अस्सल पुणेरी ...आणि ओढून ताणून पुणेकर
अस्सल पुणेरी ...आणि ओढून ताणून पुणेकर
सदरील लेख हा कुठल्याही विशिष्ट व्यक्ती, परिवार किंवा प्रसंगावर नाही, यातील सर्व पात्र हे काल्पनिक असुन कोणाशी साधर्म्य आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.
आता या विषयावर इतकं लिहून झालंय, नाट्यरूपात, साहित्य रूपात आणि दस्तुरखुद्द आदरणीय श्री पु ल यांनी प्रचंड लिहिलं आहे त्यामुळे माझा हा केविलवाणा प्रयत्न आहे, पण तो मी थांबवु शकत नाही, नाईलाज आहे.
तर गोष्ट अशी आहे मला आता पुणे येथे स्थलांतरित होऊन 18 वर्ष झाली, म्हणजेच दीड तप. अबब अरे बराच काळ झाला की हो. आमची पाळमुळं म्हणजे अस्सल मराठवाडा आणि ते आमच्या आत इतकी ठासून भरलेली आहेत की विचारू नका. बरं आम्ही ते लपवण्याचा ओंगळवणा प्रयत्न ही कधीच करत नाही, केलाही नाही. आता असं का ? हा प्रश्न काहींना पडला असेल तर त्याला तशी अनेक कारणं आहेत. एक तर तुमचा स्वभाव तसा पाहीजे, म्हणजे कसा? ते सांगता नाही येणार. पण ते काही आपल्याला जमलं नाही एवढं खरं. आता हे यश की अपयश हा निर्णय मी अस्सल पुणेरी आणि ओढुन ताणुन पुणेरी यांच्यावर सोडतो. यातलं मुख्य कारण म्हणजे बोली भाषा, त्याचा ठहराव आणि शब्दांचे उच्चारण .आम्ही तोंड उघडले की आमचं ते खरं पण बाहेर येतं...हे अनुभवाचे बोल आहेत. तेंव्हाच पक्क ठरवलं आपण हे प्रदर्शन करून घ्यायच नाही, जे काही आहे ते रोख ठोक आणि अभिमानाने चालु ठेऊ.
आज इतके वर्षे झाली आम्ही पुण्यात असतो पण मी पुणेरी, किंवा पुणेकर आहे असं सांगुच शकत नाही, त्याची गरज ही वाटली नाही आणि त्या फँदात ही मी पडत नाही. याचा अर्थ मी त्यांना किंवा मला कुठल्याही पातळीवर उच्च नीच समजतो असं अजिबात नाही. प्रत्येक जण आपआपल्या जागेवर योग्य आहेत. त्यांना तौलनिक तराजूत ठेऊ नये या मताचा मी आहे.
आता हे अस्सल पुणेरी म्हणजे नेमकं काय ...विषय गंभीर आहे, तितकाच तो विशाल आहे आणि ते समजण्यासाठी तुम्हाला अनुभवातूनच जावे लागते. पण साधारण पणे सर्वांना त्याची थोडीफार कल्पना आहे. त्या पुणेरी पणाला विविध कंगोरे आहेत. गेल्या 18 वर्षातील वास्तव्यात मी अनुभवलेले काही प्रसंगानुरूप विश्लेषण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो.
तुम्ही नुकतेच इथे आलात, घर घेतलं आणि राहायला आलात. सोसायटीचे नियम व्यवस्थित समजुन सांगुन काही लागलें तर कळवा असा दाराच्या आतुन सांगुन, गोड हसुन सांगणारा अस्सल पुणेरी. तर तुमच्या घरात येऊन, भिरभिरत्या नजरेने तुमचं घर पाहुन अनावश्यक असे अनेक प्रश्न विचारणार. नंतर तुम्हीच बाहेरून आणलेल्या चहात वाटेकरी होऊन, काही लागलं तर हक्काने सांगा असं म्हनतो, पण प्रत्यक्षात जेंव्हा तुम्ही सांगता तेंव्हा ते कसं अशक्य आहे हे सांगतो ते ओढुन तानुन पुणेकर. अस्सल पुणेरी अडचणीत मदत करून मोकळा ही होतो, त्याचा दिखावा नाही, गवगवा नाही. नेकी कर दरिया मे डाल. तर ओ ता (ओढून ताणुन) नुसतीच सोंगं घेऊन वावरतो..प्रत्यक्षात काही करत नाही.
