श्री यज्ञेशो विजयते - भाग आठवा - श्रावणमास शिवपूजन सोहळा - क्षण निरोपाचा
श्री यज्ञेशो विजयते - भाग आठवा - श्रावणमास शिवपूजन सोहळा - क्षण निरोपाचा
निरोप द्यावा की घ्यावा
निरोप का द्यावा कसा द्यावा
हे ही राहतात प्रश्नच कायम
निरोप देताना आणि घेताना
खरं तर सहवासात अनुभवलेले
शब्द संवाद प्रेम अनुभव सारे
हेच तर असतात भेट वस्तू
निरोपा साठी देवाण घेवान
ते क्षण मात्र असतात भावनिक
आवंढा गिळत आसवं लपवत
निरोप रडवत राहतो आतल्या आत
सतत महिनाभर सुरू असलेला तो शिव सोहळा काल संपुष्टात आला. संमिश्र भावना आहेत, ते या साठी की तो सोहळा इतक्या थाटामाटात पार पडला त्याचा आनंद एकीकडे तर उद्या पासून हे असणार नाही ही सतत छळणारी भावना. हे जणू एक लग्नच होतं जणु आमच्यासाठी ..आधी दाखवण्याचा कार्यक्रम झाला आणि शिवाने पुण्याला पसंती दिली ...आता सुरू झाल्या बैठका. कार्यालय शोध मोहीम, ती ही सतत 35 दिवस उपलब्धी असणारं कार्यालय शोधणे हे जिकरीचे होते. समूहातील चार सहा सदस्य आज इथे तर उद्या तिथे, video टाक, फोटो टाक असं करत करत " महेश सांस्कृतिक भवन" एकदाचे पक्के झाले .. गुरू माऊली आली, त्यांनी पाहिलं आणि ठरलं... त्यांच्या दिव्य दृष्टीतून त्यांना काय दिसलं माहीत नाही ...पण शिव सोहळा महेश भवनात हीच संकल्पना भारी होती. इथंही ऊन पाऊस वारा कशाचीही पर्वा न करता सर्वजण सक्रिय होते. त्या सोबतच अनेकजण दारोदार, घरोघरी जाऊन भिक्षा प्राप्त करण्यासाठी अहोरात्र झटत होते.नाव कोणाचे घेऊ, याला घेतलं तर तो राहील. खरं तर आपल्या कार्याची अर्थव्यवस्था आपणच करणे अपेक्षित आहे पण हे सामुदायिक धार्मिक कार्य असल्याने निधींसंकलन हा मुख्य विषय होता ...मात्र गुरुकृपेने त्याला अशी काही गती मिळाली की विचारु नका.
आता कार्य होते देणघेणे साहित्य, आचारी शोधणे, कपडा लत्ता, किराणा, भाजी, बेल, फुले नित्य पुजा साहित्य हा हा म्हणता हे सर्व सुरू झालं ...पुन्हा बैठका, कामाची विभागनी, समित्या झाल्या. आता सोयरे - छे छे आमचे गुरू आणि गुरुमाऊली येण्याचा दिवस ही येऊन ठेपला... ते आले, श्रीसूक्त हवन आज इथे तर उद्या तिथे करत करत 26 जुलै ला त्यांचं जल्लोषात कार्यस्थळी आगमन झालं ...नंतर ची शोभायात्रा आणि इतर घटना या विषयी मी अगोदरच लिहिले असल्यानें ते पून्हा लिहिणार नाही.
रोज तिथे राहायला 50 खोल्यात मिळुन साधारण 200 माणसं नित्य वास्तव्यास, रोजचे पूजेचे यजमान, शिष्यगण, भाविक असा 700 ते 800 लोकांचा रोजचा तो कुंभमेळा. चहा, नाष्टा, फराळ, दुपारचे भोजन, रात्रीचे भोजन ...भटारखाना 24 तास सुरू, दोनीही वेळेस एक पक्वान्न तर नाश्त्याला विविध पदार्थ. खाण्याची चंगळ होती, माऊलीचा तसा स्पष्ट आदेश होता ...जरी ते स्वतः फक्त दलिया खाऊन महिनाभर राहिले.
महाराज, वेद शाळेतील विद्यार्थी , सुधाकर शास्त्री आणि इतरांसाठी वेगळी भोजन व्यवस्था होती.
