गप गुमान खाली बघुन हादड ना - उगाच का टीवल्या बावल्या

गप गुमान खाली बघुन हादड ना - उगाच का टीवल्या बावल्या


आजचा विषय माझ्या खवय्येगिरी शी संबंधित आहे.  हो मी खादाड आहेच पण फार जास्त हॉटेलींग आम्ही करत नाही...त्या मागे अनंत कारणं आहेत, ते पुढे येईलच. मुळातच आमची जडणघडण अशा वातावरणात झाली आहे जिथे बाहेरचं सोडा पण घरी खाण्यासाठी ही नियमावली होती. काळ बदलला आम्ही पोटापाण्यासाठी मोठ्या शहरात आलो आणि हॉटेल आणि आमचा घरोबा वाढला. नंतर विवाह झाला, मुलं झाली, थोडा विरंगुळा म्हणून कधी तरी बाहेर पडायचं. आधी मंडळी घरीच करू असा आग्रह आज ही धरतात  पण मग त्यात वेळ जातो आणि गप्पा, मुलांसोबत वेळ घालणे राहुन जातात ...हो नाही करत बाहेर पडायचे ...आणि कुठेतरी बस्तान बसवायचे.  


गंमत सुरू होते ती पार्किंग पासून, जिथे जागा असते तिथे तो सुरक्षा रक्षक गाडी लावू देत नाही. त्याच्या शिट्टीच्या तालावर तो नाचवुन त्याला जिथे वाटल तिथे लावायची.   हल्ली मला शंका येते की भंडारा, लंघर ला गर्दी नसते एवढी प्रत्येक छोट्या मोठ्या हॉटेल बाहेर. नंबर लाऊन आवतनाची वाट पाहणे हा एकमेव पर्याय असतो. या दरम्यान ही बरेच मजेशीर प्रसंग पाहायला मिळतात. आता आम्ही टू बाय टू च्या कधी एक तर कधी दोन तीन  फॅमिली, त्यामुळे साहजिकच मोठा टेबल लागायचा.  आपण जागा मिळवुन कसेबसे बसलो की काय ऑर्डर करायचं या वर परिसंवाद होऊन काही तरी थाळीत येऊन पडलं आणि पवित्र झालं असं म्हणायचं ...पण ऑर्डर ते जेवण येण्याच्या प्रक्रियेत बरंच काही घडतं ...एक तर तो ऑर्डर घेणारा म्हणजे अगदी हॉटेलचा मालक किंवा त्याही वरचढ त्याचा रुबाब... आपण आवाज द्यावा तर तो टाय, सुटा बुटातला साहेब बोटांनी खुनवुन थांबण्याची विनंती करणार. काही जण तर आपण अगदी पैसे न देता जेवणार की काय असा लुक देतात. किंवा त्या मेनुतील पदार्थ आपण कधीच पाहिले नाही, किंवा ते परवडणार नाहीत असं. काही जण आग्रहाने आपल्याला न आवडणारे पदार्थ खा असं सांगतात... आलटून पालटुन तेच मेनु सर्व ठिकाणी असतात ...पण मग अगदी MPSC किंवा UPSC चा पेपर आहे अशा अविर्भावात एकदाची ऑर्डर त्याच्या तोंडावर मारायची ....आता खरी गंमत असते...ते जेवण उशिरा येतं म्हणून किंवा त्यांचा खप व्हावा म्हणून मसाला पापड आणू का ? पुन्हा आपण एकमेकांना डोळ्याने विचारुन त्याचा चेंडु परतवून लावायचा. 


पोटात कावळे ओरडत असताना आजू बाजूच्या टेबलावारुन त्यावर अजून खिजवल्यासारखं करतात ...कितीही नाही म्हणलं तरी आपण त्यांनी काय मागवलय हे पाहण्याची उत्सुकता लपवू शकत नाही ...त्यात ही त्या बाजूची मंडळी जरा पाहण्यासारखी असली तर सारखं पाहतो ...आता आपल्या बाजूला हे सर्व लक्षात येत नाही असं नाही...त्यांनी पोरांकडे लक्ष द्यायचं, की आपल्या भिरभिरणाऱ्या नजरेवर लक्ष द्यायचं ...अशी सगळी तारांबळ ...ही परिस्थिती तशी सर्वच टेबलावर असते.  पण प्रकार वेगवेगळे, काही जण उत्सव म्हणून, काही नाईलाज म्हणुन तर काही जण खूप हौसेने नटून थटून असे विविध समूह आसपास असतात.  काही मुद्दाम जास्तीचा खर्च करून, रंगरंगोटी आणि इतरांचं लक्ष जावं या साठी धडपडत असतात.  एरवी सतत मराठी किंवा हिंदी बोलणारे तो वेटर आला की इंग्रजीत सुरू होतात. ते ही अशा सुरात जेणेकरून इतरांना त्यांचं भाषा ज्ञान कळावं.  

खरं तर वेटरला अशी रोज शेकडो गिऱ्हाईक असतात आणि एका नजरेत ते सर्व ओळखतात.. 


