गुरू माझा यज्ञ मार्तंण्ड, बहु सोमयाजी, कर्मयोगी, ज्ञानयोगी, निघाला घेऊन यज्ञध्वज करण्या यज्ञीय कार्यास राजयोगी




 गुरू माझा यज्ञ मार्तंण्ड, बहु सोमयाजी, कर्मयोगी, ज्ञानयोगी, निघाला घेऊन यज्ञध्वज करण्या यज्ञीय कार्यास राजयोगी


देवपुर्व दशरात्र ममहासोमयाग - 21 जानेवारी ते 4 फेब्रुवारी 2023

जयपूर मंदीर, वृंदावन, उत्तर प्रदेश


इवलेसे रोप लावियेले द्वारी |

त्याचा वेलू गेला गगनावरी ||

प्रवर्ग्य फुलला सोमयाग बहरला |

वाहता आहुती प्रेमभावें, अग्नी गगनी भिडला ||

वसुंधरे चे प्रेमे यज्ञीय सेवे देह अर्पियेला |!

सृष्टीयेचे रक्षणी याग योजियेला ||

प्रवर्ग्य फुलला ...सोमयाग बहरला !! 


माझ्या या पूर्वीच्या अनेक लेख मालिकेतून मी या कार्याविषयी भरपुर लिहिलं आहे. अगदीच ताजे संदर्भ द्यायचे झाल्यास खडकी (बीड) येथे पार पडलेला द्विरात्र अंगिरस सोमयाग,  SVYASA विद्यापीठ बेंगलुरु इथे पार पडलेला पशुकाम महासोमयाग यज्ञ सोहळा आणि  नंतर लगेच पुणे येथे सतत महिनाभर पार पडलेला दिव्य शिवपूजन सोहळा. त्यात ही त्रिशताब्दी  असा अमृतयोग या वर्षी होता ..मोठ्या महाराजांच जन्मशताब्दी वर्ष, सेलूकर घराण्याच्या अग्निहोत्र दीक्षेला ही 100 वर्ष आणि पार्थिव शिवपूजन सोहळ्याची ही 100 वर्ष.  या प्रत्येक यज्ञीय आणि इतर अनुष्ठानाचे मी माझ्या बाल, अज्ञानी (हो मी स्वतःला अज्ञानी च समजतो - ते कार्यच एवढे दिव्य आहे) बुद्धीने जसं जमेल तसं त्याच वर्णन करून आपल्या पर्यंत पोचवलं होतंच.  कोणाला त्या विषयी पुन्हा वाचुन घेण्याची, किंवा नव्याने ते वाचण्याची इच्छा असेल तर त्याची लिंक खाली देत आहे - फ़क्त संदर्भ म्हणून.


आदरणीय श्री यज्ञेश्वर महाराजांनी 2003 साली अग्निहोत्र दीक्षा घेतली आणि  गेल्या वीस वर्षांत 28 ते 30 सोमयाग त्यांनी केले. त्यात ही महामारीच्या काळात बंधनं असल्या कारणाने दोन वर्षे काहीही यज्ञीय कार्य न घडल्याची एक खंत होती, पण फेब्रुवारी 22 ला निघालेला हा रथ आता दिव्य गतीने मार्गस्थ होत आहे. गेल्या वर्षभरातील हा तिसरा मोठा याग त्यांनी आयोजिला. संकल्प ही त्यांचाच, तयारीही त्यांनीच केली आणि आज त्याचा बिगुल वाजला.


