भाग दुसरा !! श्री यज्ञेशो विजयते !! शिवधनुष्य स्पर्शीले आहे .....शिवपूजनाचा बिगुल वाजला
भाग दुसरा !! श्री यज्ञेशो विजयते !!
शिवधनुष्य स्पर्शीले आहे .....शिवपूजनाचा बिगुल वाजला
अखेर तो क्षण आला, असा आला वाऱ्यासंगे
देहभान विसरून आम्ही रमलो गुरुमाऊली संगे
गगनभेदि ढोल ताशे नामघोष निनादत होते
मन शरीर काया वाचा ही नाचत होती त्या संगे
माझ्या असंख्य गुरुबंधुंच्या अपार कष्ट, मेहनत आणि दानशूर व्यक्ती, कुटुंबे, संस्था यांच्या सश्रद्ध भावनानी ओतप्रेत सदिच्छा, सहकार्य, मदत भिक्षा यातूनच ही सिद्धी साध्य झाली त्या सर्वांचे अंतःकरणा पासुन धन्यवाद, आभार मानूनच मी लिहू शकणार आहे. या प्रक्रियेत सहभागी प्रत्येक व्यक्ती, समूह, संस्था या सर्वांना गुरुभावे वंदन करतो.
खरंतर मी कर्नाटकात होतो आणि कार्यक्रमाच्या समूहावर सतत येऊन मला डीवचणारे ते संदेश खुणावत होते ...अरे वेड्या उठ, नुसता पाहतोस काय ...मन सैरभैर ..कर्तव्य आणि गुरुप्रेम याच्यात माझं गुरुप्रेम जिंकलं. तत्काळ तिकीट काढुन मी कसाबसा गाडीत बसलो. घरी फोन करावा तर कुटुंब रंगलं काव्यात सारखी बायको तिकडे कार्याच्या व्यवस्थेत दंग होती...पूर्वसंध्येला श्रीसूक्त हवन आणि नियोजन बैठक यात ती पूर्ण व्यस्त होती. मध्यरात्री अडीच वाजता रेल्वे पुणे स्थानकावर पोचली अन मी तीन वाजता घराची बेल वाजवली, ते आत घाबरले या वेळी कोण बेल वाजवतय ..एकदाचा पोचलो.
सकाळी 6.30 ला उठुन इतक्या वेगात सर्व तयारी केली की विचारु नका. सर्वांनी ठरवलेला पिवळा कुर्ता बायकोसोबत घरी आलेला होता तरी तो माझ्यासाठी आहे ही कल्पना तिला नव्हती, तो अंगावर घातला आणि ती म्हणाली अरे तो निशांत साठी आहे... मी फ़क्त हसलो आणि निघालो. राजवाड्यात आलोय की काय अशी भावना, एवढं भव्य ते कार्यालय आहे. गुरुमाऊलीचे दर्शन. खरं तर त्यादिवशी प्रतिपदा इष्टी होती, ती पहाटे 6 ते 9 आटोपून गुरू माऊली, मायबाई तयार होते. हळू हळू शिष्यगण ही येत होते. पहिल्या दिवसाचे यजमान यांच्याकरवी श्री सत्यांबा पूजन ही झाले. हा नित्य कार्यक्रम आहे. प्रतिदिन जे अन्न दाते आहेत त्यांच्याकडुन ही पूजा रोज होते.
आता ते कार्यालय एक भव्यदिव्य राजवाडा अगदी जणू रामायणात अश्वमेध यागाच्या वेळी दाखवलंय अगदी तसंच मंगलमय वातावरण. शुचिर्भूत हुन सर्व वेद विद्यालयातील विद्यार्थी, साक्षात गुरुमाऊली, मायबाई, आमच्या सारखे असंख्य लोक कुर्ता, पायजमा, धोतर फेटे असे "शोभयात्रेसाठी" तयार. चौफेर भगव्या ध्वज पताका, ढोल ताशांच्या गजरात , गुरू घोषणांचा तो एकसुरी निनाद शरीर आपसूक थिरकत होतं. खरंतर एक रथ बोलावला होता, पण आजपर्यंत कुठल्याही रथात, गाडीत आमची गुरू माऊली आणि मायबाई बसले नाहीत. प्रत्येक शोभायात्रेत ते स्वतःपायी चालत निघतात. तिथेच मी नतमस्तक होतो..किती तो साधेपणा !!
पहिली फुगडी आम्ही घेतली अन मग सुरू झाली ती एक भावभक्तीमय मनाला आतून स्पर्शून तल्लीन करणारी ती शोभायात्रा. सर्व सुवासिनी उंची साड्या अन पारंपारीक आभूषणे, माथी कलश, तुळशीवृंदावन अशी विविध रूपे फार लोभस ते दृश्य होतं. त्यांनीही फुगड्या खेळल्या, फेर धरले अन तो सर्व परिसर आता अक्षरशः भक्तीभाव, आनंद, जल्लोष, गुरुप्रेम यातुन एक अलौकिक ऊर्जानिर्मिती करून दिव्यत्वाकडे निघाला होता. ढोल अन ताशे आता रंगात होते तसा तो ध्वज ही अजून अजून गगनभेदी होत होता. सोबत याची साक्ष देणारे चित्र आहेत. गुरूंचे पाद्यपूजन, औक्षवण करून ताफा आता मुख्य व्यासपीठावर निघाला जिथे या एक महिन्याच्या शिवपूजन सोहळ्याचा बिगुल वाजणार होता.
केदारनाथ प्रतिकृतीचा तो भव्य पडदा, समोर साक्षात श्री शिवशंभो भोलेनाथ, बाजूला एक दिव्य शिवलिंग अन शिवदेहाचा तो अलगद निळसर रंग - अहाहा संपूर्ण शिवमय ते विश्व. त्यावर विराजमान तशीच असाधारण मुर्ती स्वतः श्री महाराज, मायबाई आणि प्रत्येक क्षेत्रातील दिग्गज व्यक्तिमत्त्व.. ज्योतिष शास्त्र तसेच वास्तुशास्त्र विद्वान धर्ममार्तंड, व्यावसायिक, हिंदू राष्ट्र सेना, इतिहासकार, भागवतकार, श्री गणेश्वर शास्त्री द्रविड आणि इतर अनेक विद्वान मंडळी जणू एक दैवी सभा. त्या सभेतून प्रकट होणारे तेजस्वी विचार, महाराजांच्या अग्नी सेवा आणि यज्ञीय कार्याची स्तुती ऐकून असं काही स्फुरण येत होतं विचारु नका. मग आपल्याला न कळलेले गुरू जेंव्हा अजून अजून उलगडत जातात ती भावना अशी शब्दांत मांडताच येत नाही. प्रत्येकाच्या वाणीतून आणि विचारातून प्रकटलेले एक दिव्य दर्शन त्या दिवशी लाभलं ...आणि आम्ही कृतकृतार्थ जाहलो ...दिवस अजून अर्ध्यावरच आहे... उर्वरीत भावानुभव क्रमश:
पण एक कळकळीची विनंती आपण जिथे कुठे असाल तेथून जेवढे दिवस शक्य आहे तोवर याची देही याची डोळा हा शिवपूजन सोहळा आणि त्याचा अनुभव घ्यावा ही विनंती... सतत महिनाभर होणाऱ्या या कार्यात आपणास आवर्जुन उपस्थिती राहावे ही विनंती ...आधीच सांगितल्या प्रमाणे कार्य मोठे आहे ..!!! थांबतो
शरद पुराणिक
नागपंचमी 020822
सैदापुर, रायचूर, कर्नाटक
Comments