अधिकमास - क्षण भाग्याचा साक्षात भगवान श्री विष्णु दर्शनाचा






 अधिकमास - क्षण भाग्याचा साक्षात भगवान श्री विष्णु दर्शनाचा


उजळलें भाग्य आतां । अवघी चिंता वारली 

संतदर्शनें हा लाभ । पद्मनाभ जोडला 

संपुष्ट हे हृदयपेटी । करूनि पोटीं सांठवूं 

तुका म्हणे होता ठेवा । तो या भावा सांपडला 


काही घटना, प्रसंग इतके भारावून टाकतात की तुम्ही स्वतःचे राहत नाहीत. ती अनुभूती घेण्यासाठी एकरूप, एकचित्त झालं की आपोआप मिळते. परवा 8 तारखेला असंच झालं. अधिकमास नैमित्तिक गुरूपूजन, अपुपदान सोहळा आम्ही अनुभवला. गेले एक दोन महिने चर्चा, फोन, व्हाट्सअप्प मेसेज असं करत करत तो क्षण आला.  आता अधिकमास य विषयी फार उहापोह न करता पुढे जातो. 


दानेन भूतानि वशी भवन्ति दानेन वैराण्यपि यान्ति नाशम् ।

परोऽपि बन्धुत्वभुपैति दानैर् दानं हि सर्वेव्यसनानि हन्ति ॥


पण आपण कोण गुरूला दान देणार, जे त्यांचंच आहे, किंबहुना ते त्यांच्या कृपाशीर्वादाने प्राप्त झालेलं आहे. पण या व्यावसायिक आणि स्पर्धात्मक युगात या गोष्टी जरी मागे राहत असतील तरी ज्यांना ज्यांना अनूभव आहे त्यांनी तो आठवुन पहावा... एखाद्या गरजवंताला मदत केल्यानंतर जे आत्मिक समाधान आपण प्राप्त करतो ती भावना फक्त तसे कार्य केले तर आणि तरंच मिळते.  पुन्हा असाही प्रघात किंवा ते सत्यही आहे दान हे गुप्त असावं, त्याची चर्चा भांडवल न करता, इस हाथ दो और ऊस हाथ लो अशा अपेक्षा न ठेवता ते देऊन विसरायचं. त्याचं फळ कुठल्या रुपात, कुठल्या क्षणात ते तुम्हाला फिरून आशिर्वाद म्हणून मिळेल हे सांगता येत नाही.


मी जसा उल्लेख केलेला आहे, की जे त्यांचंच आहे ते त्यांच्यापर्यंत पोचावं या साठी हा सोहळा ठरला. पण खरंच सांगतो कुठलंही आग्रहाचं निमंत्रण नाही, घरोघरीं जाऊन आमंत्रण न देता सश्रद्ध शिष्य परिवार उपस्थित राहिला. खरं तर तसा मंगळवार, कामाचा दिवस पण सर्व बाजूला ठेऊन 600 लोक एकत्र, ते ही पुण्यासारख्या मोठया शहरात...पण त्यांच भाग्य होतं ज्यांना येणं झालं. काही खुप तयारी करून ही येऊ शकले नाहीत ती तुमची अडचण गुरू समजुन घेतील. 


आदरणीय, सत्र सोमयाजी दीक्षित रंगनाथ सेलूकर महाराज यांनी एक मंत्र दिला आहे 


ज्ञानयुक्त भक्तीयुक्त कर्मवीर व्हा

पराक्रमी पुरुषार्थी धर्मविर व्हा 


त्या युक्ती प्रमाणे जगलं तर आयुष्य संपूर्ण संतुलित होईल. तीच प्रेरणा घेऊन, आमचे बहू सोमयाजी, यज्ञ मार्तंड श्री यज्ञेश्वर महाराज ही सर्व जात पात भेदून अग्निसेवा आणि त्या माध्यमातून यज्ञीय कार्यातून सर्वार्थाने विश्वकल्याण ही एकमेव भावना सोबत घेऊन ...अग्नीची निस्पृह निस्वार्थ अगाध सेवा सुरू ठेवली आहे... सोबतच प्रतिवार्षिक पार्थिव शिवपूजन ही शतकाहून अधिक काळ अव्याहतपणे सुरूच ठेवली.  त्यांच्या या दिव्यत्वात तेज वाढवणाऱ्या आदरणीय मायबाई मिनाक्षीदेवी यांचा ही सहभाग आहेच.  


या सर्व तेजोवलयात न्हाउन आणि त्या कार्यानी प्राप्त झालेली प्रसन्नता, शांती आणि समाधान असं सर्व एकत्रित असलेल्या त्या तेजोमूर्ती सातव हॉल येथे अवतरल्या आणि तो परिसर असा काही दनानुन गेला - यज्ञ नारायण भगवान की जय हा जयघोष, ढोलताशांच्या गजरातून प्रतिध्वनीत होणारे कौतूक, आनंद आणि जल्लोष. समोर लाल गर्द उंची महावस्त्र, आभूषणे परिधान करून, प्रसन्न प्रफुल्लित महिला मंडळ, मंगलमय लहरींच्या साक्षीने औक्षवण सोबत सर्व वेद मूर्ती खणखणीत मंत्रघोष करत स्वागत केलं.  तसं तसं त्या वास्तूंत एक वेगळंच चैतन्य उर्जित होत होतं. 


