TTMM ...तू तुझं, मी माझं - नवरात्र अन सीमोल्लंघन...
TTMM ...तू तुझं, मी माझं - नवरात्र अन सीमोल्लंघन...
परवाच्या आंग्ल भाषेतील लेखात मी नवरात्र, पुर्व तयारी आणि खाजगी गोष्टी सांगायच्या की नाही या वर बराच उहापोह केला अन त्यावर मित्र, मार्गदर्शक, पाठीराखे, सखे, मित्र असे काही कडाडून भडकले की विचारूच नका. आणि मला पुन्हा पुन्हा सर्व काही सांगून लिहिलं नाही तर धमकीवजा, काही प्रेमळ सल्ले तर काही अगदीच वास्तविक व्यावहारिक सल्ले मिळाले..आणि त्यांच्या त्या धमक्यांना घाबरुन का होईना मी लिहायला घेतलय बरं का, आर नाही तर पार !! मग चार आठ दिवस शांत बसलेलं ते सारं वळवळ करतच होतं ...मग हाय काय अन नाय काय.
त्याचं झाल असं की मी 19 तारखेला व्यावसायिक स्थळी पोचलो... नेहेमी वेळेत येणारी रेल्वे नेमकी उशिरा पोचली ...सोबत बायकोने असं काही ओझं दिलं होतं की विचारु नका. जणू मी आता कुठे जंगलात किंवा त्या नवनाथ मालिकेतील पात्र जसे फिरताना कुठेही वास्तव्य करतात... तीन भल्या मोठया पिशव्या... एकात धुवायला नेलेले कपडे, दुसऱ्यात एक शेगडी, रेग्युलेटर, काही कढई वजा भांडी, चमचे तवा ..तर एक सर्वात जड थैली ज्यात ...भाजलेले मसाला शेंगदाणे, दाण्याचं कूट (डब्बा भरून), बटाट्याचा किस तळलेला, उपवासाचा चिवडा (अर्थात घरी केलेला), साबुदाणा आणि सुकामेवा लाडू, दाण्याचे लाडू, नारळ वड्या (ताज्या), भाजलेली भगर, भाजलेल उपवास भाजनी पीठ, खजूर...( काही राहिलं तर नाही ना) ...शेंगड्याच्या शेवया...
एकदाचा वाकत वाकत स्टेशन बाहेर आलो, चहा घेण्याची तीव्र इच्छा होती पण टाळून जरा चालत जाण्याची हिंमत केली ..इथे रिक्षा बिक्षा नाही, कोणाला बोलवावं हा आपला स्वभाव नाही .. अन साहेबी थाट दाखवून गाडी बोलावणं ही जमत नाही.. पण दैव बलवत्तर एक परगावी सीट भरुन जाणारा थांबला ...रिकामाच होता, तो लगेच तयार झाला अन मी इप्सित स्थळी पोचलो.. आता खरी परीक्षा होती , मार ऐटीत घेऊन तर आलो पण हे आपल्याला झेपणार का ? या विचारात आणि कामाच्या व्यापात ती पिशवी न उघडता तशीच ठेवली की हो ...एरवी अगदी पाण्याचा पेला ही हातात मिळणारे आपन हे करू या वर इतरांचा सोडा, माझाच विश्वास नव्हता. म्हणजे जेवण झाल्यावर हात धुवायला जाण्यासाठी परिसंवाद भरवून त्याचं पार पापड होई पर्यंत तसेच बसणारे आपण ...अन हे !!! आहे ना गंमत. या दरम्यान दोनदा आठवण देऊन ही ती पिशवी उघडण्याचं धारिष्टय मी केलं नाही, शेवटी मुंग्या होतील हो असा संदेश मिळाल्यावर मात्र मी ती न उघडता तिच्या भोवती मुंग्या मारण्याचा खडू मारुन ठेउन दिली... उगाच आपल्यावर आळ नको बाबा.
