आज पु ल असते तर ...सहज सुचलंय ...
आज पु ल असते तर ...सहज सुचलंय ...
(कोणाच्याही भावना दुखावणे हा हेतू नाही केवळ आठवण म्हणून लिहिलंय याची कृपया नोंद घ्यावी)
आज रघु ची आठवण म्हणुन सर्वांनी त्याला श्रद्धांजली वाहिली अन रघु हे व्यक्तिमत्व सतत डोळ्यासमोर घिरट्या घालू लागलं. किती वेगळं आयुष्य जगला तो. मी जन्मल्या पासून जेंव्हा जेंव्हा त्याला भेटलो तेंव्हा तेंव्हा एक निखळ हास्य, हास्याचा गडगडाट, डोळे बारीक करून त्याचं ते हास्य कायम लक्षात राहील. सुपारी अडकित्ता आणि त्याच ते अतुट नातं. इतकं की ती जनू त्याची ओळखच. अन आप्त मंडळीत सर्वांशी अगदी मिळुन मिसळून मनमुराद आनंद वाटणारा रघु दादा म्हणजे खरंच पु लं च्या अनेक व्यक्ती आणि वल्ली च्या यादीत जाऊन बसणारा. अर्थातच त्याच्या या जगण्याच्या मागचे खरे आधार आधी तात्यासाहेब आणि त्यांच्या पश्चात भाऊ, बाळ आणि सर्वांनी त्याचा अगदी पोटच्या मुला पेक्षा ही जास्त जीव लावला आणि त्याची जगण्याची वाट सुकर करून दिली. त्याला स्वाबलंबी बनवण्यासाठी त्याला अगरबत्तीच्या व्यवसायात सहभागी करून त्याचं अर्थार्जन सुरळित केलं. अन्यथा आजच्या व्यवहारी जगात असा सर्व समावेशक विचार करणारी भावंडे मिळणं ही भाग्यच. त्याच्या जगण्यात आणि जगण्याची उर्मी देणाऱ्या सर्वांचे खरंच कौतुक.
तर असा हा रघु पूर्वी सण वार, लग्न कार्य या साठी बीड ला यायचा, तसे सर्वच येत असायचे. मग बायजी च्या दरबारात या संबंध सुपारी गँगची एक भरगच्च बैठक ? दरबार म्हणा..असा दरबार भरायचा. तक्क्याला टेकून पायावर पाय टाकून रघुनंदन, आमचे बाळासाहेब, गोविंद बाबा, निशी आणि येणाऱ्या जाणाऱ्या सर्व गोतावळ्याची टर उडवणे असा उपक्रम. बरं हे सर्व औरंगाबाद वरून यायचे म्हणजे जरा वेगळी शान होती. काय मग शरद, काय चाललंय ते त्याने डोळे बारीक करून हसून विचारायचे. टाळयावर टाळ्या पडायच्या अन सुपारीचे काप त्या अडकीत्यातून अलगद बाहेर पडायचे तसे अनेक हात ते उचलण्यासाठी सरसायचे... सोबत काही अनामिका डाव्या हाताचा गोल करून ..शुभ्र वर्ण चुन्यानी सुरज चे तोटे चुरगाळून एक एक डोस तयार करायचे, तसे अजून काही हात सरसायचे.
या सर्वांची म्होरकी म्हणजे बायजी तिच्या त्या अति कडक शिस्तीत हे गुन्हे माफ होते कारण बायजी चा तो जोडव्यवसाय होता ..करमणूक आणि कमवणूक अशा दुधारी धर्तीवर ते चालत असायचं.
मग रघु शेठ चा मुक्काम तिथुन विमल आत्या, नंतर अजून आसपास ची घरं ..ती गल्ली म्हणजे नात्यांचा एक मोठा गुच्छ जो विविध रंगांनी एकमेकांना गुंतुवून ठेवलेला..इकडे आत्या, तिकडे काका, मग भाचे, अन बरंच काही. पण रघुचा आणि सर्वांचा वावर सर्वत्र.
नंतर कर्म धर्म संयोगाने सर्व औरंगाबाद ला आलेच, तिथेही रघु चा वावर व्यापक होता, सर्वांच्या घरी आवर्जून जाणार, विचारपुस करणार , निरपेक्षपणे तो हे सर्व करत होता... अगदी सगे, सोयरे सर्व जण रघुला ओळखायचे. कायम स्वच्छ अन तजेलदार चेहेरा. अधुन मधुन फोन करायचा अन बित्तंमबात व्हायची.
