शब्द भाव सौदर्याने नटलेली एक आगळी कोजागरी
शब्द भाव सौदर्याने नटलेली एक आगळी कोजागरी
आमचा चेहेरेपुस्तिकेवर एक समूह आहे "कोब्रा vs देब्रा" फ़क्त टोमणेगिरी....प्रत्येक सण वार या वर ऊत्तम व्यक्त होण्याचे हे व्यासपीठ आहे. श्री मंदार संत यांनी ते मला उपलब्ध करुन दिले त्यासाठी त्यांचे आणि समूह सदस्यांचे अनंत आभार. कोकणस्थ आणि देशस्थ असे सर्व एकमेकांवर टोमणे मारत इथे निखळ, निकोप संवाद लहरी उमटत राहतात आणि अत्यंत खेळीमेळीने ते स्वीकारून आनंद घेतात... अगदी गौरी, गणपती, नवरात्र, श्रावणी, गुढी पाडवा, दिवाळी, श्रावणमास, दीप अमावस्या इत्यादी इत्यादी असे सर्व सण आम्ही चित्र, संवाद माध्यमातून इथे साजरे करतो...
काल मंदार जी नी एक सूचना केली की कोजागरी चारोळ्या करत समुह मध्यरात्री पर्यंत सुरू ठेऊन साजरी करायची.... त्या सर्व चारोळ्या एकत्र मी इथे पाठवत आहे ...
Mandar Sant :
कोब्रा देब्रा जमले सारे
शीतल या चांदण्यात
शुभेच्छा देता हरवले
भान सर्वांचे आनंदात..
Sharad Puranik :
कोजागिरीच्या छटा निराळ्या
कुठे दुधात केसर चारोळ्या
कुठे शब्दांच्या भाव चारोळ्या
चव भाव तेच गच्च्या वेगळ्या
तोच चंद्र तीच कोजागिरी
कालपरत्वे अर्थ बदलणारी
तीच चव अन लज्जत न्यारी
दुरावलेले प्रेम बंध जोडणारी
या रे या सारे या, केसर दूध आटवूया
चंद्र चांदण्या आकाश सोबत घेऊ या
मध्यरात्र ही होईलच तोवर खेळ खेळु या
दुधात प्रतिबिंब पाहून कोजागृती करू या
Sunita Gharpure :
मनाजोगती होवो सृष्टी..
मिळो धन-सुखाची संतुष्टी..
आनंदी रहा, नका होवू कष्टी..
चारोळी आवडली तर जरा करा पुष्टी.. 😊😉
Madhusudan Thatte :
चारोळी ही इवली इवली
कोजागीरिच्या दुधी तरंगली
कोण जागे? देवी वदली
मी मी जागा जनता वदली
Sumedha Athavale :
कोजागिरीच्या चांदण्यात तन मन धुंद ओले।
रातराणीच्या मादक गंधाने वारुणीविना बेधुंद झाले।।
शारदपौर्णिमेचा महिमा, निसर्गाने माखले चंदन।
कुंजवनी रास खेळे गोपींसवे नंदनंदन।।
कोजागिरीच्या रात्री लक्ष्मी घरा येई।
तयारी करा ओवाळणीची सईबाई ।।
Chhaya Bapat :
चंद्राची पृथ्वीवर किती माया
चांदण्याने न्हाऊ घातली काया
बघूनच स्वत:चे ते मोहक रूप
पृथ्वीस वाटे आज स्वत:चेच अप्रूप
निळ्या निळ्या आकाशात
बसूनी ऐटीत येई तो रथात
पहाता स्वत:चेच प्रतिबिंब दुधात
खुदकन हसला चंद्रमा गालात
Suyog Tamboli :
प्रेम रंगात न्हावू चंद्र दाखवतो शीतलता
कोब्रा देब्रा मध्ये सदा फुलू दे प्रेमाच्या वेली अन लता
दुधावर केशराची छटा आणि छाया
आपल्या ग्रुप मध्ये राहू दे अशीच माया
Ajay Kulkarni :
आज राती थाट आहे चांदण्याचा,
गाजलेले हास्य त्याचे पाहण्याचा
धुंद होऊनी तयाशी बोलण्याचा
भावणारे बोल त्याचे ऐकण्याचा
रोजचा वेडावणारा भाव त्याचा
आज तरिही वेगळासा भासणारा
गीत चंद्राचे मनाला ओढ लावी
दूर होई दाह सारा पोळणारा
हासण्याच्या आड आहे प्रश्न त्याचा
तो विचारी मानवाचे शल्य काही
छानसा संवाद होई चांदण्याशी
मौन जिंकावे अशी ही साद राही
Anand Malshe :
चंद्र विचारे चांदण्यांना,
आज दिसतोय मी कसा,
चांदण्या म्हणती त्याला,
हिरवळीवर ससुल्या जसा..
चंद्र आणि चांदणीची
आहे अनोखी जोडी,
कोजागिरीच्या रात्री
आटीव दुधाची गोडी..
Aarti Kelkar Dharkar:
कोजागिरी पौर्णिमेला ही अमृत वर्षा, मन मोहरून जाई द्विगुणित करी सर्वांच्या हर्षा.... !!! नवकवींची प्रतिभा दावी नवी आशा -आकांक्षा .... प्रत्येकाला करी, उत्कंठित ही प्रतिक्षा..!!!