हा हा म्हणता घटस्थापना आली, सकाळी पाच चा गजर झाला अन चेतनामय शरीर ते कसली त्याला साद घालतय, एक दोन वेळा वाजुन थकलं पण उठलो... अंथरूण आवरुन, घरं झाडली, भांडी पिशवी बाहेर काढुन घासली, आता प्रश्नांची मालिका होती आज काय ?? या घोळात दोनदा चहा ढोसला...पुजा पाठ , कुमारिका पुजन, आवरून बघु म्हणून तसाच आंघोळ, करून शुचिर्भूत होऊन सर्व पुजा, पाठ विधि, आटोपून पुन्हा KBC खेळलो... भगर ठरली, ठेवली अन केली ...सोवत लाडु घेतले, देवाला नैवेद्द ठेवला अन ...सुरू झाला तो खेळ. दिवस कटला, आता रात्रीची बारी ....उपवास भाजनी काढली, त्याला फोडणी (फ़क्त तूप , मिरची बरं का), अन त्याचा उपमा केला अन दिवास संपला....पून्हा तेच पण आता हात सरसावले होते अन फटाफट सर्व ठरून होत होतं. नंतर आमचे खोलीमित्र आले, त्यांनाही उपवास होते, ते साबुदाणा विकत घेऊन आले, बटाटे टाकून खिचडी , दुध फळं, भगर, खीर आणि बरेच काही.. सकाळी झाडलोट, भांडी, फुलं तोडून आणणे (हे मात्र आयुष्यात प्रथमच.. कारण तेवढया सकाळी मिळणार नाही) पुजा, पाठ, फराळ बनवणे, डब्यात भरणे, संध्याकाळी ते धुऊन पुन्हा चहा, कपडे धुणे (इथेही मी अगदी बेडशीट, शाल, उशी खोळ, सोवळे असं सर्व धुतलंय) फराळ तयारी होम हवन ...काय व्यस्त 9 दिवस होते विचारुच नका. कार्यालयात ही तेवढाच व्यग्र आणि व्यस्त कार्यक्रम.
एक रुखरुख आहेच, देव दर्शन काही झालं नाही. पण मग ते विविध रुपात मिळतं तेच पाहायचं अन समाधान मानायचं... शेजारची छोटीशी आमु एक दोन वेळा पहाटे उठून माझ्या दारात रांगोळी काढून गेली ....शरीराने कुठलाही त्रास दिला नाही, रोज जाणारे लाईट पहाटे वाचताना गेले नाहीत, कंटाळा आला नाही, रोज दूध, दही ताज मिळालं, freeze नसतानाही नासलं नाही .. उरलं नाही पुरलंच भरपूर ....अजुन काय पाहिजे ?
तिकडे सौ ही तितक्याच व्यस्त, भरगच्च श्रावणमास, त्या नंतर गणपती, गौरी, पाहुणे असं सर्व करून ती तिचं आणि मी माझं TTMM नवरात्र आम्ही साजरं केलं.. घरच्या पूजेच्या सर्व जबाबदाऱ्या दोनीही चिरंजीवांनी सांभाळून घेतल्या . घरी तर सर्व व्यवस्थित नैवेद्य, सुवासिनी, ब्राम्हण, कुमारिका पुजन, भोजन सर्व झालंच.. मी ही पहाटेच खजूर, वेलची, लवंग आणि केळी घालून शिरा केला, सुवासिन, ब्राम्हण, कुमारिकेला अर्पण केला, थोडा डब्यात घेतला अन ऑफिसला आलो .आज दिवसभर इकडे कर्नाटक पद्धतीने खंडेनवमीची आयुध पुजा आटोपून मी खरं खुरं सीमोल्लंघन करून घरी निघालो आहे....या सीमोल्लंघनाचं समाधान आणि आनंद वेगळाच आहे. इथं शरीर अजून यातुनच सुटका होऊ देत नाही तोवर दिवाळीचे वेध ..नको तो विचार आज नको ...पाहु ...अजुन कोजागिरी व्हायचीये हो !
चला येताय काय सीमोल्लंघनाला....विजयादशमी निमित्त शुभेच्छा @@ जय जगदंब...
शरद पुराणिक
यादगीर रेल्वे स्टेशन
झुमे सारी रात सारी रात ( गाडी मे )...
मी आणि बर्थ गरबा खेळत ..
Comments