संसाराच्या वेली बहरल्या......आज बोहल्यावर सजू लागल्या
संसाराच्या वेली बहरल्या......आज बोहल्यावर सजू लागल्या
आज आमच्या मित्र मंडळीतील पुढच्या पिढीचा पहिला विवाह सोहळा संपन्न होत आहे अन आनंद पोटात माझ्या माईना ग माईना. आठवणी, भावना, आनंद, उत्साह अन भोगलेलं जगलेलं आयुष्य असा नुसता राडा झालाय त्या मनाच्या कोपऱ्यात. आता लग्न म्हणजे राडा पण हे पुण्यात होत आहे त्यामुळे अगदी शिस्तीत होणार यात शंका नाहीच. अन त्यातही मदन म्हणजे आम्हा सर्वा पैकी जास्त शिस्तबद्ध, लयबद्ध आणि एकंदरीतच व्यवस्थित आहे...बाकी आम्ही इतर सर्व जण म्हणजे अस्सल मराठवाडी (हे म्हणताना अगदी "मी शिवाजीराजे भोसले" मधील अभिमान द्विगुणित करून म्हणतोय).
आमचा हा मैत्रबंध एका वेगळ्याच मोळीत बांधलेला आहे. मी बीड, संजय पिंपळकर अंबाजोगाई, सुनिल देशपांडे चारठाण, विश्वास जोशी आणि सुहास जोशी औरंगाबाद, मदन देशमुख सोलापूर असे विविध फांद्यावरून एकाच फांदीवर रममाण झालो त्याचे कसे आणि काय असे ठोक उत्तर नाही ...ऋणानुबंधाच्या जिथुन जडल्या गाठी ...आज या मैत्रीचं तसं वय सांगायचं झालं तर साधारण 32 वर्षे... म्हणजे आज आमची मुलं आज ज्या वयात आहेत त्या वयातली मैत्री आणि ती जडली ती औरंगाबाद या मस्त शहरात...त्या खुणा आठवणी संदर्भ असे गडद आहेत की विचारु नका. यातील एक समान धागा म्हणजे आम्ही सर्वच "self made" आहोत ..आज आयुष्यात जे काही आहे ते सारं स्वबळावर, कष्टाने आणि मेहेनत करुन...कुठल्याही पूर्व संचिताशिवाय, आधाराशिवाय उभारलेल...पुण्याई वगैरे असेल तर ती फ़क्त आम्ही कुठल्याही वाममार्गाला न जाता आयुष्यात एका यशस्वी वाटेवर आणण्यात कामी आली तेवढीच ...और क्या चाहीये ...हाय काय अन नाय काय. आज तीच झाडं अशी डौलदार आणि बहरताना पाहून होणारा आनंद काही औरच.
आम्ही भेटलो तेंव्हा आमच्या नोकऱ्या नुकत्याच सुरू झालेल्या, मदन एकमेव सरकारी नोकर, विश्वास ची नोकरी, व्यवसाय, संजय आणि सुहास एकाच कंपनीत, तर मी आणि सुनील एका ..यात मी आणि संजय कॉलेजपासून चे मित्र होतो. विश्वास सुहास बालपणी पासून. मदन विश्वास यांचा एक धागा होताच ..अशी विविध धाग्यांनि रंगलेली ती मैत्री. या काळात सर्वांचीच परिस्थिती जेमतेम, प्रत्येक जण विविध जबाबदारीच्या चक्रात अडकलेले, आणि सर्वार्थाने struggle म्हणावं असे दिवस. पण कधी त्याचं ओझं डोक्यावर घेतलं नाही अन त्रास तर अजिबात नाही. सर्व जण एकत्र भेटलो की सगळं दुःख वितळून जायचं अन झऱ्यातल्या पाण्यासारखा निखळ आनंद देऊन जायचे ते क्षण. विश्वास एक दिलखुलास, बिनधास्त माणूस ..चिंता, काळजी या माणसाच्या सावलीला ही कधी थांबली नाही ..तसेच बिनधास्त देशपांडे (सुनील)...हसण्याचा खळखळता झरा म्हणजे सुहास तर समय सुचक पण हसू येईल असं बोलणारे पिंपळकर (संजय)..मदन तसा धीर गंभीर वाटेल पण तो ही कोपरखळ्या मारत ती जी काही मिसळ व्हायची त्याला तोड नाही, तिचं मोल नाही ...अन ती आता परत तशीच मिळेल याची शाश्वती नाही.
आता काहींच लग्न झालं तर काही चहा पोहे उरकत होते. तरीही ज्यांची लग्न झालीत ते आमचे रात्री भेटण्यासाठी चे अड्डे होते. इकडून हा, तिकडून तो असे रात्री एकत्र ..गप्पा, चहा, पोहे ...अन जेवणं झाली नसतील तर कुकरच्या शिट्ट्या ही वाजल्यात अगदी मध्यरात्री. त्यात क्रिकेट ची मॅच असेल तर ती सर्वानी एकत्र पहायची हा अलिखित नियम. सुनिल उशी दुमडून बसलेला, सुहास विकेट जात नाही म्हणून अस्वस्थ तर विश्वास लगेच गाडी काढून चक्कर मारून येणार ..अन विकेट जाणार ...असली धम्माल अन मज्जा मस्ती..
