धप्पा !!!
बंद करा तुमचे ते रटाळ विनोदी कार्यक्रम
इथे उगवता सूर्य रोज नवे नाट्य घडवत आहे
कोणाची अटक कायद्याने, कोणाची सुडाने आहे
पण तरीही कायदा सर्वाना समान (?) आहे
पहाटेची स्वप्नं खरी होतात हे साफ खोटं आहे
मनी वसे ते दिसे स्वप्नी ही नुसती म्हण आहे
स्वप्नांची राखरांगोळी करणारे अनंत आहेत
त्या असुरी आनंदाची ही काय परतफेड आहे?
बगलेला फाईली मारून खूप थकले आहेत
भोकण्यासाठी भाडोत्री मोकाट सोडले आहेत
बाहेरचा प्रस्थापित इथे रोज करतो माज आहे
भाषा मराठी वापरून तिचाच रोज खून आहे
घरचं झालं थोडं व्याह्याने धाडलं घोडं
बकासुरांच्या खात्यात रग्गड लाच आहे
काळ्या त्या संपत्तीला लावली टाच आहे
याच्या त्याच्या आडून शकुनी तिसराच आहे
इना मीना डिका आता झोपेतून जागे झाले
ताई माई अक्का ला ही स्वार्थी हाक आहे
उथळ मिरवणाऱ्या विझत्या दिव्याखाली
घनघोर अंधार, जाळ अन सर्वत्र धूर आहे
सत्तेच्या अघोरी खेळाला हा काय शाप आहे
आज याची तर उद्या त्याची बारी आहे
तरीही आमचं अलबेल अन खुशहाल आहे
जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा
धप्पा !!!
शपु ...230222
Comments