बीडच्या "बँड बाजातील सूर लय ताल" हरवले ..अलविदा जनार्दन जी
बीडच्या "बँड बाजातील सूर लय ताल" हरवले ..अलविदा जनार्दन जी
आज दुपारी व्हाट्सएप, फेसबुकवर एक संदेश आदळला तो म्हणजे "जनार्दन ब्रास बँड" चे सर्वेसर्वा जनार्दन दोडके यांचं निधन. आणि मन सैरभैर झालं. प्रत्येक गावाचा तसा एक प्रसिद्ध आणि विशिष्ट बँड असतो तसाच बीडचा हा अगदी प्रसिद्ध, नामांकित, सर्वांच्या जिवाभावाचा बँड. तसे इथेही पाच सात इतर बँड होते त्याकाळी. सध्याचा नेमका आकडा माहीत नाही. त्या सर्वात हा अतिउच्च दर्जाचा. आम्हाला जास्त अप्रूप या साठी की आमच्या गल्ली बाहेर पडले की उजव्या, डाव्या हाताला दोन चार बँड वाले. पिढ्यानपिढ्या हे इथेच रहायचे.बहुतेक सर्वांचं आडनाव दोडके. तसा या दोडक्यांना अजून ही एक पारंपारिक व्यवसाय होताच, पण जनार्दन यांनी बँड च्या रूपाने आपली स्वतःची एक ओळख निर्माण केली होती. त्याची अनेक कारणे आहेत.
खरंतर आजच्या "digital" युगाचा या व्यवसायलाही तसा फटका बसला आहे. पण आजही घरी काही कार्य असेल, बँड आला, त्याने सुरुवातीस प्रार्थना गीत वाजवले की त्या कार्याला खऱ्या अर्थाने "मंगल" करतात ते सूर. दुसरं एखाद गीत सुरू झाले की आपसुक आपण थिरकतो, चालण्या बोलन्यात एक लकब येते . तो जिवंत अनुभव मग तुमच्या कुठल्याही गोष्टीत नाही.
जनार्दन जी नि स्वतःचा असा एक चाहता वर्ग, दर्जा निर्माण केला तो त्यांच्या मधुर वाणीतून, विनम्रता हा स्थायी भाव. पांढरा शुभ्र नेहरू शर्ट किंवा सदरा, तशीच स्वच्छ विजार, टोपी. सडपातळ पण उंच शरीर यष्टी, धारदार नाक आता मी लिहतानाही ते समोर दिसतातय जणू, काळ्या त्या clarinet (पिपाणी) वर त्यांनी एकदा स्वर धरला की..शेजारचे इतर वाद्ये ठेका घ्यायची अन एका वेगळ्याच विश्वात तुम्हाला घेऊन जाणारा तो ताल फक्त आणि फक्त जनार्दन जी यांच्या बँड मध्येच आहे या वर कोणाचं ही दुमत नसावं.
कुठलंही नविन गीत ते हिंदी, मराठी सिनेमातील असू किंवा एखाद्या album मधील असु, ते बाजारात आलं की यांच्या बँड समोरून जाताना तो रियाज ऐकु येत असे. या साठी सतत सराव, आणि मग त्याचं सादरीकरण ते करायचे. फक्त फिल्मी संगीत नाहीतर भावगीत, भक्तीगीत आणि सर्वात महत्वाचे म्हणजे अनेक शास्त्रीय संगीत अशी गाण्यांची भरगच्च मेजवानी म्हणजे जनार्दन ब्रास बँड. इतर बँड सारखं फ़क्त "बडवणे" असा मार्ग यांनी कधीही निवडला नाही. संगीताचा अभ्यास आणि तो कृतीत उतरवुन ते सादरीकरण ही त्यांची ख्याती. यातूनच प्रेरणा घेऊन त्यांच्याच कुटुंबातील एक सदस्य श्री दिलीप दोडके यांनी संगीत क्षेत्रात आपलं एक मजबूत स्थान निर्माण केलय. ते आज एका नामांकित संस्थेत संगीत शिक्षक म्हणुन कार्यरत आहेत ...ही या कुटुंबाला सरस्वती ने दिलेली त्यांच्या निष्ठेची पावती...
बोले रे पपी हरा
हे गीत जनार्दन जी यांच्या बँड कडून ऐकणे ही मेजवानी. या आणि इतर असंख्य गीतांनी त्यांनी लोकांच्या मनावर राज्य केलं ..गणपतीची आरती ही तितकीच मधुर...
वेळेची शिस्त, सर्व वाद्यवृंद ही तितकाच व्यवस्थित, यांचा तो गणवेश ही तशाच शिस्तीचा (नाही तर अनेक ठिकाणी, हॅट उसवलेली, गुंड्या तुटलेल्या आणि बरंच काही अशा गमती असतात), नीटनेटके पणा हे ही वैशिष्ट्य. त्यामुळे अर्थातच त्यांचा भाव ही तसाच होता.. पण त्याचा कधी अडसर आला नाही कारण त्यांची गुणवत्ता. बँडचा हा ब्रँड त्यांनी निर्माण केला.
माझ्या लहानपणी एक होणाजीचा बँड होता ...त्याला सुपारी दिली तरी तो वेळेत येईल याची शाश्वती नाही...त्याविषयी सविस्तरपणे कधीतरी ...कारण तो ही एक जवळचा विषय ...पण इथे जनार्दन जी यांनी या सर्व बाबींचा सखोल विचार करून तो आमलात आणला हे स्पृहणीय, कौतुकास्पद.
जी कुटुंब व्यवसाय, नोकरी निमित्त इतरत्र दुसऱ्या शहरात, राज्यात स्थायिक झाली तिथेही त्यांना आवर्जुन बोलावणं असायचं ..दिवाळी चा पाडवा मागण्यासाठी मानाच्या मंडळी कडे, जाणे, सण वार, पालखी आणि इतर सार्वजनिक सोहळ्यात त्यांची उपस्थिती एक पर्वणीच असायची ..
ओ जानेवाले हो सके तो लोट के आ .
अलविदा जनार्दन जी
शरद पुराणिक
180422
Comments