गुणवत्ता, नीतिमत्ता ठासून भरलेला चित्रनगरीचा खरा बादशाह



 गुणवत्ता, नीतिमत्ता ठासून भरलेला चित्रनगरीचा खरा बादशाह


चित्रनगरीचा देव देव्हाऱ्यात नाही, देव गेले देवाघरी ....परवाच आदरणीय, सन्माननीय, मराठी चित्रनगरीचा बेताज बादशाह आपल्या सर्वांना सोडुन गेला. खरं तर एकंदरीतच या क्षेत्रातील खडा न खडा माहिती मला नाहीये ...माझं इथलं ज्ञान (हिंदी आणि मराठी) अगदीच कामा पुरतं, जुजबी आणि नगण्य.  एक तर त्याचा आवाकाच इतका मोठा आहे त्यामुळे ते कितीही घेतलं तर कमीच.  मी जवळपास 10 ते 12 वर्ष एकटा बाहेर राहिलो, पण कधीही आवर्जुन सिनेमा ला गेलो नाही ...जे पाहिले ते काही landmark आणि सर्वार्थाने superhit चित्रपट. जे भावतं तेच मनात घर करत आणि तेवढं पुरतं. उगाच ऑफिसमध्ये जेवणाच्या चर्चेत सहभागी होण्यासाठी किंवा कशालाही बळी पडलो नाही. हल्ली तर सिनेमा पाहण्यासाठी कुठे जावं ही लागत नाही, ते जसे मिळतील तसे तुकड्या तुकड्या मध्ये चाखायचे, आवडले तर पोटभर नाही तर चव घेऊन सोडायचे. असो ...तर या क्षेत्रात शेकडो असे कलावंत आहेत जे ऊत्तम काम करतात, भले भले चित्रपट ही पेलले आणि जनमानसात ते "superstar" म्हणून आजही  घर करुन राहतात. 


तर असे अनेक superstar आहेत, होऊन गेलेत.  पण "हवा का झोका" सारखे अनेक येतात, जातात. कोणी अगदी एक दोन चित्रपट करून असे टरारतात की विचारु नका. जे खरंच यशस्वी आहेत त्यातही अनेक जण एका विशिष्ट वलयात वावरत असतात. या मार्गावर चालणारे, चेहेऱ्याला एकदा रंग लागला, चार लोकं तुमच्या आजू बाजूला घुटमळू लागले की जमिनीपासून जरा वरच चालतात. प्रत्येकाचं खाजगी आणि सामाजिक आयुष्य किंवा हे वलयांकित जगणं अनंत रंगानी भरून कधी भरजरीत तर बेरंगी ही असतं. काही स्वत्व विसरून या नशेत असे बेधुंद होतात अन ती नशा जसजशी वाढत जाते, तसतसे तिचे रंग दाखवायला लागते. तुम्ही सर्व जाणकार आहात आणि या सर्व संदर्भांची नावासाहित यादी देणं मला गरजेचे वाटत नाही.


