माझा नवस फेडायचा राहुन गेला

 माझा नवस फेडायचा राहुन गेला, ते रुसले तर नसतील 



त्यांच्या कौतुकाचं पुण्याहवाचन, कार्याचं पुजा स्थापन 

विविध रंगी नटलेल्या चौरंगावर मांडायचं राहून गेलं

शब्द भावनांचं हे सढळ आवर्तन संपन्न झालंच नाही

....अभिषेक राहूनच गेला ...

...तेच भावनांचं निर्माल्य या पुष्पांजलीत गोवतोय.


माझे काका अप्पा (कै गोपाळराव भवानीदास पुराणिक) तुमच्या वर कधीतरी लिहु लिहू म्हणता राहुनच गेलं ...मी उशीर केला असं म्हणणार नाही, उलट तुम्ही इतकी घाई केलीत असंच आमचं म्हणणं आहे. आता त्या कंसात ही कैलासवासी लिहायला बोटं थिजली पण कितीही झालं तरी नियम मोडायचे नाहीत, हा तुम्हीच घालून दिलेला विचार, आदर्श.  खरं सांगतो हे माझे भाव या ना त्या रुपात तुमच्या पर्यंत पोचेल ही माझी भाबडी आशा आहे. जेंव्हा जेंव्हा मी विविध विषयांवर, प्रसंगावर, व्यक्तींवर व्यक्त झालो, त्या प्रत्येक वेळी तुम्ही भरभरून दिलेले अभिप्राय रुपी आशीर्वाद आले की त्या क्षणी मनात विचार यायचा यांच्यावर ही लिहायच आहे. पण असं वाटायचं की तुम्ही अजून अजून काही तरी दिव्य करत राहाल अन ते राहुन जाईल ? या विचारात ते पुढं पुढं सरकत गेलं.  वयाच्या सत्तरीत तुम्ही या digital yugaat ही तो स्मार्टफोन लीलया वापरत शिकलात. आणि त्याचा फ़क्त आणि फ़क्त सदैव सदुपयोग केलात ...आशिर्वाद देण्यासाठी, फोन करून कौतुकाची थाप देण्यासाठी, कार्यप्रसंगात मार्गदर्शन करण्यासाठी तर अडचणीच्या काळात आधार होण्यासाठी तो वापरत होतात. सण वार शुभेच्छा, तब्येतीची चौकशी हे सर्व असं भरभरून करण्यासाठी. नाही तर हल्ली अगदी आवश्यक असे निरोप देण्यासाठी मागे पुढे पाहणाऱ्या या नाटकी युगात तुम्ही हे सर्व कसं काय बुवा जमवलं.  


काय सांगु अप्पा तुमच्या जाण्याने काय नुकसान झालंय याचं अजून पूर्णतः आम्हाला आकलन झालेले नाही ...कारण तुम्ही गेलात या वर अजूनही विश्वास बसलेला नाही ...तुमच्या त्या अंतिम प्रवासावेळी स्वतः हजर राहून जेंव्हा घरी परतलो, तेंव्हा दार उघडल्या बरोबर अनिता विचारतेय की का हो खरंच गेले का अप्पा ? आणि मी निरुत्तर झालो.  इथे जर आमची ही अवस्था असेल तर घरच्यांच काय ? 


माझ्या परवाच्या एका लेखात दिलेला संदर्भ इथे पुन्हा देतो ...या एकदाच मिळालेल्या आयुष्यात किती किती आयुष्य जगलात तुम्ही? स्वतः एक अति उच्च पदस्थ बँक अधिकारी म्हणुन यशस्वी कारकीर्द अक्षरशः गाजवलीत. सातारा, कोरेगाव, कोल्हापूर, मलकापूर, परळी, औरंगाबाद, जळगांव, पुणे,  जवळपास अख्खा महाराष्ट्र नोकरीच्या निमित्ताने फिरले. त्या प्रत्येक गावात आपली वेगळी ओळख  निर्माण केली. या सर्व प्रक्रियेत गावाशी, नात्यांशी, संस्कारांशी त्यांनी त्यांची नाळ तुटुच दिली नाही. आणि तुम्ही निवृत्त झालाच नाहीत कधी, अगदी शेवटच्या श्वासापर्यंत. विविध बँकेच्या संचालक पदाच्या जबाबदारी. सोबतच तुमचा ज्यात हातखंडा होता तो म्हणजे या क्षेत्रातील उत्तम प्रशिक्षक म्हणून तुम्ही तुमची गेल्या 15 - 20 वर्षात निर्माण केलेली दिव्य प्रतिमा. जणू तुम्ही तो वसाच घेऊन जन्माला आलात आणि जगलात.  गावो गावी आणि राज्या राज्यात जाऊन नव्या पिढीला त्यांच्याच काळात होणारे नियम शिकवलेत.  तुमच्या श्रद्धांजली सभेत ते बोलण्यासाठी जमलेले लोक आणि त्यांच्या अनुभव कथनातून तुमची अजून एक मोठी ओळख कळली.