राहायच्या खोल्या, घरं वेगवेगळ्या होत्या, पण सुटीच्या दिवशी आम्ही एकत्र असायचो. हळू हळु औरंगाबाद येथे ही आमचे अनेक मित्र झाले, परत तेच लोग आते गये और कारवां बनता गया.
प्रत्येक जण साधारण कुटुंबातील होतो, आणि स्वबळावर नोकऱ्या मिळवून आयुष्यात स्थिरावत होतो. तेंव्हा च आमची मैत्री घट्ट घट्ट होउन आकार घेत होती. सर्व भावी नवरदेव सोबत फिरत होतो अन हळू हळू लग्नाच्या बेड्या जवळ करत होतो. आपल्या घरुन असेल नसेल ते घेऊन रोज अंगतपंगत, कधीही आम्हाला कंटाळा आला नाही.🎂 आम्ही निशाचर रात्री बेरात्री वेळ होईल तेंव्हा यांच्या घरात दत्त म्हणून हजर. त्या नंतर चहाचे आधण, अन साधारण पहाटे 2 ते 3 वाजता या मैफिली संपायच्या. एक ना अनेक किस्से आहेत. त्यात या वहिनी जेंव्हा माहेरी जायच्या तेंव्हा त्या घराचा फुल चार्ज आम्हा मित्रांकडे. जी वहिनी गावाला तो आमचा मुक्काम. रात्र रात्र पत्ते खेळायचे, भूक लागली की डब्बे उघडायचे , कधी पोहे, चिवडा मिळेल ते हानायच. चहा, कॉफी तयार करायची. त्या येण्या आगोदर घर पुन्हा साफ सुफ करुन ठेवायचं.
मधल्या काळात अनेक स्थित्यंतरे झाली, सर्वांचे विवाह झाले, मुलं झाली, विषेश म्हणजे सर्वांची मुलं डॉ निर्मला असोलेकर यांच्याच हॉस्पिटलमध्ये जन्मले. सर्वांची घरं आजू बाजूला असल्याने प्रत्येक बाळंतिणीला घरचा वरण भात, उकळलेले पाणी मिळाले. सर्वांचा डॉक्टर ही एकच, डॉ बन्सल. दीपा मदन ही तिथेच excise quarters मध्ये होते. सुहास, संजू न सुनील तर एकाच कॉलनीत. हाकेच्या अंतरावर घरं होती. मी ही तिथेच समोर होतो. असं हे आमच वसुदेव कुटुंबकम. आठवणीचा एक प्रचंड खजिना आहे पण तो सगळा इथे ओतायला खूप जागा लागेल, अन वेळ ही लागेल. एकमेकांना लग्न कार्यात मदत, बहिणींच्या लग्नात, घरेलू अनेक विषयांमध्ये सक्रिय भाग अगदी बहिणींच्या सासरी सुद्धा. अगदी एकमेकांच्या आजारपणात ही खंबीर साथ दिलीय. गेली अनेक वर्ष आम्ही नोकरी व्यवसायाच्या निमित्त इतस्ततः विखुरलेले आहोत औरंगाबाद, पुणे, हैदराबाद, सेनेगल, रायचूर असे पण तो बंध आज ही तसाच शाबूत आहे.
सर्व वाढदिवस सोबतच साजरे व्हायचे, शेवटची पंगत म्हणजे आमची अख्खी गँग ...कारण आधी सगे सोयरे उरकुन नंतर ही दिलखुलास मैफल रंगायची... नोकरी अन व्यवसाय या मुळे वेळेत हे कोणी यायचे नाहीत, तेंव्हा सर्वात शेवटी ही मंडळी यायची.
या साऱ्या राहटगाडग्यात मुलं कधी आणि कशी मोठी झाली कळलंच नाही. आता आमची मुलं मोठी झाली, हुद्द्यावर लागली अन त्यातलाच पहिला विवाहसोहळा मदनाचा मुलगा शुभंकर चा आज सजला आहे, मी कार्यालयीन व्यापामुळे इच्छा असून ही जाऊ शकत नाही म्हणून हा आठवणीचा काहूर एका मखमली कपड्यात गुंडाळून रुखवत म्हणून पाठवत आहे...ज्यांना शक्य आहे ते नशीबवान उपस्थित आहेत ...या शब्दांनी आणि त्यातील भावनांनी त्यांना घट्ट मिठी मारतो ..
कुर्यात सदा मंगलम...शुभ मंगल सावधान !!
नांदा सौख्य भरे ....
या मैत्रीला दृष्ट लागू नये म्हणून हा काळा ठिपका....
ही दोस्ती तुटायची नाय !!
नेमका आजच आमच्या सुहास आणि वैशु यांच्या लग्नाचा ही 25 वा रौप्य महोत्सवी वर्धापन दिन आहे त्याला ही शुभेच्छा ...25 वर्षांपूर्वी याच दिवशी आम्ही सर्व एकत्र होतो.. ती गंमत निराळी... त्या विषयी पुन्हा कधीतरी...
शरद पुराणिक
240522
Comments