अगदी काही कार्यालयात तो अगरबत्ती देण्यासाठी जायचा तिथे तो जर गेला नाही तर लोक विचारपूस करायचे.
तेच निखळ हास्य, कधी कशाची तक्रार नाही, कोण विषयी तक्रार नाही, आलेला दिवस प्राप्त परिस्थितीत आनंदाने तो जगायचा. हल्ली लोक positive energy विषयी भरपूर बोलतात, पण रघु हा त्याचं एक मस्त उदाहरण होता. एकटा असून ही त्याची जाणीव होऊ न देता, किंवा जे आहे तेच फार सुंदर, पवित्र अन संपन्न आहे ही त्याची जगण्याची philosophy असावी बहुधा..
असा हा रघु जाऊन आज वर्ष लोटलं ..घरच्यांना त्याची वेळोवेळी आठवण येत असेलच ...कारण आपणच त्याचं सर्वस्व मानलं त्यांनी... त्याला ही शब्दांजली ...
पण ए रघु एक सांग ना, तिथे तात्यासाहेब, इंदिरा काकी भेटल्याच असतील अन तुम्ही तिथे आता एकत्र नांदत असाल ना ..इथे असताना फार काळ एकत्र नव्हता ना .आणि अरे हो सुमंत अप्पा, आमचे बापु, आबा, काकी, यांना पण भेटत जा रे ...माधव बाबांना सांग मालती काकी ही आल्यात कालच तिकडे. अन तुमच्या मैफिली रंगतात का रे...तसेच गप्पांचे फड अन चर्चा. तु जरा येत जात रहा तिकडे रे बाबा... बाजूला विमल आत्या, कमल आत्या, मालन आत्या ही आहेत. सोबत त्यांचा लाडका भाऊ कांता काका, कडेकर अण्णा अन रामदासी ही आहेतच त्यांच्या बायकांच्या तक्रारी करायला. माई आत्या ला पहाटेच्या पूजेत मदत कर रे, त्यांना बाहेरचा चहा, पाणी चालत नाही. तसे काळजी वाहू रमेश बापु आहेत सर्वांची काळजी घेण्यासाठी अन त्यांच्या सोबत अरुण दादा ही आहे. तू थोडी मदत करत जा फ़क्त. वत्सला काकींना म्हणावं दादा एकदम ठीक आहेत, काळजी करू नका. नाणी पंडित, बाबासाहेब मुळे, भगवान राव मुळे..सुशीला ताई आणि आपले खुप सगे सोयरे ही आहेत तिकडे, त्यांनाही निरोप दे. सर्वांना सांग इकडे सर्व अलबेल आहे अजिबात काळजी करू नका. अन हो काकु तुझ्या बाजूलाच उभी असेल खोळंबून तिला मी नमस्कार केला म्हणून सांग. नाही तर पुन्हा तक्रार करायची, काय बाई हल्लीचे पोरं .... बाकी आपले पूर्वज (भाऊ, नाना, काका) आता फार थकले असतील ना त्याना ही नमस्कार सांग रे बाबा. बाकी आमचा कालिदास अन राजु भेटला का रे ??
अन आता एक निक्षून सांगतो, तुम्ही तिथे खूप जण आहात आता, तेंव्हा इकडून अजिबात म्हणजे अजिबात कोणालाही बोलवायचं नाही..., तुम्ही तिथे मस्त अन आम्ही इथे ...काही शुभ अशुभ क्षणी तुमचे आवाहन करु तेंव्हा तात्पुरते प्रकट होत जा आशीर्वाद रुपी...आम्ही तुम्हाला ठेवलंय सुरक्षित आमच्या मोबाईल च्या अन जीवनाच्या गॅलरीत... कधी स्टेटस म्हणुन तर कधी आठवण म्हणुन ...तुमचा कॅमेरा एवढा प्रभावी आहे की तुम्ही तिकडून आम्हाला पाहूच शकता. सर्व जण मिळून सांगा तिकडे की आता इकडून कोणीही येणार नाही..आम्हाला हे सर्व जण हवे आहेत.
नांदा सौख्य भरे
शरद पुराणिक
140221
Comments