 

आडनाव पुराणिक त्यामुळे अध्यात्म, धर्मकार्य, आणि परंपरागत चाली, रूढी याचं तुमचं ज्ञान ही त्याच दर्जाचं. ते फक्त आपल्यापुरते न ठेवता त्याचा प्रसार समस्त परिवारात ते भरभरून दिलंत. इतरांसारखं ते आम्हालाच कसं माहीत आणि मजा घेत त्याचा असुरी आनंद घेतला नाहीत. स्वतः सप्तशती, देवी भागवत आणि किती किती ग्रंथ यांची आदरयुक्त सेवा, आचरण आणि पठण त्या मुळे तो उजळलेला चेहेरा ...नित्य व्यायाम, सुदर्शन क्रिया, सतत हसतमुख राहणं, कुलधर्म, कुलाचार ही तितक्याच आस्थेने आणि निष्ठेने करणे,  फक्त सकारात्मकता उधळत तुमची ती दिव्य मूर्ती .., आताही तशीच्या तशी माझ्या या अक्षरांखाली उमटत जात आहे. आई जगदंबेचे एक निस्सीम भक्त. कुलदेवता श्री रेणुकामाता जणु जन्मदात्रीच अशी तिची सेवा, अगदी तिच्या कडे पाहिले तरी डोळ्यात पाण्याच्या धारा लागायच्या. या सर्व प्रक्रियेत तुमचं अगाध अध्यात्म ज्ञान तुम्ही सतत वाटत राहिलात. व्याख्याने, प्रवचने हे त्या साठी एक उत्तम माध्यम तुम्ही निवडले. एवढंच नाही तर कुटुंबात आम्ही जे काही तुटके मुटके ज्ञान कावटाळून वावरत होतो याची सतत दखल घेतलीत, प्रशंसा केलीत. खरं तर या विषयी या छोट्या लेखात ते सामावून घेणं केवळ अशक्यच.


नातेवाईक, सगे, सोयरे, अगदि चौफेर ..पुतणे, भाचे, सर्वांचे होणारे नवीन व्याही, सोयरे, अगदी माझ्या मावशी, सासरचे जिथपर्यंत नात्यांचा पदर जातो त्या प्रत्येक पदराचा ते एक मजबूत धागा..आमचं हे विस्तृत कुटुंब जोडणारा हा एक मजबूत रेशमी धागा ...तोच असा अचानक तुटलाय ..असे अनंत धागे होते पण हा जरा जास्तच तलम रेशमी आणि आपलासा वाटणारा शेवटचा बंध होता तोच निसटला. आमच्या तीन पिढ्या या धाग्यात होत्या ...पुढचं माहिती नाही.


शेजारधर्म ही त्याच निष्ठेने जगलात. शहरामध्ये एरवी एकमेकांना चेहरे ओळख  न दाखवणारी संस्कृती. पण तुम्ही त्याच शहरात रोजचे अध्यात्मिक वाचनसमूह तयार केलेत, स्वतः त्या साठी धडपडलात. आणि त्या शेजाऱ्यांच्या झोळीत ही ती ज्ञानाची शिदोरी दिलीत.  तुमच्या कर्तव्यनिष्ठ, निस्पृह स्वभावाची असंख्य उदाहरणे ही आहेत. लग्न कार्य जमवणे, नाते संबंध जोडणे यात हातखंडा. ते सर्व शेजारी ही हळहळत होते. तुमचा स्वर्गरथ घरासमोर आला, तर एक दोन शेजारी म्हणाले जरा दूर जाऊ द्या रथ, आमच्या देवाला चार पावलं खांदा देण्याची संधी द्या अशी विनंती केली.


कौटुंबिक पातळीवर ही तितकेच यशस्वी ...सासऱ्याच्या जाण्याने ढसाढसा रडणाऱ्या सुना अदिती आणि मधुरा..अगदी वडिलांचं प्रेम दिलंत त्यांना. मुलं  अतुल अमोल सारखे गुणी मुलं, ते तर पुर्णतः धक्क्यात होते, कारण  त्यांचं छत्र खऱ्या अर्थाने हरवलं .बाकी स्थावर, आर्थिकदृष्ट्या ही तितकेच सदृढ पणे जगलात आणि मुलं, नातवंडांना ही दिव्य संस्कार दिलेत. .किती लिहु किती नाही .. तेच तर म्हणतोय तुम्ही जाण्याची घाई केलीत अन मी लिहिण्याची दिरंगाई केली ..अन तो अभिषेक राहून गेला ...आणि शेवटचा श्वास घेतलात तो ही कुठे तीर्थक्षेत्र, यात्रेत निरूपण करताना ठसका येतो काय आणि क्षणार्धात त्या विधाता तुम्हाला स्वतः च्या कवेत घेऊन जातो काय .. एरवी सतत सोबत असणारी सहचारिणी आमची सुशीला काकी या वेळी मात्र सोबत नव्हती ..या दिव्य क्षणी तुम्ही एकटेच ...कदाचित त्या वेदना सहन होणार नाहीत म्हणुन तर हे नियोजन नव्हते ना ?? 


अतूट बंध नात्यांचे ...रुसले तुटले

सुवर्ण कुपी प्रेमाची.....हरवली

दिव्य मूर्ती ज्ञानाची...दिसेनाशी झाली

मुद्रा सतत हास्याची...का बरं मावळली


उमेद देत जगण्याची ....नाउमेद झाली

पाठीवर थाप देणारे हात..अदृश्य झाले

कौतुकाचा न अटणारा झरा...अटला

एक मिठी हक्काची...अलगद सुटली


शिस्तबद्ध जगण्याची रीत

संयम  सकरात्मकतेचा ओघ

अध्यात्माचा अखंड स्रोत

अभ्यासु शोधक वृत्ती 


मिळेल का अप्पा तुमच्या रुपात पुन्हा ?

आयुष्याचे अंगण रिते रिते आज भासे


या कधीही न भरून निघणाऱ्या भयाण पोकळीत स्तब्ध मी 

शरद पुराणिक

160222

Comments

Popular posts from this blog

ओढ लावती अशी जीवाला गावाकडची होळी

गौरी गणपती