!! आज हरपलं देह भान, जीव झाला खुळा बावळा !!

 








!! आज हरपलं देह भान, जीव झाला खुळा बावळा !! 


खरं तर या विषयावर इतकं लिहिलं गेलंय, कुठे चित्र रूपांत, गीत रूपांत, तना मनात. अवघा महाराष्ट्र "विट्ठल मय" झालाय.  त्या मुळे मी कितीही लिहिलं तरी ते कमीच आहे.  वैष्णवांच्या या मेळाव्यात ही वाळूच्या कणापेक्षाही सूक्ष्म भक्ती त्या अगाध पांडुरंगा चरणी ठेवावी असं आवर्जुन वाटलं. 


"पालखी" हा समस्त महाराष्ट्राचा एक मोठा सण आहे, त्यात पुणे म्हणजे अगदी कुलक्षेत्र. कारण आदरणीय, वंदनीय, पुजनिय, प्रातःस्मरणीय, जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम  महाराज आणि श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालख्या इथे साधारण 3 ते 4 दिवस असतात.  देहू अन आळंदी हे पवित्र तीर्थक्षेत्र नजीकच आहेत.  तसं धार्मिक, अध्यात्मिक, ऐतिहासिक आणि शैक्षणिक अशी विविध दागिन्यांनी सजलेली ही "पुण्य नगरी" अशा या विविध क्षणी तिचं सौन्दर्य इतकी खुलवुन जाते की विचारूच नका.


पण पालखी ही महाराष्ट्राच्या विविध भागांतून निघते. माझं बालपण बीड ला गेलं तिथे "मुक्ताबाई" ची पालखी दर वर्षी येते, आज ही येते पण या कोविड बाबाने गेल्या 2 वर्षात त्याला सुरुंग लावलाय.  तर बीड ला तो मोठा सोहळा असायचा. तिचे शहरात आगमन झाले की पुर्ण शहर भर मिरवनुक..ढोल ताशा, मल्लखांब, टिपऱ्या असे विविध खेळ शहरातील सर्व तरूण मंडळीं सादर करायची. रेवड्या उधळणे ही एक विशेष बाब होती आणि त्या गर्दीत घुसून त्या रेवड्या जमा करण्याची गंमत निराळीच. हा दिवस म्हणजे शहराला सुटी, सर्व शाळा संस्था बंद आणि अगदी पुण्यात जशी गणेशोत्सव ला झुंबड उडते तशीच अलोट गर्दी असायची. 


अशीच गजानन महाराज शेगांव यांची पालखी ही येते, पण तो परतीच्या प्रवासात येते. या पालखिचा थाट वेगळाच.. हत्ती, घोडे, त्या वर स्वार  सेवेकरी. वारकऱ्यांची संख्या ही जास्त असायची.  दिमतीला अनेक वाहन ज्यात जेवण, वैद्यकीय पथक,  अशी ही भव्य दिव्य मिरवणूक निघते. यातील एक विशेष बाब म्हणजे महाराजांच्या जीवनावरील चित्रपट ही दाखवला जायचा.  कंकालेश्वर मंदिरात या पालखिचा विसावा असायचा. तो पुर्ण परिसर म्हणजे एक मोठी यात्रा असं स्वरूप. खेळणी वाले, खाद्यपदार्थ विकणारे असे असंख्य दुकानं अन भक्तीमय ते वातावरण. आता लिहतानाही ते विविध आवाज माझ्या भोवती पिंगा घालत आहेत.


तशीच  पैठण येथुन निघणारी नाथ महाराजांची ही पालखी निघते.  आज जशा सुसज्ज विलोभनीय मन प्रफुल्लीत करणाऱ्या  गाड्या आळंदी अन देहू येथुन निघाल्या, तशीच संत श्रेष्ठ एकनाथ महाराजांची पालखी ही श्री क्षेत्र पैठण येथुन निघाली. अगोदरच व्हाट्सअप्प वर खुप चित्र आलेले आहेत त्या मुळे इथे पाठवणार नाहीच.