रोज विविध विचार पुष्प गुंफणाऱ्या पाहुण्यांची सोय, त्यांचा परिचय, कार्याविषयी माहिती, स्वागत आणि वाहन व्यवस्था. आलेल्या प्रत्येक व्यक्ती, देणगीदार, अन्नदाते यांचं स्वागत हे ही होतंच. या सर्वात महिला, ज्येष्ठ, कनिष्ठ, असे सर्व जण एकत्र नांदत होते. रोज तयार व्हायच, गाडी काढायची अन कार्यालय गाठायचं... मायबाई आणि महाराजांचा तसा स्पष्ट आदेशच होता ... अगदी सर्वजण माहेरी आला आहेत असं समजा, खानपान करायचं, काम ही करायचं अन सोबत गप्पा, गोष्टी, फोटो असं अगदी खेळीमेळीचे लग्न घर. पण ते पूजेचे चार तास म्हणजे रोज सोहळा ...त्या विषयी अगोदर लिहिलेच आहे...त्यात व्रतबंध, सोमवार चतुर्थी उद्यापन, मंगळागौर, कुंकुमार्चन असे अधिकचे कार्यक्रम.
हे सर्व होत असताना आणि त्याचं निष्ठेने आयोजन करताना मनं आपसूकच घट्ट जोडली गेली इतकी की आज आम्ही सर्व एकमेकांचे सख्खे नातेवाईक झालो आहोत. चहा सोबत, नाश्ता सोबत, जेवणाचं ही तेच. अगदी फोटो जरी काढायचं तर सोबत, एकमेकांना सोडून अजिबात नाही. महाराज मायबाई पण आग्रहाने हे सर्व करायला सांगायचे. प्रत्येकाची तेवढीच काळजी, चौकशी ती ही कोरडी नाही, अगदी मनापासून. विशेष करून सर्व महिला मंडळ फारच एकमेकांत गुंतल्या आहेत. याचं ही श्रेय गुरु आणि गुरुमाय ला, ते सर्वाना अगदी पोटच्या लेकरासारखं किंबहुना त्या पेक्षा जास्त मायेने वागवतात. योग्य सल्ला, मार्गदर्शन, काय चांगलं काय वाईट याची जाणीव. प्रत्येकाच्या कामाचं तोंडभरून कौतुक.
पहिल्या दिवशी चा तो विलोभनीय सोहळा त्यावर अनेक दिग्गजांनी चढवलेले एक एक सोन चाफा, कमळ, गुलाब, जाई जुई शेवंती चंपा बकुळी सारखे पुष्पहार ....देहू संस्थान चे अध्यक्ष, गणेश्वरशास्त्री द्रविड प्रवर, गुळवणी महाराज संस्थान चे जोशी शास्त्रीजी, शहरातील अग्निहोत्री, वेदमूर्ती मुळे गोंदिकर, SVYASA university बेंगलोर येथील विद्वत्त, बाळूमहाराज, RSS चे स्थानिक, प्रांत अधिकारी, हिंदु धर्म जागरण समिती, हिंदु राष्ट्र सेना आणि स्वतः श्री देसाई जी, डॉ भाग्यश्री भागवत, माजी विद्यार्थ्यांची दीप, पुष्पसेवा , डॉ रामचंद्र देखणे, डॉ आरती दातार, यादी खूप मोठी आहे ...सरते शेवटी चारुदत्त जी आफळे गुरुजी यांच्या रूपाने एक ऐतिहासिक पुष्प आणि या सर्वांवर आदराचे बेल पान म्हणून श्री किशोर जी व्यास (गोविंद गिरी जी) यांनि ती पूजा अजून सुशोभित केली. रोजचा रुद्राभिषेक आणि त्या वर हे संस्कार म्हणजे आमचे शरीर सर्वअर्थाने ॐ अपवित्र: पवित्रो वा सर्वावस्थां गतोपि वा। य: स्मरेत् पुण्डरीकाक्षं स: बाह्याभंतर: शुचि:।। असं झालंय.
असे हे षोडशोपचार होऊन काल शेवटचा "यांतू देवगणा सर्वे" म्हणुन अक्षता टाकल्या नि मी अगदी मुलीच्या अंगावर मंगलाक्षता पडून ती सासरी जाणार या भावनेने अक्षरश: रडलो.
आता हळूहळू बॅगा, माणसे जड पावलांनी बाहेर पडु लागली, गर्दी विरळ होत चालली... निघताना माऊलींचे दर्शन घेतले अन जणु "लेक चालली सासरला" याच भावनेने निरोप घेतला... गाडीत बसलो एकटाच...अन नवरीला जाताना गाडीतुन टाटा केल्यावर ती जशी एकटीच आसवं गाळून पुढचा प्रवास करते तसच कार चालवत आसवं टिपून घरी पोचलो ......सर्व लेकरा बाळांना पाठवुन थकलेले माय बाप समाधान आणि प्रसन्न मुद्रेने तिथे विसावले काही क्षण पुढच्या नियोजना करिता.
!! यज्ञ नारायण भगवान की जय !!
शरद पुराणिक
चेन्नई एक्सप्रेस, 280822
ही मालिका अजून संपलेली नाही !!
Comments