या या नमो नी, हिराबा च्या नरेंद्र न बरं नाय केलं ग बया !!

 या या नमो नी, हिराबा च्या नरेंद्र न बरं नाय केलं ग बया !!


काय राव मोदी जी तुम्ही असं करताय

अजिबातच  पाहिजे तसं वागत नाहीत

एकच तर सख्खी ती माऊली होती

तिलाच असं शांत शांत घेऊन गेलात ?


जरा गोळा केले असते हजारो लाखो

पांढऱ्या शुभ्र कपड्यावर काळे चष्मे

लपवायला आसवं, डोक्यावर दुर्बिणी

उंची उंची  गाड्यांचे ताफे पण नाहीत 


राहिला भला मोठा फुलांनी सजलेला ट्रक

गेलाबाजार एखादा रथ ही नाही का  हो?

शे दोनशे टोपल्या फुलं ही नाही दिसली

खंडीभर पुष्पचक्र ही अर्पण नाही केली


एवढे तुम्ही चिंगूस असाल माहीत नव्हतं

जन्म, मरण काही असो  सोहळे हवेत आम्हा

नको आम्हाला तो शुद्ध, सभ्य, साधा आचार 

कसा सहन करू हा चांगुलपणा चा भार ?


साष्टांग दंडवत घालतो काय मोठा माणूस ?

कोणी असं अनवाणी चालतं का अंत्ययात्रेत ?

तुम्ही फ़क्त आवाज द्यायचा होता की हो

स्वतः कशाला खांदा दिलात उगाच या वयात


अन काहीच झालं नसल्यागत वागलात

दिनचर्या ही तशीच जगलात नित्य नियमित

ना नाटकी भावनांचा आक्रोश ना आसवं 

खोटे आलिंगण नाही ना बिलगणे, कुरवाळणे


असं नसतं राव ....आम्हाला शांत करायच

यातून काहीतरी हाती लागेल असं वाटलं

पण तुम्ही तर ते सारं सारं उलटंच केलं

आम्ही गिधाडांनी आता काय करावं ??


....जाऊ द्या मी  निघतो यात्रेला....

....जोडलेलं तोडायला....


शरद पुराणिक

311222

Comments

Popular posts from this blog

ओढ लावती अशी जीवाला गावाकडची होळी

गौरी गणपती