असो, तर पुण्यात या सणाची तयारी इतकी अगोदर सुरू व्हायची की साधारण दोन महिने अगोदरच आम्हाला नियोजन करावं लागे. ऑफिसचे बस मार्ग त्या प्रमाणे बदलायचे, काही भागातील लोकांना सुटी द्यायची आणि ते नियोजन जाहीर करणे.   गेले अनेक वर्षे झाली IT क्षेत्रातील कर्मचारी ही या कामात विविध बाजू सांभाळून  सहभागी व्हायचे.  IT दिंडी अशी एक खास दिंडी "देहू, आळंदी ते पंढरपूर"   पांढरे शुभ्र कुर्ता पायजमा, टोपी सोबत उंची कॅमेरे, कोणाकडे खाण्याचं साहीत्य, प्रथमोपचार इत्यादी इत्यादी. स्व पुढाकाराने रस्त्यावर ची गर्दी नियंत्रण, पुढे जाऊन व्यवस्था पाहणे. आधुनिक तंत्रज्ञानाचा सुयोग्य वापर. अगदी 20 ते 50 या वयोगटातील सर्व तरूण, तरुणी या वारीत सरमिसळ होऊन जायचे. तो सळसळता उत्साह मी याची देही याची डोळा 'पुणे ते सासवड" पायी अनुभवला, आणि तेंव्हाच ठरवले एकदा पूर्ण वारी करायची. नंतर हैदराबाद ला बदली झाली अन ते स्वप्नंच राहिलं. आता पाहु कधी योग येतोय ते.  आमचे एक मित्र शशांक गोस्वामी हे हा अनुभव घेऊन आलेत ...स्वतः ME (Metallergy) अन खासगी क्षेत्रात उच्च पदस्थ अधिकारी असूनही हा योग त्यांनी घडवुन आणला.  असे अनंत लोक आहेत. या दरम्यानचे ते दिव्य अनुभव एक मोठा विषय आहे. 


तर अशी ही वारी, पालखी पुण्यात दाखल होऊन ते पंढरपूर पर्यंत अनंत टप्पे आहेत.  शहराच्या विविध भागात त्यांचा विसावा, मानकरी लोकांची सेवा,  अनेक सेवाभावी संस्था, व्यावसायिक, उद्योजक, वयक्तिक कुटुंब, गाव गल्लीतले हजारो भजनी मंडळ , अनेक वाड्या वस्तीतले मुक्काम, जेवणाच्या पंगती,  या विषयी अनेक संदर्भ, आठवणी आणि अनुभव लाखो लोकांच्या आहेत, त्यावर जास्त न लिहिता पुढे सरकतो. 


हे सलग दुसरं वर्ष आहे की यातील काहीही घडत नाहीये पण तनामनात, रोमा रोमात भरलेले हे संस्कार अन पिढ्यानपिढ्या चालत आलेली प्रथा तुम्हाला  सतत आठवण देत राहते... अन मन त्या सावळ्या विठुरायाच्या आठवणीत शिरत राहतं... त्याला कुठलाच काळ, शक्ती आणि संसर्ग थांबवू शकत नाही.  पण मग कुठेतरी वाटत, लाखो च्या संख्येने होणारा तो नामाचा गजर, टाळ, मृदुंग, हे सर्व आवाज त्याला पोचतील कसे ?  पण इच्छा तेथे मार्ग या साठी कोणी घरीच वारी सजवली, कोणी छोटेखानी समूह एकत्र येऊन  हरिनाम गजर करु लागले.  एरवी रटाळ अन टुकार मालीका ही "पांडुरंग चरणी" लिन होताना दिसत आहेत. आमचे आदेश भाऊजी ही गेले कित्येक दिवस सर्व कीर्तनकार, वारकरी अशा भक्तांच्या घरी जाऊन त्या भक्तीमय विट्ठल मय वातावरणात घेऊन जात आहेत.  प्रत्येक जण आपल्या आपल्या परीने ती वारी घडवत आहेतच... ही खरी शक्ती. मधल्या काळात या विषयावर "संकर्षन कऱ्हाडे" ,याची कविता ही अनेकांच्या मनात घर करून राहिली. लाखो वारकरी पायी जाणारे ते पालखी मार्ग, जागो जागचे विसावे मात्र खंत करत असतील, रिंगण नाही अन बाकी सोहळे नाहीत. पण कितीही अडचणी आल्या तरी "निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम" हे मात्र पांडुरंगी लिन होणार आहेतच.


अक्षर नगरी अशा एका समूहाचा मी सद्स्य आहे अन गेले 2 ते 3 आठवडे झाले  अक्षरांची विठ्ठल नामाची दिंडी इथे रोज निघत आहे. आमचे अक्षरगुरू श्री अनिल सर काल परवाच पुण्यात येऊन अक्षररूपी विठ्ठल सजवून गेले.  गुणवंत सराफ, रामराव आणि इतर अनेक कलाकार वारकरी रोज अक्षर अभंग  सावळ्या ला  अर्पण करत आहेत. त्याचे काही नमुने इथे पाठवत आहे.  


एवढंच काय या दिवशी पाऊस ही हमखास हजेरी लावतो ते ही विशिष्ट तालात. आज सजलेल्या त्या गाड्या पाहतानाचे व्हिडिओ आणि फोटो पाहिले, भक्तांची फुल भंडारा उधळण पहिली,  तो इंद्रधनू  पाहताना मी.. "गहिवरलो"  अन...


"आज हरपलं देह भान, जीव झाला खुळा बावळा"


आषाढी एकादशी च्या भक्तिमय शुभेच्छा 


शरद पुराणिक

आषाढ शुद्ध देवशयनी एकादशी

प्लव नाम संवत्सरे

Comments

Popular posts from this blog

ओढ लावती अशी जीवाला गावाकडची होळी

गौरी गणपती