काही जनांसोबत काही गुणी बाळ असतात जो तो सर्व परिसर व्यापून, शक्य तेवढे आवाज, पळापळ, फेकाफेकी आणि हट्ट (या वर कितीही लिहू शकतो, कारण तेवढे अनुभव  आणि प्रकार पाहिले आहेत).  या प्रक्रियेत आई बाप ते सर्व हाताळण्यात व्यस्त असतात ...आधी डोळ्यांनी, नंतर चिमटा काढुन आणि इतरांनी ऐकावं असं वाटलं तर लगेच इंग्रजीतून रागावून काट्या चमच्याने आलेले स्टार्टर तोंडात ढकलणे ही क्रिया सुरू ठेवतात.  आजू बाजूची माणसं ही चेहेऱ्यावर हसू अन आत रागावलेले, खोटं खोटं हसु आणून तो व्यत्यय सहन करतात...हॉटेल च्या कर्मचाऱ्यांची ही अशीच काही अवस्था.  या सर्वात कोण कोणाच्या सासू सासऱ्या सोबत, किंवा आई वडिलांसोबत आहेत हे त्या टेबलावर च्या वातावरणातून लगेच लक्षात येते .. थोडा अभ्यास पाहिजे. 


आता आमचं ही जेवण आलेले असतं.. ते खायचं आणि चर्चेला नुकतेच निर्माण झालेले असंख्य विषय तोंडी लावत घ्यायचे.  एवढ्यात दूर एका कोपऱ्यात सर्व अगदी अमेरिका, लंडन अशा ठिकाणी जन्मलेले (असं त्यांना वाटतं), कपड्यांवर मी बोलणार नाही असा मित्र मैत्रिणी असा एक समूह ...ते हॉटेल फ़क्त आणि फ़क्त त्यांच्यासाठी अशा भावनेत आणि सभोवताली अगदी झाडी डोंगर आहे अशी कल्पना करत असावेत ...कधी हसणं, ओरडणं, तर रडणं ही ...(अजून बरेच प्रकार आहेत ..ते न लिहिलेले बरे)...बील देतांना खरे मित्र कळतात लगेच. 


त्या विश्वात येणाऱ्या प्रत्येक व्यक्ती कडे मोबाईल नसेल तर ते बहुतेक येऊ देत नसावेत, एवढे काही लोक त्यांच्या फोन मध्ये व्यस्त असतात .. परवा एक फॅमिली आली ..आई वडील दोन तरुण मुली ..चार जण आले बसले आणि फोन मध्ये गुंगले.. एक दोन वेळा वेटर ही येऊन गेला ...प्रत्येकाने आपली ऑर्डर दिली आणि पून्हा फोन..जेवण आलं, झालं आणि निघाले ...साधारणपणे एक तास भर वेटर शी जे बोलले तेवढीच चर्चा काय ती ही आपसात नाहीच, बिल आलं आणि ते निघुन गेले .. मी विचार केला या पेक्षा घरी मागवुन घ्यायचं होतं... असो.


दुसरी गोष्ट खटकते म्हणजे तुम्ही एखाद्या दाक्षिणात्य उपहार गृहात गेलात तर तिथले पदार्थ खा ...Pizza है क्या, noodles, Manchurian विचारतात.......केवळ या अशा प्रभृती मुळे pizza आणि paavbhaji ठेवावीच लागते असं मला अनेक हॉटेल वाले बोलले...आता तर italian, thai असे ही पदार्थ नाक्यावर मिळतात ...पण भाकरी, आणि तत्सम आपले पदार्थ मिळने म्हणजे नशीब.


एक अजून भारी गोष्ट आहे ...तुम्ही ग्रुप मध्ये गेला की हा अनुभव हमखास ...ऑर्डर देताना अनेकांना भूक कमी असते ..स्टार्टर खाण झालंय, काही तरी लाईट खाऊ, भूकच नाही, . एखाद्या ला भुक असते चांगली तो इथे मरतोच, बरं त्यांनी मागवलं तर सर्वच हात मारतात, पुन्हा तो ऑर्डर repeat करतानाही तेच ...अरे मोकळं खा, मागवा आवश्यक आहे ते ...उगाच भुक दाबु नका .. इतरांना उपाशी ठेऊ नका. यात ही एक दोन असे निघतात, काही तरी वेगळं मागवू या ...बरं अशी dish कुठे मिळत नाही ....बिल आलं की फोन, washroom, आणि लवकर निघणारे ही बरेच असतात.


काही सरसावलेले, काही नवखे, काही हौशी, काही गवसे असे अनंत पात्र या जत्रेत पाहायला मिळतात ...


जाऊ द्या, आपण आपलं खावं, बिल द्यावं अन  निघावं... उगाच कशाला टीवल्या बावल्या ..  अशा विचारात वेटर विचारतो सर काही sweet, dessert ...आता त्याला काय सांगू या एवढया dish खाउन मी तृप्त आहे रे बाबा ...लहानपणी पाहुणे रावळे आले तर सुधारस अन सण असेल तर पुरणपोळी ...हेच आमचे dessert अन sweet होतं ...घे बिल अन कर मोकळं ....


शरद पुराणिक

141022 

Comments

Popular posts from this blog

ओढ लावती अशी जीवाला गावाकडची होळी

गौरी गणपती