मुशाफिरी - मनोरंजनाची साग्रसंगीत मेजवानी अन चोखंदळ रसिकांची तृप्ती

 मुशाफिरी - मनोरंजनाची साग्रसंगीत मेजवानी अन चोखंदळ रसिकांची तृप्ती


रोजच्या त्या घड्याळाच्या चक्रव्यूहातुन कशी बशी सुटका करून घेत माझी गाडी  भरधाव निघाली होती चाकण ते कोथरूड दिशेने. गाड्यांचे किचकट वेटोळे अन मुंग्यांची रांग असावी या प्रकारे वाहने, त्यात माझी घालमेल होती ती केंव्हा एकदा पोचतो या साठी. कारण ही तसंच होतं - मुशाफिरी या कार्यक्रमाची आवर्जुन तिकिटं online विकत घेऊन ठेवली होती. कार्यक्रम 9 चा होता, आणि 8.30 ला मी अजून रस्त्यावर गाडी हाकत की ढकलत पण चाललो होतो. माझी भाची सुस्मिरता डवाळकर ही याचा गायिका म्हणून भाग होती. अनायासे शुक्रवार ही होता ...पण आज शनिवारीही ऑफिस होतेच त्यामुळे त्याचं काही कौतुक नव्हतं पण निदान हा कार्यक्रम तरी पाहून जरासा आनंद घ्यावा ही सुप्त इच्छा.  असे विचाराचे जाळे डोक्याभोवती घोंघावत आणि आडव्या येणाऱ्या गाड्यांना माझं न ऐकु जाणारं स्फूट अर्पण करत , 9 वा घरी पोचलो. 


"मी वाऱ्याच्या वेगानं आलो" या अविर्भावात घरात, फटाफट तयार होत दुचाकी काढली अन जोडी "भरत नाट्य मंदिर" ला पोचली. आधीचा प्रयोग उशिरा संपल्याने आता आम्ही वेळेत पोचलो. आसन ग्रहण केलं अन कार्यक्रम सुरू होण्याची प्रतीक्षा संपली. पडदा सरकला आणि एक हटके, अद्भुत "मुशाफिरी" सुरू झाली. अगदी नेटकाच पण संयुक्तिक पणे रचना केलेला देखणा रंगमंच नजरेस पडला.  गोड गळ्याची अन सुंदर  गायकांच त्रिकूट रंगमंचावर अवतरले ....सजलेले आणि मुरलेले आवाज, स्वरताल लयीत हरकती घेत  एक अप्रतिम नाट्यसंगीतआविष्कार सादर झाला ....अचानक दिवे मालवले अन दोन प्रेक्षकांत जरासी शाब्दिक चकमक ऐकू आली .. प्रेक्षक गोंधळलेले असतानाच चित्रगुप्त बोलले आणि सभागृहात  साक्षात आदरणीय भाई, पु लं अवतरले आणि कार्यक्रम एका वेगळ्याच विश्वात घेऊन गेले.   


पुलं आहेत म्हणजे त्यांनी अजरामर केलेली पात्र त्यांना काय असंच सोडतील काय ..  लगोलग अंतु शेठ आले आणि त्यांची जुगलबंदी सुरू झाली...मग काय अंतु शेठ नी आग्रह केला ते साकार झालं...अगदी लोकगीत, भारुड, भावगीत.. सारं काही. 


नंतर सखाराम गटणे ही आले त्यांनी मग साक्षात सद्गुरू स्थानी ठेवलेल्या पु लं ना प्रेमळ विनवनी केली आणि एक सुंदर कथाकथन एका वेगळ्या रुपात सादर झाली.  त्यांनी ती कथा अक्षरशः जिवंत केली.  त्यानंतर हरितात्या अवतरले आणि देशप्रेमाने स्फुरलेल्या त्यांच्या शैलीत एका पोवाड्याची मागणी केली ....आहा शाहीराने त्याच्या त्या खड्या आवाजात पोवाडा सुरू केला, सोबतीला ढोलकी, हार्मोनियम, बासरी हे ही असे काही एकत्र निनादले अन काही क्षण को होईना महाराज अन त्यांची स्वराज्यवेडात आयुष्य वेचलेले मावळे ही अवतरले अन रोमांच रोमांच शहारले.... पहिला वन्समोर मिळाला.


रावसाहेब तरी कसे मागे राहणार, भाई असे साक्षात रंगमंचावर अन सोबत ही पात्रे, एक अद्वितीय अनुभुती .. रावसाहेबांनी त्यांच्या कानडी खाक्यात दोन चार हासडून फर्माईश केली मग काय गीत संगीताची अशी काही मैफल  बहरली की शरीर अंतरर्बाह्य थिरकू लागली .. ढोलकी, तबला, बासरी, synthesizer, पेटी, मध्येच मृदंग अन भरजरी आवाजात गीत सादर होऊ लागली. त्याला पुढे मागे भाईंचे ते खास शैलीतील वर्णन ....पंचपक्वान्न ही फिके पडावीत अशी मेजवानी.


पेस्तन काका ही आलेच लगोलग, त्यांच्या त्या लडिवाळ विनंतीवरून बतावणी ची मागणी केली, अन एक झक्कास ताजी बतावणी अतिशय मनोरंजन आणि वैविध्यपूर्ण शैलीत सादर झाली... नाथा ही आला अन त्याच्या आवडीचा नृत्याविष्कार सादर झाला...


गटणे पुन्हा आलेच आणि काव्य ऐकण्याची इच्छा बोलुन दाखवली, भाईंनी ती लगेच मान्य केली आणि गदिमा ही त्यांच्या शब्दरूपात अवतरले त्या रंगमंचावर.  


तळीराम चा एक नाट्यप्रवेश, तर सहलीची अभिनयांकित कथा ही सादर झाली ..  तुमच्या थाळीत खूप पदार्थ आणि सर्वच चविष्ट असतील तर कुठला खाऊ अन कुठला नको अशी होणारी अवस्था होती.. 


भावगीत आणि भक्तीगीत यांनी सांगता होत होती आणि कधीही संपायला नको, किंवा या मैफिलीत भैरवी नको म्हणुन आर्जव करणाऱ्या मनाची समजुत घालत त्या सर्व गुणी तरुण तडफदार रंगकर्मी कलाकार, वाद्यवृंद, निवेदक, आयोजक, प्रायोजक, मार्गदर्शक असे त्या पंचतारांकित थाळीतील सर्व पदार्थ एकसंघ अवतरले आणि शेवटी ..  पुन्हा नव्याने काहीतरी अजून अजून देण्याच आश्वासित करत पु लं नि त्यांच्या खास शैलीत तो अल्पविराम घेतला... 


ज्या ज्या शहरात ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी आवर्जुन हा आयोजित करा, ऐका अन तुमचेही अनूभव सांगा .. टांगा पलटी घोडे फरार, काटा किर्रर्र, तोडलंत मित्रानो ..  


जय हो .....

शरद पुराणिक

150723

Comments

Popular posts from this blog

ओढ लावती अशी जीवाला गावाकडची होळी

गौरी गणपती