उठ कृष्णा .. आज तुला उठावं लागेल
उठ कृष्णा .. आज तुला उठावं लागेल
बस कर तुझ्या त्या खोड्या, दंगा, मस्ती
घरातलं लोणी दही आज मिळणार नाही
सुदामा ही आज खुप व्यस्त आहे चौकात
त्यांना आवरण्यासाठी तुला उठावं लागेल
शाळांमध्ये तू कालच गेला होतास म्हणे
कुठे नृत्य केलेस, हंडी ही फोडलीस म्हणे
माता भगिनी तुला सजवण्यात व्यस्त होत्या
घाईघाईने तुला घेऊन पोचल्या ना तिथे
आज मात्र तुझी दमछाक होणार आहे रे
कुठे कुठे जाणार आहेस आणि कसं रे
गावोगाव गल्लोगल्ली हंड्या सजल्यात रे
तुझे गोविंदा सारे आज बेभान आहेत रे
गोपिका आज कुठेही येणार नाहीत बरं का
आखूड कपड्यात ललना तिथे नाचनार ना
कर्णकर्कश आवाजात तूला ऐकु येईल ना
गर्द दिव्यात कान्हा तू दर्शन देशील काय
गोवर्धन पर्वत नाही तर नाही, चालतंय की
इमारती अन वस्त्या डोक्यावर घेतील आज
भले आवाजाने छाती फुटून जाऊ दे ना
तुला आज गेलंच पाहिजे त्या व्यासपीठावर
रस्ते तुंबतील, वाहनांच्या रांगा लागतील
कामगार खोळंबतील माता अडकतील
त्यांचा कान्हा त्यांची वाट पाहत असेल घरी
पण तू थांबु नकोस, ते सर्व होत राहील
लाखोंच्या हंड्या अन विविध कुरुक्षेत्रावर
आज गितोपदेश मात्र करू नकोस रे बाबा
अर्जुन नसतील कोणी तुझं ऐकायला तिथे
भोंग्यात त्या तू ते सांगु ही शकणार नाहीस
वृंदावन सोडून तू आज कोठे जाशील
मंदिरातून बाहेर पडून रस्त्यात सजशील
पाणी, गुलाल कशा कशात रंगशील रे
जरा काळजी घे रे बाबा तुझी न मित्रांची
उंच थरावर गेलेल्या गोविंदा वर लक्ष ठेव
तुझं काय बाबा आज येशील न जाशील
त्याचा तुटलेल्या पायाला अन हाताला
पुढच्या वर्षीच पाहशील, तो राहील तर
तेंव्हा उठ कृष्णा .. तुला आज जावंच लागेल.
आम्ही घरी चिकन मातीने तुला पाटावर सजवून, पाळण्यात घालुन, तुला शांत झोके देऊ, तू एवढा थकणार आहेस, तेंव्हा वाट पाहतोय रे कान्हा !!
शरद पुराणिक
060923
जन्माष्टमी
Comments