुढं फिक्या पडतात, आणि हे प्रेम अन ऋणानुबंधच उजळत राहतात हे खरं...
या साऱ्यांचे आभार कसे मानू ...आपण भले अन आपला संसार भला अश्या आजच्या या युगात हे असे सोहळे घडतात अन त्यात आपण केंद्रबिंदु असतो याचा आनंद न सांगण्या पलीकडचा... हे भाग्य माझ्या अर्धांगिनी, सहचारिणी, आणि बरंच काही अशी सौ अनिता मुळे माझ्या पदरी पडलं ...
...माझ्या बसची वेळ कधी झाली कळलंच नाही ...गाडीत ते क्षण कुरवाळत निघालो ....
सोबत अनेक फोटो जोडत आहे, जे याची आठवण आणि साक्ष म्हणून सतत सोबतीला असतील ...
शरद पुराणिक
230723
Comments