भाग पाचवा - श्री यज्ञेशो विजयते - श्रावणमास शिवपूजन पुणे - सर्वार्थाने शिवमानस पुजा अन स्वातंत्र्याचा सुवर्णमहोत्सव


 भाग पाचवा - श्री यज्ञेशो विजयते -  श्रावणमास शिवपूजन पुणे - सर्वार्थाने शिवमानस पुजा अन स्वातंत्र्याचा सुवर्णमहोत्सव


रत्नैः कल्पितमासनं हिमजलैः स्नानं च दिव्याम्बरं।

नाना रत्न विभूषितम्‌ मृग मदामोदांकितम्‌ चंदनम॥

जाती चम्पक बिल्वपत्र रचितं पुष्पं च धूपं तथा।

दीपं देव दयानिधे पशुपते हृत्कल्पितम्‌ गृह्यताम्‌ !!


हे प्रभो, रत्ननिर्मित सिंहासन, शीतल जल स्नान, दिव्य वस्त्र, तद्नंतर विविध रत्नविभूषित अलंकार, मृग कस्तुरी सम चंदन, जाई, जूही, चंपा, गुलाब, कमळ, आणि बिल्वपत्र रचित पुष्पांजली, धूप, दीप ....अन कोमल स्वरातील संथ लयीत तुला जो रुद्राभिषेक आम्ही करत आहोत ती आमची सहृदय पुजा तुम्ही ग्रहण करा ....ओम नमः शिवाय.


एकीकडे समस्त भारतवर्ष स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि आमच्या महेश सांस्कृतिक भवनात त्रै शताब्दी सोहळा असा एक विलक्षण दुर्मिळ योग जुळुन आला. तो असा की आदरणीय गुरू महाराज गवामायन सत्र सोमयाजी दीक्षित रंगनाथ सेलूकर महाराज यांची जन्मशताब्दी, गुरू घरच्या अग्निहोत्र व्रताला आणि शिवपूजन व्रताला ही शंभर वर्षे पूर्ण झाली. हा अमृतयोग आणि सोहळा दिन प्रतिदिन असा काही फुलत चालला आहे की विचारूच नका.


15 ऑगस्टची पहाट अशी काय अफाट ऊर्जा निर्मिती करून गेली ...अक्षरशः न भूतो न भविष्यती. चारशे ते पाचशे स्वयंसेवक विविध गणवेशात, हातात तिरंगा, लेझीम आणि योगाची प्रात्यक्षिके असं विविधरंगी आणि चेतनामय ते वातावरण. भारतमातेच्या आणि गुरुमाऊलीच्या प्रतिमेस वंदन करून अमृतमहोत्सव सुरू झाला.  गीत, नृत्य, लेझीम, आणि जयघोष या साऱ्यात रोम रोम हर्षोल्हास करत अक्षरशः पिशवीत खचाकच भरावी अशी ऊर्जा भरत होते.   प्रवेशद्वार रांगोळ्या आणि फुलांच्या सजावटीत खुलुन दिसत होते. तिथेच ध्वजारोहण ही झाले.  देव देश अन धर्मापाई प्राण वेचिले ...अगदी तसंच, हे जरी धार्मीक कार्य आहे तरी ते लोककल्याणासाठी आहे, त्यात कुठलाही स्वार्थी संकल्प नाही. ही आमची धर्मसेवा राष्ट्राला वाहून राष्ट्रगीत गाऊन दिवस पुढे निघाला. 


तिसरा श्रावणी सोमवार, चतुर्थी , 15 ऑगस्टची सुट्टी यात आज सोमवार आणि चतुर्थी उद्यापन असा एक जोड कार्यक्रम चा घाट होता. सोबतच नित्य अन्नदाते 23 होते, त्यातील 10 ते 15 जोडपे श्री सत्यांबा पूजेला बसली होती ...चौफेर मंत्रजागर, सोवळ्यात सजलेली जोडपी, आणि स्वातंत्र्य दिन, सोमवार चं औचित्य साधुन शुभ्र वस्त्र, त्यात जरी आणि रंगू बेरंगी काठ पदर अश्या नटलेल्या माता भगिनी. या सर्वात स्वत्व विसरुन इतकं मांगलीक स्नान होत होतं की विचारुच नका.  नुसत्या त्या स्वरांनी किती शरीर शुद्धी झाली असेल कोण जाणे. त्या सोबतच चहा, नाश्ता, फराळ असं खानपान सुरूच होतं. भरगच्च कार्यक्रम असलेला दिवस आता मध्यावर आला. डॉ भाग्यश्री भागवत ज्या स्वतः संस्कृत भाषेत विद्वत्त आहेत (MA, Mphil, Ph.D) त्यांचं अत्यंत सुंदर विवेचन झाले. त्या स्वतः संस्कृत प्रगत अध्ययन केंद्र येथे 30 वर्षाहून अधिक काळ कार्यरत होत्या. वेद, अग्निहोत्र आणि विविध वैदिक विषयावर अनेक पुस्तके इंग्रजी आणि संस्कृत भाषेत प्रकाशित आहेत. 