Samruddhi Sharad Joshi, Kolhapur :
कोजागिरीचा चंद्रमा
मज आज गोड दिसावा.
स्वच्छ मनाच्या प्रतिबिंबाचा
तो आरसा असावा.
हरपून भान माझे
मी निरखून त्यास पाही.
सांगते खूप त्याला
पण बोलते न काही.
वाटे पाहून त्यास
बेधुंद आवळावे.
झोकुनी मिठीत त्याच्या
अलगद विरघळावे.
स्निग्धता ती अधीर ओठी
लोचने आतुरली भेटी.
खुणवुनिया प्रियेला,
तो हळूच हसावा.
लाजेचा रंग मग
गालावरी ओघाळावा
कोजागिरीचा चंद्र आज
भलताच गोड दिसावा.
नभाचा चंद्रमा पाही धरेकडे,
धरेचा मुखचंद्रमा पाही नभाकडे.
बिंब कोणते प्रतिबिंब कुणाचे ..
यासमयी भेद न व्हावा
कोजागिरीचा चंद्र आज
भलताच गोड दिसावा.
Sunita Joshi :
पूर्ण चंद्राच्या दर्शनानी
आली भरती सागरा
केशरी अन् मसाला दुधासाठी
जीव माझा तळमळला 😋
पूर्ण चंद्र तो बघता नभात
हसू उमलते अलगद गालात
केशरी दुधाचा चषक तो हातात
कोब्रा देब्रा सह सर्व ब्राह्मण फस्त करण्या जमतात ...🌝
चंद्र उगवला नभी
प्रकाश त्याचा घरोघरी
चंद्र किरण तो अमृत स्पर्श
लाभला हो ह्या धवल क्षिरी
Sunil Mangala Ramkrishna Deshpande:
शिंपुनी चांदणे स्वरांचे ,
पियुषासारखे अवीट गाता,
कोजागिरीच्या धवल शशिपरी,
स्वच्छ स्वर अन् मनाची लता !
Sujata Madhav Paranjape :
शरद ऋतू ची आली शीतल रात
चमचम चांदण्या निळ्या नभात
अमृताची बरसात आटीव दुधात
नभात चमकतो कोजगिरीचा चंद्र झोकात
Aniket Kiran Bhagwat :
आटवण्यासी दुग्ध घ्यावं ते हलकेच जरा ढवळून ,
मंदाग्नीवर अन् मग चारोळी ती घेते त्याला कवळून ...
चांदणाचे शिंपण
त्याला मनाचे लिंपण
चंद्र म्हंजे सुरेख दर्पेण
करू त्याला पुष्प अर्पण
चषकातुनी दूधाच्या
प्रतिबिंब गोड तयाचे 🎇
पाहूनी साजरी
ही कोजागिरी करे ⭐
"मंद प्रकाश चद्रांचा,
त्यात गोड स्वाद दुधाचा... विश्वास वाढु द्या नात्यांचा,
त्यात गोडवा असु द्या साखरेचा"
कोजागिरी पोर्णिमेनिमित्त हार्दिक शुभेच्छा.........
शरदाचे चांदणे,शीतल प्रकाशमान रात
करु करोनावर मात
नवीन वर्ष उजळुन टाकु दे सुख समृद्धीची वात
Vishwas Sinnarkar :
नवरात्रीच्या धावपळीतुन आता झालो स्वस्थ
मंदार ने दिलेले दुधाचे ग्लास आता करतो फस्त
Shashank Ambardekar :
कोजागरी रात्र आणि ती
सखे,
एक चंद्र नभात,
आणि एक घरात,
शुभ्र दुधापरी तिची कांती,
मधुर हास्य तुझ्या मुखात ।
पहावे नभाकडे
पहावे तुझ्याकडे,
आभाळी तुझी नजर जाताच
चंद्रालाही तुझा हेवा वाटे ।
आज चंद्र तोच
पण मुहूर्त वेगळा,
आज तू ही तीच,
आभास वेगळा ।
तुझ्या पापण्या जणू
नखशिखांत चांदण्या चमचमती,
आज तुझा सहवास प्रिये
तू माझ्यात मी तुझ्यात,
श्वास श्वासात विसावती ।
😉
हसण्यात तुझं रुसणं, रुसण्यात तुझं हसणं,
तुला पहात बसणं हाच छंद लागणं,
उमलत्या कळीसारखा तुझा गोडवा,
कोमल नाजूक पानांसारखा स्वभाव हळवा,
तुझं बोलणं म्हणजे प्रभाती प्रसन्न सूर लागणं,
तिर्थरूपी पंचामृत घेणं तसं तुझं सुमधुर हसणं,
परमेश्वराच्या हातूनच का त्या घडतात,
ऋणानुबंधाच्या गाठी अशाच का जुळतात ।।
🙏 असेल का ती राधा की असेल ती गौरी 🙏
💐💐💐💐💐
अशी ही आगळी कोजागृती जाहली हो साजरी
(आवडल्यास प्रत्येकाच्या नावासाहित share करा)
सोबत लिंक ही जोडत आहे :
https://m.facebook.com/groups/kbvsdb/permalink/5815263458518275/
शरद पुराणिक
सैदापुर, रायचूर कर्नाटक
091022
Comments