भाग चौथा - श्री यज्ञेशो विजयते - श्रावणमास शिवपुजन, पुणे




 भाग चौथा - श्री यज्ञेशो विजयते - श्रावणमास शिवपुजन, पुणे

गुरुभक्तीत सदैव लीन असणाऱ्या विद्यार्थ्यांनी प्रेम, माया, आदरपूर्वक केलेली शिवतांडव सम दिव्य सेवा दीपोत्सवात उजळुन निघाली ..
मी मागे काही लेखात गुरुमाऊलींचा गड म्हणजे "बीड" असा उल्लेख केला होता. ते सत्य ही असलं तरी ' महर्षी याज्ञवल्क्य वेद विद्यालयात, गंगाखेड" येथे वेदाध्ययन करून जे विद्यार्थी धार्मिक कार्याच्या यज्ञात आपलं योगदान देत आहे त्यांचा बालेकिल्ला म्हणजे पुणे होय. त्यांची संख्या शेकडो मध्ये आहे. सर्वात सुरुवातीला आदरणीय अहिताग्नि श्री सुधाकर शास्त्री धर्मापुरीकर यांनी पहिली पताका अतीशय नेटाने मिरवत पुण्यात रोवली. या गोष्टीला आज 35 वर्षे हुन अधिक काळ उलटला. त्या नंतर एक एक करत आज ची ही एवढी संख्या पाहुन मन भरुन येत. गुरुकृपेने आणि त्यांच्या स्वबळावर, कर्तृत्वावर आज ही सारी मंडळी अतिशय उत्तम रित्या स्थिरसावर आहेत. या प्रक्रियेत सुरुवातीच्या काळात शास्त्रीजींनी ही अनेकांना मदत केली आणि नंतर हा त्याला, तो ह्याला असें करत आज ही संख्या झाली. परवा याच समूहातील काही विद्यार्थी त्या शिवमय जगात अवतरले अन त्यादिवशीची ती पुजा अशी काही गाजवली की विचारु नका.
जटा टवी गलज्जलप्रवाह पावितस्थले गलेऽव लम्ब्यलम्बितां भुजंगतुंग मालिकाम्‌।
डमड्डमड्डमड्डमन्निनाद वड्डमर्वयं चकारचण्डताण्डवं तनोतु नः शिव: शिवम्‌ ॥
त्यांच्या मुखातुन होणाऱ्या जयघोषात जणु डमरू डमडम करत आहे आणि त्या लाहरीतून निर्माण होणाऱ्या ऊर्जेने मन, काया, वाचा अगदी अंग अंग शहारून आनंदाचे हेलकावे घेत नृत्य करतोय हीच भावना. पूजेचे रूप मी यापूर्वीच सांगितले आहे. हे सर्व श्वेत वस्त्र, भस्मधारी मंडळी, यात यांच्या आवाजात एक विशिष्ट लय, उंचवटा आणि सर्वांची मंत्रोच्चार करण्याची एकच पद्धत. एक तर सर्व आचार विचार पाळुन, सततची घडणारी ही धर्मसेवा यातून सर्वांच्या चेहेऱ्यावर एक विशिष्ट तेज. या अशा बहू संगमातून निर्माण होणारा तो मंत्रघोष ऐकणं हीच एक पर्वणी. हे मला का आवडतं याचं कारण आमच्या लहानपणी आंध्रातून तेलुगू भाषिक येऊन घरोघरी जाऊन शांतीपाठ करून भिक्षा मागत उदरनिर्वाह करत असायचे. मी अनेकदा त्यांना ते मंत्र पुन्हा पुन्हा ऐकवण्याची विनंती करत असे. पण आज कळलं इथे तर अक्खा समुद्र समोर आहे ते तर एक छोटंसं धरण होतं.
जटाकटा हसंभ्रम भ्रमन्निलिंपनिर्झरी विलोलवीचिवल्लरी विराजमानमूर्धनि।
धगद्धगद्धगज्ज्वल ल्ललाटपट्टपावके किशोरचंद्रशेखरे रतिः प्रतिक्षणं मम: ॥
धराधरेंद्रनंदिनी विलासबन्धुबन्धुर स्फुरद्दिगंतसंतति प्रमोद मानमानसे।
कृपाकटाक्षधोरणी निरुद्धदुर्धरापदि क्वचिद्विगम्बरे मनोविनोदमेतु वस्तुनि !!
त्या लहरीतून प्रकट होणाऱ्या शिवमय सुरात बाजूला बसलेले अगदी शिवस्वरुप गुरू माय अन माऊली, त्यांचं ते दिव्यतेज आणि अहोरात्र जे अग्निसेवा करत आहेत त्या अग्निचं तेज क्षण क्षण उजळून घेत होतं. लोक कल्याणासाठी त्यांची ती सेवा अजून अजून तेवत राहो अश्याच प्रार्थना भाव लहरी त्यातून अधोरेखित होत होत्या.