आज पुजेला बसणाऱयांची संख्या शेकडो वर होती आणि तितके मृत्तिका शिवलिंग पाट तयार करण्यासाठी अनेक सदभक्त सोवळ्यात उत्साहात ते तयार करत होते. पाहता पाहता पाटांची शंभरी कधी पूर्ण झाली कळलंच नाही.  बरोबर चार वाजता गुरुमाऊली त्यांचा अग्निहोत्र होम आटोपून सभागृहात अवतरली आणि त्या दिव्य सोहळ्याचा श्री गणेशा झाला.  दोनशेच्या वर भाविक, कोणी सपत्नीक, कोणी मुलांसोबत तर कोणी एकटे असे पूजेला बसले. सर्व तयारी सुरू झाली, पाट मांडणे, त्या समोर रांगोळी, फुलं बेल पुजासाहित्य यात मला फार मज्जा येते. आणि आवडीने ते करतो. त्या नंतर गोड, गोंडस वेद विद्यालयातील मुलासोबत आज संपूर्ण पुजा मंत्र, रुद्राष्टध्यायी सेवा करण्याची संधी ही मला मिळाली, जी मी सतत दोन दिवस केली ...प्रत्यक्ष गुरुसानिध्यात त्याची संथा घेतली म्हणा हवं तर.  पण आपल्यालाही तिथे बसून ती सेवा करण्याचं भाग्य लाभलं हे ही नसे थोडके.


आजचा एक अजून मोठा दिवययोग म्हणजे रुद्र सुरू असताना श्री गुळवणी महाराज स्वतः तिथे प्रकटले ...व्वा व्वा काय योगायोग पहा. त्यांनी ही उपस्थिती लाऊन आजच्या या दिवसाला अजून वेगळी ऊर्जा दिली. समितीतर्फे त्यांचे यथोचित स्वागत प्रेम माया आदरपूर्वक सत्कार केला.  हे कमी होते की काय हरिद्वार हुन स्वामी ज्ञानानंद जी ही आले आणि संपूर्ण रुद्र होईस्तोवर बसले. 


आता अभिषेक संपन्नते कडे पोचत होता, फुलांच्या, बेलाच्या, हारांच्या, वस्त्रमाळाच्या टोपल्या तिथे अवतरत होत्या. आमच्या बाजूला ही वाद्ये, टाळ, झांज, संबळ, डफ, असं येऊ लागलं आणि त्यासोबत इतर गुरुजी ही येतच होते. आणि मंत्रांचा आवाज उंचावत होता. समोर शिवपूजा तिरंग्याच्या रंगात सजत होती...आता ती वाद्ये नाद करू लागली अन तो निनाद एका उच्च स्थानावर पोचत आरत्या ही सजल्या, आज भारतमातेची ही आरती घेतली आणि हळूहळू वाद्ये गर्जत गर्जत...धूप दीप झाला आता कापूर आरतीवर येऊन थांबला. 


छत्रं चामर योर्युगं व्यजनकं चादर्शकं निमलं।

वीणा भेरि मृदंग काहलकला गीतं च नृत्यं तथा॥

साष्टांग प्रणतिः स्तुति-र्बहुविधा ह्येतत्समस्तं ममा।

संकल्पेन समर्पितं तव विभो पूजां गृहाण प्रभो॥


मंत्रपुष्पांजली, शिवमानस पूजा आणि अन्नदात्यांचे सत्कार होऊन प्रासादिक, सुग्रास भोजनासाठी प्रस्थान झाले.  दिवसभर उपवास त्यामुळे त्या भोजनाची वाट पाहतच होतो.


ॐ सह नाववतु।

सह नौ भुनक्तु।

सह वीर्यं करवावहै।

तेजस्विनावधीतमस्तु।

मा विद्‌विषावहै॥

ॐ शान्ति: शान्ति: शान्ति:॥


आज कुठलेही फोटो टाकणार नाही, कृपया खाली दिलेल्या लिंक वर जाऊन स्वतः त्याची अनुभुती घ्यावी ही कळकळीची विनंती.

https://youtu.be/X3QYvlKhaVw


शरद पुराणिक

170822

Comments

Popular posts from this blog

How do I say a Good Bye once for all Harish Sir !!

ओढ लावती अशी जीवाला गावाकडची होळी