माझा केश कर्तन प्रवास ...जगण्याचे बदलते रंग
माझा केश कर्तन प्रवास ...जगण्याचे बदलते रंग
आयुष्य जगताना तुम्ही अनेक मित्र, मैत्रिणी, सगे, सोयरे, आप्त, इष्ट अशा ऋणानुबंधाच्या वेटोळ्यात गुंडाळलेले असता...याच सभोवताली अजून काही धागे सतत समोर येतात आणि त्या वेटोळ्यात गुंफली जातात... ती म्हणजे तुमचा इस्त्रीवाला, पानवाला, किराणा दुकानदार, काही वेळा औषधीवाले, भाजीवाले, कोपऱ्यावरचा चहावाला, नेहेमीचा रिक्षावाला आणि कोण कोण....
काल रविवार होता म्हणून सकाळीच शरद ला फोन केला, हो त्याचं नाव ही शरद आहे. नेहेमीप्रमाणे तो व्यस्त होताच, हातात एक काम आहे ते झालं की तुम्हाला फोन करतो म्हणून फोन ठेवला. जरावेळ त्याच्या फोन ची वाट पाहुन मी चालत तिथे गेलो तर एक मोठी ऑर्डर सुरूच होती, कटिंग, दाढी, रंगरंगोटी, आणि facial ...मग मी बाहेर खुर्चीवर बसून होतो. बसल्या बसल्या लहानपणी पासून आजपर्यंत चा केश कर्तन प्रवास डोळ्यासमोर येत गेला....
आम्ही एकत्र कुटुंबात राहायचो अगदी चुलत, आत्ये, मावस अशी 20 एक टाळकी एकाच बिऱ्हाडी नांदायची. सर्व वयोगट होते आणि रविवार हा आमचा सखाराम दिवस होता. सखाराम म्हणजे आमची अगदी कॉलेजात येऊ पर्यंत कटिंग करणारा एक कौटुंबिक सदस्य म्हणा हवं तर. आमच्या 26 खणी माळवदाच्याया वाड्यात समोर एक बैठक होती आणि तिला लागुन एक लादनी होती. त्या लादणीत आमची कटिंग ची आरामखुर्ची - म्हणजे एक गोणपाट गोल गुंडाळून ठेवलेला असायचा. सखाराम त्याची चौकोनी आकाराची चामडी पिशवी घेऊन आला की स्वतःच ते पोतं अंथरायचा , मग त्या पिशवीतून एक काळी वाटी, चामडी पट्टा आणि वस्तरा काढून सज्ज व्हायचा. इकडे आमचे सर्व उघडे बंब सैनिक पहले आप, पहले आप करत साधारण छोट्या कडून सुरुवात व्हायची. त्या अगोदर तो एकदा त्या पट्टीवर वस्तरा लाऊन घेताना जो आवाज यायचा आणि त्याची ती लकब फार आकर्षित करायची.
समोर सखाराम आणि आपण, वाटीतून पाण्याच्या दोन बोटाने तो डोक्याला ओलं करून आपलं डोकं त्याच्या मांडीत घेऊन काहीही न विचारता चमन गोटा करून सोडून देत होता. तो वर तिकडे बंब त्याच्या धुरातुन सांगत राहायचा मी तापलोय ..तांब्याच्या गंगाळात ते गरम पाणी आणि आधण घेऊन लहानांना आमची मोठी बहीण ओंबाळूण काढायची तर मोठे स्वतः घ्यायचे. दरम्यान सखाराम चा चहा घरातून यायचा मधल्या वेळेत संख्या जास्त असेल तर दाराबाहेर जाऊन बिडी फुंकून यायचा. जमलेले केस एका कागदात भरून तो गोणपाट गोल गुंडाळुन दुसरा चहा घेऊन सखाराम पुढच्या लढाई ला निघे. ज्येष्ठ मंडळी साठी दाढी, कटिंग असा वेगळा कार्यक्रम दुसऱ्या रविवारी.
आता बरीच मंडळी कॉलेजकुमार झाल्याने इथे बंडाळी झाली आणि काहीजण चौकातल्या आरसा, खुर्ची आणि काचेच्या बाटलीला पम्प लावलेले, भिंतीवर मिथून, बच्चन, जितेंद्र, अशी पोस्टकार्ड चित्रे चिटकवलेली अशा टपरीवजा सलून मध्ये जाऊ लागली.
मी काहीवर्षं अंबाजोगाई ला गेलो तिथेही बस स्टँड समोर आजूबाजूची दुकाने पाहून झाली... नंतर नोकरीनिमित्त औरंगाबाद ला आलो. मी जिथे राहायचो त्याच इमारतीच्या भागात छडीदार च्या रुपात एक सखाराम भेटला आणि अनेक वर्षे तो सहवास घडला. दरम्यानच्या काळात भव्यदिव्य असे सलून येऊ लागले आणि मग काही वेळा हौस म्हणून तिकडे जायचो, अक्षयदीप प्लाझा इथे राजू नावाचा एक gym आणि saloon असे दोनीही कार्य करणारा मित्र मिळाला...कधी अवडतीकडे तर कधी नावडतीकडे असा हा प्रवास सुरु राहिला.
2004 साली पुण्यात आलो अन इथे शरद भेटला, दरम्यान केस तुरळक होत जातं होते, कपाळ मोठं दिसू लागलं पण ते व्यवस्थित बसवण्यात शरद चा सिंहाचा वाटा आहे... त्याची ती पद्धत इतकी आवडली की अगदी 2021 पर्यंत मी सतत त्याच्याकडूनच तो आनंद घेतला. त्याच्याकडे माझ्यासारखे अनंत सगे आहेत त्यामुळे त्याचा वेळ मिळणे ही एक अडचण असते, त्यात तुम्हींजर नियोजन न करता गेलात तर तुम्हाला ताठकळत बसावे लागते... पण काम फत्ते, कुठेही चूक नाही, उलट न सांगता दोन गोष्टी करतो. मी इहवर्षं french दाढी ठेवतोय, पण ती जेवढी व्यवस्थित शरद करतो ते आजवर कोणालाही शक्य झालं नाही. आज मुलं ही तिथेच जातात, ज्यांनी सखाराम नाही अनुभवला ते अगदी Jr. KG पासुन इथेच जात आहेत.
मधल्या काळात हैदराबाद ला होतो पण मी कटिंग पुण्यातच करायचो. पण गेल्या वर्षी सैदापुर कर्नाटक ला जावे लागले, दोन तीन आठवडे येणं व्हायचं नाही, पण तिथेही एक मित्र केला होता..एक मात्र होतं इथे अगदी अर्ध्याच किमतीत तेच काम व्हायचं अन वरती जरा साहेबी थाट होता तो निराळाच.
अनेक स्थित्यंतरे झाली गोणपाट ते unisex सलून पण आज ही आत त्याची जागा आत खोलवर ज्याने कोरुन ठेवलीये तो सखाराम .. पण त्याला जगवत ठेवणारी आमची शरद सारखी मंडळी आणि यासम सर्व धाग्यांना गोंजारून थांबतो...
शरद पुराणिक
160423
Comments