आज सोहळा बहीण भावांच्या प्रेमाचा .....

 आज सोहळा बहीण भावांच्या प्रेमाचा .....


नात्यांच्या वेटोळ्यात एक घट्ट धागा

सतत तुमच्यात गुंतलेला प्रत्येक टप्प्यात

ती मात्र कायमच असते साथ, सोबत

तुम्हाला सावरत स्वतःच विसरुन 


असतात ना त्या गोड आठवणी

भांडण्याच्या छोट्या कारणावरून

पण ती रागावलेली ही सहन होत नाही

तिची कट्टी फु त्रासदायक वाटते


डब्यातले पदार्थ हिसकावून घेणारी

तोच घास प्रेमाने भरवुन सुखावणारी

तुम्ही शाळेत विसरलेल्या गोष्टी

तिच्या बॅगेत आठवणीने घेऊन येणारी


तुमच्या खोड्या अन प्रताप लपवणारी

गमतीने सांगू का म्हणत, न सांगणारी

आपल्यासमोर मोठी मोठी होत जाते

अन एक दिवस ती सासरी निघते


फुलांनी सजलेली गाडी निघुन जाते

घरातली बाग हिरमसून सुकते 

वृंदावणातली तुळस ही मान टाकते

ती घराच्या प्रत्येक कोपऱ्यात वसते


कर्तव्य, धाक, आठवणी, आधार 

या रूपातून सतत मात्र सोबत असते

नसलेल्यांची आई तर  होतेच होते 

असलेल्यांची ही छोटी आई असते


सख्खी, चुलत, मावस, आत्ये बहीण

वहिनी, मेहुनी, मित्राची बायको 

कोणत्या ना कोणत्या ऋणानुबंधात

आपल्याला घट्ट  विणत असते 


प्रेमाचे चार शब्द, आपुलकी, सहवास

एवढी  माफक तिची ओवाळणी असते

साडी,चोळी, बांगडी,  हक्क असला तरी

 फ़क्त प्रेमाच्या ओटीतच ती खुश असते


आज भेटत नसलो रोज रोज तिला 

तरीही प्रत्येक क्षणात सोबत असते

सुख दुःखात आज ही वाटेकरी असते

बहीण नात्याची घट्ट वीण असते ... 


सर्व बहिणींना रक्षा बंधनाच्या शुभेच्छा !!


शरद पुराणिक

300823

Comments

Popular posts from this blog

ओढ लावती अशी जीवाला गावाकडची होळी

गौरी गणपती