1917 साली निर्मिलेल्या एका भव्य मंदिर ...खरं तर याला राजवाडा, महाल की मंदिर म्हणावं हा प्रश्नच पडतो. जयपूर चे राजे सवाई माधवसिंग यांनी याचं निर्माण केलं. ही वास्तू निर्माण करण्यासाठी 30 वर्षे लागली - या वरून त्याच्या भव्यतेचा अंदाज येऊच शकतो.  बाके बिहारी यांचा साक्षात जिथे आज ही वावर आहे त्या पवित्र वृंदावन  भूमीत तो घडतोय. महाराज प्रत्येक कार्याची वास्तु निवडताना काहीतरी विशेष अशीच निवडतात, त्यांच्या दृष्टीतून काय दिसतं हे त्यांनाच माहीत. गेली 8 ते 10 दिवस तिथे स्वतः हजर राहुन हव्या त्या सर्व सोयी सुविधा निर्मित करून स्वतः ची खरी ओळख हरवलेल्या त्या वास्तूत आज अग्निनारायनाच्या प्रखर तेजाने तिथे दिव्यत्व  स्थापित झालं.  आज तीचं पालटलेलं रूप ज्यांनी याची देही याची डोळा अनुभवलं त्यांनी मला विशेष टिप्पणी करून जरूर कळवावे ही विनंती.  अन जस जस प्रवर्ग्य आणि महा आहुती यांची त्यात भर पडेल तेंव्हा तिथे काय होईल याच कल्पनेनं मन भारावून गेलंय. विश्वरूप घेऊन दर्शन देनारे तिथेच आहेत आसपास, येऊन जातील कुठल्या न कुठल्या रुपात. ज्याचं पुण्य, दृष्टी आणि नशीब जोरदार त्यांना ते नक्की घडणार यात शंका नाही. 


महाराष्ट्रातून अनेक शिष्य परिवार तिथे गेले आहेत. त्यातील आमच्या अनेक भगिनी नऊवारी पातळ नेसून, डोक्यावर घागर, वृंदावन घेऊन, तर महाराज मायबाई नेहेमीप्रमाणे ही तेजोमूर्ती रूप त्या सोहळ्यास उपस्थित होतेच.  खरं तर त्या दोघांच्या आग्रही आमंत्रणा मुळे ...म्हणजे आई बाप पोरा बाळांना चार दिवस माहेरी बोलावतात, अगदी त्याच मायेने आणि प्रेमापोटी मायबाई ही सर्वांची आई होऊन बोलवतात ...मग लेकरच ती, त्याच ओढीने निघतात. आणि दोघेही स्वतःची सोडून इतरांची काळजी इतकी घेतात की ..काय सांगु. 

असा तो सर्व परिवार, वेदपाठ शाळेचे विद्यार्थी, गुरू जण, असा तो समस्त परिवार एकत्र घेऊन या दिव्य कार्याची अनुभूती घेत आहेत. 


पुर्व तयारी, यज्ञ कुंड, यज्ञ शाळा, मंडप निर्मिती,  सोबत आसपास ची दर्शन, शाही खानपान असं करत करत काल संध्याकाळी त्याच राजवाड्यात अग्निस्थापना, आज शोभायात्रा, ध्वजारोहन आणि संध्याकाळी दिक्षा विधी झाला....सकाळी भरजरी नऊवारी साडी घालून मायबाई तर रंगीत काठाचं धोतर घातलेलं ते रूप दिक्षा विधी नंतर ते सर्व त्यागून शुभ्रवस्त्रात अशी ही दोनीही मोहक रूप आमच्या  तिथे उपस्थित मंडळींनी पाठवली आहेत ..ते तसेच आपणास पाठवतो. 


जर आपणास शक्य असेल तर 4 फेब्रुवारी पर्यंत आवर्जून  जाऊन या... फिरणे, पाहणे असं सर्वांगी होईल ..नवचंडी,. शतचंडी, गणेश याग अशी ही अनुष्ठाने आहेतच, या शिवाय रोज श्रीसूक्त हवन आणि यज्ञातील प्रमुख अनुष्ठाने असा भरगच्च कार्यक्रम आहे .....आणि हो थंडी जरा जास्त आहे.. गरम कपडे सोबत असू द्या...बाकी महाराज धोतर आणि पंचावर दिवस रात्र वावरत आहेत...कसं ते त्यांनाच माहीत...


जसं जमेल तसं पुढचे update देत राहीनच ...माझ्या कर्मभूमी वरून...

(वर लिहिल्या प्रमाणे जुने संदर्भ इथे आहेत) 

https://m.facebook.com/story.php?story_fbid=pfbid029E1N7ktpCWMm5uaxkDBUzJjVf2ZLsFFX3MEcmk4zn3xV1SQ2ZsdgmTL13AU5qYwBl&id=742431662&mibextid=Nif5oz


https://youtu.be/oEHxgZiI450

(हा व्हिडिओ जरा मोठा आहे पण श्रोत्यांची भाषणं जरूर ऐकावीत) 


!! यज्ञ नारायण भगवान की जय !!


शरद पुराणिक

210123...सैदापुर

Comments

Popular posts from this blog

ओढ लावती अशी जीवाला गावाकडची होळी

गौरी गणपती