श्री यज्ञेशो विजयते !! भाग सहावा - श्रावणमास शिवपूजन पुणे - पूजेला पुष्पस्वरूप देणारी एक यज्ञसेविका अंजुताई अन आमचे यज्ञसेवक.
श्री यज्ञेशो विजयते !! भाग सहावा - श्रावणमास शिवपूजन पुणे - पूजेला पुष्पस्वरूप देणारी एक यज्ञसेविका अंजुताई अन आमचे यज्ञसेवक.
मागील सर्व भागात आपण पूजन त्याची माहिती, स्वरूप आणि त्याच्या अनुभूती या वर भरपुर लिहिले आहे. पण आपण जी पुजा काही चित्रात आणि ऑनलाईन पाहता... त्यात जी पुष्पसजावट पाहता ते कोण आणि कसं करतंय या विषयी आज आपल्याला सांगण्याचा हा एक प्रयत्न.
आता अगदीच चार दिवस आहेत ..हे लिहितानाही मन हेलकावे खातंय...पुढे काय ?? गेली 25 दिवसापेक्षा सुरू असलेला हा शिवदर्शन सोहळा आता उत्तरार्धात पोचतोय ही भावना मनात कल्लोळ करून सैरभैर होत आहे ...असो जेवढे दिवस आहेत तो प्रत्येक क्षण कुपित बंद करून ठेवायचाय.
खरं तर कोणा एक दोघांचं नाव घेउन भागणार नाही कारण हा दिव्य सोहळा लोक सहभाग, गुरुकृपा आणि त्यांचा संकल्पपूर्ती साठीचा अखंड आशीर्वाद, तन मन धन अशी अभूतपूर्व मदत ज्या धर्म प्रेमी सज्जनांनी केली त्या प्रत्येक प्रत्येक प्रत्येक व्यक्ती, भक्ती, शक्ती रुपाला आणि गुरू माऊलींच्या चरणी नतमस्तक होऊन समेवर येतो.
रोज होणाऱ्या पुष्पसेवेत अखंड योगदानाबद्दल श्री उमेश शास्त्री, गणपत गुरुजी आणि समूह यांचे आत्यंतिक आभार. कारण त्यांच्या या अखंड सेवेशिवाय ही दिव्य पुष्पसेवा अशी अद्भुत झालीच नसती. आमचे चैतन्यमुर्ती उत्साहाचा स्रोत आणि सतत हसतमुख उमेश, मदतीला सवंगडी. मध्यरात्र, भल्या पहाटे फुल बाजारात जाऊन गोण्या भरून आणतात. त्याच सोबत आमचे आडनाव बंधु कालिदास गुरुजी हे त्या पूजेला षोडशोपचारी करण्यासाठीचे साहित्य ...सुपारी, सौभाग्य नाना परिमल द्रव्य असं सर्व पुजा साहित्य उपलब्ध करुन देतात. तेथील इतर पुजा नियोजन सांभाळत ही जबाबदारी ही चोख पार पाडतात.
आज वरील तयारी आणि अंजुताई यांची विशेष आणि विविध रचनेतील ती पुष्प रचना हा विषय आहे. रोज पूजेला बसणारे शेकडो भक्तगण. त्या प्रत्येकाला एक ताट, पळी, भांडे, पंचपात्र ज्यात हळद कुंकु अक्षता सुपारी खडीसाखर कापूर, वस्त्रमाळ आणि निरांजन असा एक सेट प्रत्येकी. रोज किमान 150 ते 200 असे सेट. या व्यतिरिक्त कुंकुमार्चन, नित्य सत्याअंबा, विवीध उद्यापन अशा पूजेची तयारी. अशी ही सर्व तयारी अंजुताई फार हिरीरीने करतात. त्यांना अर्थातच सौ तांबे मावशी आणि इतर भगिनी ही साथ करतात, पण त्या इथल्या म्होरक्या आहेत. या सेवेतली त्यांची कलात्मक वृत्ती, निस्सीम श्रद्धा, कुठलाही मी पणा नाही आणि अगदी एकचित्त हे त्या करत राहतात. मला त्या ज्या प्रकारे ती तयारी करतात त्याचं जास्त अप्रुप आहे.
महाराजांसाठी हळदी कुंकवाच्या भरगच्च वाट्या, सुपाऱ्या, दीप, धूप. त्याच सोबत दिवे आणि त्या खाली कुंकवाने शुभचिन्ह काढून त्या वर ते दिवे. ते सर्व वेगवेगळ्या ताटात सजवुन ते जेंव्हा महाराजांकडे ठेवण्यासाठी आपक्याकडे देतात तेंव्हा प्रत्येक वस्तूला त्या आदरपूर्वक नमस्कार करतात आणि मी त्यांच्या या गुरुभक्ती ला नतमस्तक होतो. काय ती श्रद्धा आणि आदर. या वेळी त्यांचा तो परिसर फुलं, बेलांच्या बहुरंगी आणि विविधतेने नटलेल्या टोपल्यानी बहरतो. आश्चर्य याचं वाटतं की रोज च्या पूजेचा आकार, घेर, व्यास हा दिन प्रतिदिन बदलतो, पण त्यांनी केलेले हार त्या आकाराला साजेसे होतात. कधी काशी विश्वेश्वर, कधी अमरनाथ तर 15 ऑगस्ट ला तिरंगा अशा ढंगात ती सजवण्याची त्यांची सचोटी अगदी वाखाणण्याजोगी आहेच. विशेष म्हणजे आरती चे ताट सजवण्याची जी पद्धत आहे अगदीच निराळी आणि कौशल्यपूर्ण आहे. विड्याची पानं, फुलं, कळ्या, सुपाऱ्या एवढ्या जुजबी गोष्टी वापरून त्या जे आकर्षक तयारी करतात की काय सांगु. साधारण आठवा अध्याय सुरू झाला की त्या टोपल्या महाराज मायबाई च्या भोवताली सजू लागतात... शांत्याध्याय झाला की शिवस्तुती, ओम नमः:शिवाय च्या गजरात स्वतः गुरू माउली ते सर्व एक एक करून शिवाला अर्पण करतात आणि ते शिवरूप खुलत जातं. ते पाहताना चा अनुभव दिव्य आहे. सोबत जोडलेले आरतीच्या ताटाचे फोटो आवश्य पहा. बरं एवढं करून मी, माझ, असं काही नाही, फोटो साठी धडपड नाही उलट आमच्या महिलामंडळींना आग्रह करून फोटो काढायला लावतात. सदैव लीन, नम्र अशी ही यज्ञसेविका, एवढं सर्व करून दुरून डोळे भरून ती पूजा पाहत राहते आणि कृतार्थ भावनेने पदराने डोळ्याचं टिपूस पुसत त्या ला वंदन करत. उदयाच्या पूजेची तयारी सुरु...
या आणि या सम समस्त सश्रद्ध, अफाट गुरुभक्ती करणाऱ्या माझ्या बंधु, भगिनींना वंदन ...थांबतो
शरद पुराणिक
Comments