भाग तिसरा !! श्री यज्ञेशो विजयते !! श्रावनमास शिवपुजन, पुणे
भाग तिसरा !! श्री यज्ञेशो विजयते !!
दिवस अजून अर्ध्यावरच होता ...अन मी लिहता लिहिता थांबलो ....चला पुढे जाऊ .....
श्रावनमास शिवपुजन, पुणे
भरगच्च व्यासपीठ जणु महाभारत, रामायणातील काही प्रसंग आठवावेत किंवा तेच दुसऱ्या रूपांत आपल्या नेत्रपटलावर आणि आपण ही कुठल्यातरी मिथिला नगरी, अयोध्या तत्सम एका ऐतिहासिक वास्तूत हे अनुभवतोय ही भावना ...काय तो प्रसंग. यज्ञ संस्था टिकुन राहावी या साठी संबंध आयुष्यच त्यासाठी वेचून यज्ञ नारायण सेवा अखंड तेवत ठेवत त्यांचं तेज अधिकाधिक तेजोमय करण्याचा जो मानस यज्ञ आदरणीय महाराजानी अव्याहत सुरू ठेवला ...त्याची थोरवी, महत्व आणि कौतूक ऐकताना मी अक्षरशः भारावुन गेलो होतो.
जणु ती एक दिव्य दैवी सभाच होती म्हणा हवं तर. एकेक वक्ता त्यांची मतं मांडताना षोडशोपचार पुजा करून, देवाला नूतन वस्त्र देऊन आणि चंदनाच्या लेपानंतर सुंदर सुंदर फुले अर्पण करावी अशी एक एक व्याख्यान किंवा विचार रुपी पुष्पे माझ्या गुरूच्या कार्यावर अलगद सजवली जात होती . अन वरचेवर ती सुंदर पूजा अजून खुलून दिसत होती. खरं तर कार्यक्रम संपूच नये असं वाटत होतं. या दरम्यान आदरणीय श्री सुधाकर शास्त्री यांनी यज्ञ कार्य, सेवा याचा मागोवा घेत आदरणीय गुरू माउलींनी किती पेच प्रसंग, खाच खळगे आणि यातना अनुभवल्या त्याची कल्पना दिली. खरं तर शास्त्री विद्वत्त आहेत आणि ज्येष्ठ ही आहेत तरी गुरुचरणी सतत लीन राहून ते स्वतः अग्निहोत्र व्रत घेऊन गुरूचा उद्देश पुढे घेऊन जात आहेत. शब्दाशब्दात त्यांच्या मुखातुन ओसंडनारे गुरु प्रेम आदर आणि सहवास विनम्रपणे आणि अभिमानाने ते समोर ठेवत जात होते.
मला आभारप्रदर्शन करण्याचं भाग्य लाभले ...खूप बोलावं असं वाटत असताना वेळ, व्यासपीठाच्या मर्यादा संभाळून अगदी दोनच वाक्यात त्या दैवी सभेचा उत्तरार्ध करून ...पसायदान करून संपन्न झाला. औपचारिकता उरकुन समस्त सभा भोजनकक्षात निघाली. सुग्रास प्रासादिक अन्न, ज्यांना शिवलिंग निर्माण करायचे त्यांनी फलाहार घेतला अन जो या सोहळ्याचा आत्मा आहे त्या साठी ती वास्तू आता पुन्हा नव्या रुपात सजत होती.
एका बाजूला शिवलिंग निर्माण, तर दुसऱ्या बाजूला पूजेची तयारी अशी धावपळ सुरू झाली. बघता बघता ती घटिका समीप आलीच. बरोबर 4 वाजता माऊली आणि मायबाई दत्त म्हणून सोवळ्यात तिथे हजर. पूजेचे सर्व पाट मांडले, पूजा साहित्य (बेल, विविध रंगी फुलं, हळद, कुंकू, अक्षता, सुपारी, खडीसाखर, तुपात वाती भिजवुन लावलेलं निरांजन, पळी भांडे, पंचामृत, ताट) असे पुजेसाठी बसणाऱ्या प्रत्येकासाठी तयार करण्यात आले होते. या सर्व कामाचं नियोजन, कष्ट महिला मंडळ करत आहे. दस्तुरखुद्द मायबाईंच्या मार्गदर्शनाखाली हे सर्व सुरू आहे. त्या जणु माहेरवाशीण लेकी आहेत एवढं प्रेम, माया त्या सर्वांवर करत तो शिवसंसार फारच दिव्य नांदवत आहेत. सर्वजणी कधी एकदा कार्यालयात जाऊन तिथल्या कार्यात योगदान देते अशा उतावीळ असतात तिथे जाण्यासाठी. अगदी माहेरी जायचा ओढा असतो तसंच आणि ती माय माऊली ही तितकाच जीव लावते, काळजी घेते.