वरील बाबतीत आपली मराठी सृष्टी मात्र भाग्यवान आहे की आम्हाला काही दिग्गज असे मिळाले की ज्यांनी अगदी तन्मयतेने, तन, मन, धन देऊन इथे आपलं एक उच्च स्थान स्वनिर्मित केले त्यातलं एक अग्रणी नाव म्हणजे रमेश देव ...बरं आता हे नाव घेतानाही आपसूक रमेश देव - सीमा देव  असं तोंडातून, पेनातून निघतं.  हे इतकं एकरूप जोडपं म्हणजे "आदर्शांचा महामेरू" स्वच्छ, निर्मळ, सरळ आयुष्य आणि अगदी आपली आपली वाटणारी जोडी. आता जसं प्रत्येक क्षेत्राला एका बाजूला काही तरी कीड, दुर्गंधी, वास असतो तसं इथेही आहे पण तो रोज वरचेवर रंगणाऱ्या चेहऱ्यावर अन उंची अत्तरांच्या फायात दडून जातो, दबतो... रंग उडत जातो तस तसं ते उघडं पडत जातं. पण या सर्व गोष्टी पासून ही जोडी कोसो दूर राहिली. खरं तर रमेश सर एक उंचा पुरा, देखणा नट काहीही करू शकले असते. आपण लिहायला बसलो तर किती वेळ लागेल इतके सिनेमे, नाटकं मराठी हिंदी दोनीही भाषेत केलेले ..(285 हिंदी, 190 मराठी, 30  नाटकं) आणि एकावरून एक सरस भुमिका. पण त्या भूमिका ते जगले ते पडद्यावर आणि रंगमंचावर फक्त. त्या बाहेर ते एक उत्तम व्यक्ती, पती, पिता आणि सच्चा कलावंत म्हणुन जगले, तश्याच सीमा बाई ही. हे जे गुण, नीतिमत्ता, जबाबदारीचे भान आणि ती नेटानं जगले. खरं तर मी उत्कृष्ट शब्दांसाठी मी धडपडतोय की अजून ज्यात त्यांच्या या गुणाविषयी लिहु... पण ते मात्र काही सापडत नाहीत.


या दोघांच्या फोटो कडे, व्हिडिओ मध्ये, काही प्रत्यक्ष दर्शी कार्यक्रमात ही पाहिलं की एक आदर वाटायचा, सूर तेच छेडिता असं गाणं लागलं की अलगद थिरकणारी पावलं, त्याच मंद हास्यातून त्यांच्या कडे पाहणाऱ्या सीमा ताई. प्रतिक्रिया देताना ही तितकाच संयम आणि आपुलकी. प्रेक्षकांचे आभार कायम मानत आले.  उगाच मिळतंय काम म्हणुन कुठलेही रियालिटी शो नाही, जाहिराती नाही. मिळालेला मान सन्मान आयुष्यभर तसाच गोंजारून कापसा सारखा जपून ठेवला.


अगदी पहिला चित्रपट ते वयाच्या 93 व्या वर्षीपर्यंत त्यांची ती निष्ठा, "नलु" वरचं ते प्रेम आणि शेवटच्या क्षणीही अखेरचा श्वास तिच्याच मांडीवर घेण्याची उत्कट इच्छा तिला एक लाल बदाम देऊन व्यक्त करतो ....क्या बात है सलाम. एकीकडे आयुष्याच्या अर्धशतकीत डझनभर लग्न अन घटस्फोट, तर न करता रोज नवी नवरी (?), तर काही घरी एक , दारी एक, शेजारी एक, असं नैतिक स्थान बदलनारे ..असे हे रंगाचारी अन त्यांचे लाखो पंखे आणि एका बाजूला हे असं पवित्र नातं जपणारा एक सर्वार्थाने सिद्ध "superstar" ....अरे नका देऊ हिर राँझा, रोमिओ ज्युलिएट, लैला मजनू ही प्रेमाची  उदाहरणे ...आता द्या रमेश-सीमा हा संदर्भ.  यांना खरंच superstar हा सन्मान योग्य आणि तो मुकूट मानाने मिरवणारा त्याच ताकदीचा चेहेरा म्हणजे रमेश देव. असा नट पुन्हा होणे नाही.


इथे चार दोन नाटकं आणि सिनेमे करून गेलेल्या लोकांची bipoic होते ...पण ह्यांच्यासाठी किती संहिता लिहाव्या लागतील, आणि किती रील (म्हणजे हल्ली ज्या रिल्स चा पाऊस पडतो त्या नाही) करून सिनेमे काढावे लागतील याच विचारात वाट पाहत थांबतो .. 


शरद पुराणिक

040222

Comments

Popular posts from this blog

ओढ लावती अशी जीवाला गावाकडची होळी

गौरी गणपती