आता पुजा मध्यावर पोचली होती आणि बाजूला दिव्यांची आरास सजत होती. भव्यदिव्य अगदी राजवाड्यात असावा अशा त्या सभागृहात समोर महाराज, माऊली आणि आजूबाजूला फुलं, बेल, हार, वस्त्रमाळ, च्या ओसंडुन वाहणाऱ्या परड्या. पितळेच्या भल्या मोठ्या समया दोन्ही बाजूला, समोर आकर्षक रांगोळी. त्या समोर भाविक भक्त दोन भागात विभागून आपली पूजा सजवत आहेत. त्यांच्या चौफेर दिव्यांची ती आरास ...शब्दांत बांधून वर्णन करण्यापलीकडे अद्भूत असं काही तरी. तुम्ही स्वत्व विसरून जणु कैलासावर एक दिव्य सोहळा पाहत आहात ही अनुभूती. आता मंत्र स्वर लय ताल भक्ती सारं काही एकत्र होत एका वेगळ्या वेगाने पुढे जात होतं...
जयत्वदभ्रविभ्रम भ्रमद्भुजंगमस्फुरद्ध गद्धगद्विनिर्गमत्कराल भाल हव्यवाट्।
धिमिद्धिमिद्धि मिध्वनन्मृदंग तुंगमंगलध्वनिक्रमप्रवर्तित: प्रचण्ड ताण्डवः शिवः ॥
आता आठवा अध्याय, शांताध्याय ...आवाजाची परिसीमा, हळूहळू मंत्रघोष करणाऱ्या गुरुजींची वाढती संख्या, सभोवताली त्या घोषात न्हाउन निघत सर्वांग शुद्धी होत जाणारे यजमान, दिव्यांच्या तेजातून तळपुन चकाकणारे ते सभागृह, नैवेद्द, आरती ....आज तर आरती म्हणजे डफ, टाळ, टोळ, झांज आणि खडे आवाज ...गुरुमाऊली चं ते फुलं, विड्याची पानं, बेल यांनी सजलेले ताट, त्यात मान उंचावत मोठी होत जाणाऱ्या वाती .....डफली, झांज, टोळ आणि टाळ्यांचा वाढता गजर ....धूप दीप झाला आता कापूर आरती आणि त्यात मिसळणारा कर्पुर सुगंध .. तद्नंतर जलेन शितलीकरणम...मंत्रपुष्पांजली, शिवमानस स्तुती...त्या वातावरणात ती म्हणताना आपली स्तुती शिव प्रत्यक्ष ऐकत असावेत हा माझा दृढ विश्वास आहे.
रोज खरं तर या नंतर मान्यवर किंवा अन्नदाते यांचा सन्मान, दर्शन आणि भोजन असा कार्यक्रम असतो...पण आमचे हे विद्यार्थी काही तरी वेगळं करणार नाहीत असं शक्य नाही... त्या सर्वांनी कुटुंबासाहित महाराज आणि मायबाई यांच्यावर पुष्पवर्षाव केला ..विविधरंगी सुगंधी फुलांच्या पाकळ्यांनी आणि फुलांनी होणारा तो सोहळा पाहुन "डोळ्यांचे पारणे फिटने" हे साक्षात घडलं... खरंतर गुरूंना ते आवडत नाही पण पुत्रवत विद्यार्थी अन त्यांचा हट्ट ...न भूतो न भविष्यती असा हा सोहळा अनेक डोळे पाणाऊन, काही पाण्याचे ओघ हास्यात लपवून तर बाजूलाच निवेदन करणाऱ्या सुधाकर शास्त्रीच्या शब्दात विरघळत तो गुरुभक्ती, प्रेम, आशीर्वाद, माया, भक्ती असे विविधरूपी सोहळा संपन्नते कडे वाटचाल करत होता. ही आमची विद्यार्थी सेना, त्यांची शक्ती, ध्येय, ऊर्जा सर्वच अफाट आहे.. त्यांना वंदन . .अशीच ऊर्जा ऑगस्ट 28 तारखेपर्यंत असावी हीच गुरुचरणी प्रार्थना ...जाताय कुठे पुढे भेटायचं आहेच की राव ...कारण आज श्रावणी दशविध स्नान हा सोहळा घडतो आहे ते काय आणि कसं... पुढच्या भागात.
इमं हि नित्यमेव मुक्तमुक्तमोत्तम स्तवं पठन्स्मरन्‌ ब्रुवन्नरो विशुद्धमेति संततम्‌।
हरे गुरौ सुभक्तिमाशु याति नान्यथागतिं विमोहनं हि देहिनां सुशंकरस्य चिंतनम् ॥
(वरील श्लोक हे शिवतांडव स्तोत्र यातुन घेतले आहेत... अर्थासाठी विद्वान किंवा गुगल साहेबाना संपर्क करावा)
ही सेवा अविरत घडत राहो !!
ओम नम:शिवाय
शरद पुराणिक
श्रावणी पौर्णिमा २०२२

Comments

Popular posts from this blog

ओढ लावती अशी जीवाला गावाकडची होळी

गौरी गणपती