सर्व पाट अनेक रांगा लावून, त्या समोर छानशी सुबक सुंदर रांगोळी, बाजूला पूजेचे साहित्य असे बसतात. समोर माऊली त्यांचे 7 ते 8 पाट ज्यात एक मोठं शिवलिंग असतं. बाजूलाच त्यांच्या काकांचे ही पाट या वेळी आहेत. हळूहळू ती सृष्टी शिवमय होत जाते. माऊलींच्या बाजूला शुभ्र वस्त्र, भस्मधारी वेद विद्वत्त किमान 15 ते 20 विद्यार्थी बसलेले. एक मुख्य आणि "स्वस्तिनो इंद्र वृद्ध श्रवा:" असा संथ, खड्या आवाजात मंत्र सुरू होतो आणि पूजेला सुरुवात होते. अतिशय लयबद्ध, संथ, स्पष्ट असे उच्चार एकासुरात, समोर साक्षात शिव पार्वती दोघांनाही रुद्राष्टअध्यायी मुखोद्गत आहे, ते ही त्याच सुरात ते उच्चारत राहतात. आवाहन, प्राणप्रतिष्ठा, षोडशोपचार पूजा आणि नंतर अभिषेक असा तो चार तास चालणारा कार्यक्रम. पूजेच्या मध्यात माऊली समोरच्या पाटांवर जी हळद कुंकू यांची उधळण होत ते पार्थिव शिव स्वरूप जिवंत आणि तेजोमय होते. मुख्य अभिषेक संपण्यापूर्वी रंगी बेरंगी फुलं, हात, बेल आणि वस्त्रमाळ यांच्या दुरड्या चौफेर मांडल्या जातात... सुरुवातीचे तीन दिवस ही सेवा करण्याचं भाग्य मला मिळाले आणि मी कृतकतार्थ झालो. अभिषेक संपन्न होताच त्याचे सुशोभीकरण महाराज, माय बाई आणि विद्यार्थी मनोभावे करतात. हे पाहताना अगदी शिव पार्वती साक्षात पुजा करत आहेत हेच आणि हेच भाव असतात.
याची अनुभूती मी शब्दबद्ध करूच शकत नाही. आता आपण म्हणाल तासाभरात होणाऱ्या अभिषेकासाठी चार तास का ?
माधुर्यमक्षरव्यक्तिःपदच्छेदस्तुसुस्वर: ।
धैर्यंलयसमर्थंच षडेते पाठका गुणा: ॥
याच लयीत तो अभिषेक संपन्न होतो, नैवेद्द, आरती, मंत्रपुष्पांजली नंतर माझी स्वतःची आवडती अशी शिवमानस पुजा सुरू होते आणि रोम रोम अक्षरशः शिवमय होतो.
!! आत्मा त्वं गिरिजा मतिः सहचराः प्राणाः शरीरं गृहं।
पूजा ते विषयोपभोगरचना निद्रा समाधिस्थितिः॥
अशीच काही अवस्था आपली होते ....तद्नंतर पार्थिव शिवलिंग विसर्जन, आदरणीय माऊलींचे दर्शन आणि प्रसाद ...असा सतत तीस दिवस हा कार्यक्रम आहे ...
आपण सर्वांनी याची दिव्य अनुभूती याची देही याची डोळा तिथे जाऊन घ्यावी ही विनंती. तुम्हाला फ़क्त तीन ते चार तास पूजेला बसण्याची माणसीकता सोबत घेउन जायची आहे.
रोज सकाळी जे अन्न दाते आहेत त्यांच्या करवी श्री सत्याअंबा पुजन, विविध मान्यवर, अध्यात्मिक आणि धार्मिक क्षेत्रातील विद्वान यांची व्याख्याने अशी विविध उपचारानी सजलेली ही श्रावणमास पुजा दिन प्रतिदिन खुलत आहे ...
आज तर सर्व विद्यार्थी जे स्वतः वैदिक आहेत, त्यांची कुटुंब आणि बाळ गोपाळानी एकत्र येऊन प्रेम, आनंद आणि हर्षोल्हास यांचं शिव तांडव तिथे प्रकट केलं त्या विषयी सविस्तरपणे पुढील भागात...
ओम नमः शिवाय !!
शरद पुराणिक
सैदापुर, रायचूर, कर्नाटक


Comments