समोर आपण एखादी भव्यदिव्य पुजा मांडतो तसं तीस फुट भव्य व्यासपीठ, त्यावर कर्दळीवनात आहोत अशी कर्दळी ची पाण, केळीचे खांब, फुलं हार अशी सजावट. मधोमध विठ्ठल रुक्मिणीच्या सुबक पितळेच्या भव्य मूर्ती, समोर त्याच आकाराच्या समया, दोन आसन ..ज्या क्षणी महाराज आणि मायबाई यांचं आगमन झालं त्या क्षणी तो परिसर असा काही उजळला की विचारू नका. 


प्रथम विष्णूला विष्णू सहस्रनाम स्तोत्राने तुलसीर्चन झाले, आणि ती विट्ठल रुक्मिणी ची मूर्ती प्रत्येक आवर्तनाने  खुलत जात होती. मी तिथेच सेवा देत होतो त्यामुळे जवळुन तो क्षण टिपण्याच भाग्य मला लाभलं.  जमलेले सर्व मंडळी, वेद मूर्ती, अश्या सर्वांचा एकत्र सहस्रनामाचा तो मंत्रघोष म्हणजे पर्वणीच. नंतर यथासांग पाद्यपूजा, वायनदान, आणि तुळशीच्या भरजरीत हारांनी महाराज मायबाई असे काही सजले की क्षणात हात जोडले गेले, पापण्या लवल्या आणि एक संपूर्ण दर्शन घेतलं. 

लगेच श्री सूक्त हवन (100 कुंड) 250 लोक एकत्र हवनाला बसले आणि त्या तेजात अग्निदेवांनी उपस्थिती लावली.  


आता वेळ होती धोंडे दान, वायनदानाची, सर्वांचा एकत्रित संकल्प होऊन दान देण्यासाठी झुंबड उडाली आणि दोन तास तो सोहळा चालला. 


 30+3 = 33 असं दानाच महत्व... पण इथे 33 जोडपी (मेव्हन) एकाच वेळी भोजनास बसतील अशी व्यवस्था. प्रत्येकाला एक पाट चौरंग, समोर सुबक रांगोळी, फुलं, मध्यभागी एक सुंदर समई, तिच्याभोवती फुलांची आरास. अशा चार रांगा आणि त्या मधोमध गुरुमाऊली आणि मायबाई यांची व्यवस्था. इथेही उत्कृष्ट रांगोळी आणि सजावट.  पुढे जे काही दिसलं आणि अनुभवलं ते मात्र विलक्षण होतं. अगदी महाभारत, रामायण, विष्णुपुरान, शिवपुरान जगतोय की काय असं.... ते लक्ष्मी नारायण आसनस्थ झाले, समोर सपत्नीक शुचिर्भूत, धोतरावर आणि उंची महावस्त्रात बसलेली जोडपी.. सोवळ्यात वाढणारी मंडळी आणि ती दिव्य पंगत सुरू झाली. माझ्याकडे सूत्रसंचालन होतं, पण तरीही एकदा जाऊन पाहु म्हणुन गेलो अन ते दृष्य पाहून मी स्तब्ध झालो ... मी त्या क्षणी प्रत्यक्ष विष्णुदर्शन घेतलं ....अजूनही ते भाव चित्र नेत्रपटलावर स्थिरावल आहे.... माझ्याकडे शब्द नाहीत पण काही चित्र आहेत, पण त्या पलीकडे जाणारी ती अनुभूती होती. पंचपक्वान्न भोजन, श्लोक अशी ती भोजनावळ म्हणजे माझ्या या जन्मी मी अनुभवलेला एक दिव्य साक्षात्कार होता, आहे. 


अजूनही गुरुबंधूं येतंच होते, त्यांचे संकल्प, दान आणि महाप्रसाद असा तो कार्यक्रम उत्तरार्धाकडे निघाला... पण तो संपूच नये असं वाटत असतानाच पून्हा "यज्ञ नारायण भगवान की जय" घोष कानावर पडला आणि महाराज, मायबाई त्या मंगलमय वास्तुतून निघुन पुढच्या नियोजनासाठी मार्गस्थ झाले ....स्वप्नवत वाटावं असे ते काही तास सिनेमाची फीत पळावी असे पळत गेले....मी मात्र त्या प्रत्येक कोपऱ्यात अनुभवत होतो तो दिव्यत्वाचा साक्षात्कार.   


म्हणूनच मी म्हणतो  " अधिकमास - क्षण भाग्याचा साक्षात भगवान श्री विष्णु दर्शनाचा"

खरंतर गेली दोन तीन आठवडे रोज नवीन शहर, नवीन कार्यक्रम, प्रवास याच गतीने सर्वत्र पण त्याचा कुठलाही ताण चेहऱ्यावर नाही.... खाण्याच्या वेळा नाहीत की क्षणभर विश्रांती नाही....दानात आलेल्या वस्तू ही चालत नाहीत कारण ते अग्निहोत्री...आलेले सर्व अनारसे, पेढे इत्यादि तिथेच ठेऊन फ़क्त आणि फ़क्त शिष्यांना तो लाभ देण्यासाठी किती कष्ट ते...पण तक्रार नाही.  आता लगेच श्रावणमास पार्थिव शिवपूजन सुरू ....त्याचा लेखा जोखा घेऊन पुन्हा एक अनुभूती घेउन येतो...तो वर...."यज्ञ नारायण भगवान की जय"


या सर्व नियोजनात सहभागी प्रत्येकाचे आभार न मानता त्या प्रेमाचा आणि मदतीचा ऋणी राहतो, ते असंच साठवुन अनंत सोहळे आपल्याला करायचे आहेत त्या साठी. 


शरद पुराणिक

120823

Comments

Popular posts from this blog

ओढ लावती अशी जीवाला गावाकडची होळी

गौरी गणपती