माझी चिऊ ताई गेली कुठे ??

 माझी चिऊ ताई गेली कुठे ??


एक घास चिऊ ताईचा

रोजच्या जेवणातली  ताई गेली कुठे 

माझं ताट कोरडं पडलंय ग ताई 

गोष्टीतली चिऊ ताई गेली कुठे

चिमणे चिमणे दार उघड ..मी साद घालतो

पण तीच आता म्हणते तू दार उघड

जाळीदार खिडक्या, सज्जे मोकळे कर

तुझ्या आसपासच्या इमारतीची भीती वाटते

त्यावर उभ्या त्या तारांची भीती वाटते 

तसं तडफडून मारण्यापेक्षा मी येतच नाही...

उंच इमारतींनि घरटी माझी उद्धवस्त केली

माझा आधार असलेली झाडं तोडली 

तान्हुल्या बाळांना घेऊन मी जाऊ कुठे

...माझी चिऊ ताई गेली कुठे ...

पण आज ही आहेत तिचे काही सगे

ठेवतात पाणी भरुन वाडगे, भांडी 

त्यांना आवर्जून भेटतेस की नाही 

का तिथेही दशक्रियेसारखी वाट पहावी

तू येशील, दोन घोट पाणी घेशील

ते समाधान तरी देशील की नाही ग ताई

गुलेर मारता उडणारा तुझा थवा गेला कुठे

सकाळचा मधुर चिवचिवाट ही गेला कुठे

...माझी चिऊ ताई गेली कुठे.. 

एकदा ये तुला चित्रात बंदिस्त करतो

तुझी चिवचिव ही साठवून घेतो 

पुढच्या पिढीला ओळख व्हावी म्हणून...

ये, ये येना ग चिऊताई ...


शरद पुराणिक

जागतिक चिमणी दिवस

200323

Comments

Popular posts from this blog

ओढ लावती अशी जीवाला गावाकडची होळी

गौरी गणपती