आता उदाहरण देता देता हा लेख इतका लांबत जाइल की विचारू नका. अस्सल पुणेरी हा कधी ही इतरांना विनाकारण त्रास देत नाही, तुमच्या मध्ये उगाच लुडबुड करणार नाही, तो स्वतःला ही त्रास करुन घेत नाही. शिस्तप्रिय आणि नियोजनबद्ध जीवन पद्धती. या उलट ओढुन ताणून पुणेकर, तुम्हाला इह वेळा त्रास देतो, तुमच्या समोर खोटी स्तुती करून त्याचाच स्वार्थ साधणार, स्वतः मात्र अजिबात त्रास करून घेत नाही.
अस्सल च्या घरी गेलात तर तो भांबावून जात नाही, त्याचं सर्व ठरलेल, अंगात शिस्त भिनलेली असते. खोटा आग्रह नाही, पोटात एक ओठात एक असं नाही अन जे काही रोखठोक स्पष्ट मग तुम्ही दुखावलात तरी यांना फरक पडत नाही किंवा अतीव आनंद ही यांना होत नाही.
सणवार करताना ते का करावे, कसे करावे या वर सखोल वाचन, अभ्यास करून ते त्याच पद्धतीने करायचे, विनाकारण त्याचा अवडंबर नाही - हे अस्सल पुणेकर. तर अर्धवट, महितीशिवाय, कुठलाही अभ्यास नाही फक्त अनुकरण म्हणुन सण साजरे करतो किंवा करतच नाही तो ओ ता पुणेकर.
बरं आता हे ओ ता पुणेकर इतर शहरातही ही आहेत, हो अगदी आमच्या मराठवाड्यात गावो गावी हे संक्रमण झाले आहे. त्यांच्या सोयीप्रमाणे ते पुणेकर आणि गाववाले असे बहुरूपी अवतारात वावरतात. हे नाव ठेवताना पुणेकरांना इतके नाव ठेवतात की विचारू नका. पुण्याची संस्कृती हे लोक पुण्यापेक्षा जास्त गावोगावी जगत आहेत.
संगीत, साहित्य, नाटक, कला क्षेत्रातील लोकांची ही पंढरी आहे. पुणेकरांची दाद मिळवने हाच एक पुरस्कार आहे. दर्दी, अभ्यासु, संतुलित असा प्रेक्षक म्हणजे अस्सल पुणेकर. एखादी गोष्ट आवडली तर तिचं विश्लेषण करून ते कसे योग्य हे सांगणारा, आवडलं नाही तर का आणि कशासाठी हे ही मुद्देसूद सांगणारा पुणेकर. तुम्हाला यातील स्पष्ट फरक पाहायचा असेल तर सवाई गंधर्व ला भेट द्या आणि मधल्या वेळेतल्या चर्चा ऐका. तुम्हाला फरक सहज लक्षात येईल.
आता एक तिहेरी तुलना एका लग्नाचं आमंत्रण आहे अगदी दोन दिवस साग्रसंगीत आमंत्रण - पुणेकर एक दिवसासाठी येऊन मुख्य कार्यक्रम आटोपून लगेच निघतो, किंवा अगदीच थांबण्याची वेळ आली तर स्वतः एक स्वतंत्र व्यवस्था करून राहतो, तो कार्यालयात राहत नाही. या उलट ओ ता पुणेकर तिथेच राहुन, प्रत्येक गोष्टीला नाक डोळे मुरडून मनसोक्त आनंद घेतो आणि सतत त्याचं वेगळेपण जपण्याचा केविलवाणा प्रयत्न करतो. आणि मराठवाड्याचा माणूस कसलीही तक्रार न करता आहे त्या परिस्थितीत आनंद घेतो, आणि मदतीचा अभिनय न करता थेट मदत करतो.
एक मात्र नक्की की पुणेकर असण्याचे फायदे अनंत आणि दीर्घकाळ टिकणारे आहेत, तर ओ ता असण्याचे फायदे क्षणिक आहेत. पण मी म्हणतो ही विनाकारण स्पर्धा कशासाठी ...मुळात या खोट्या दिखाव्याला माझा स्पष्ट विरोध आहे. आम्ही अनुकरण प्रिय आहोत म्हणुन कुठल्याही अनुकरणाला बळी पडु नये, किंवा ते पूर्णतः अंगीकारावे. गमतीचा भाग सोडा, किंवा अति पुणेरी पण सोडलं तरी शिस्त, अभ्यास, नीटनेटके पणा, नियोजन आणि एकाच चेहेऱ्याने जगणारा पुणेरी व्हायला मला आवडेल.
बोला तुम्ही कोण ? मी माझाच आहे.
शरद पुराणिक
051221
Comments