शिवधनुष्य स्पर्शीले आहे, ते पेलवणार ही आहे आणि तो विजयी क्षण आम्ही जगणार ही आहोत.
श्री यज्ञेशो विजयते !! यज्ञ नारायण भगवान की जय !!
शिवधनुष्य स्पर्शीले आहे, ते पेलवणार ही आहे आणि तो विजयी क्षण आम्ही जगणार ही आहोत.
!! ज्ञानभक्ती युक्त कर्मवीर व्हा !!
!! पराक्रमी पुरुषार्थी धर्मवीर व्हा !!
आदरणीय गुरू माऊलीस वंदन करून हा लेखन प्रपंच सुरू करतो. वरील दोन ओळीत या लेखाचा तसा म्हणल तर सार आहे. माझ्या मागिल अनेक लेखनातून "श्रावणमास शिवपूजन" या वर लिहीले आहेच. हा लेख त्याचाच पुढचा भाग आहे आणि असे अजून भाग येतीलच.
दोन वर्षांच्या कडीकुलपातुन या वर्षी हा सोहळा करण्याची संधी "शिव सामर्थ्याने, गुरू कृपेने, गुरुबंधूंच्या ओतप्रेत भक्तीने आणि दस्तुरखुद्द गुरू बहु सोमयाजी दीक्षित यज्ञ मार्तंड श्री यज्ञेश्वर सेलूकर जी महाराज" यांच्या आशीर्वादाने आम्हाला मिळाली. खरंतर ही सेवा घेण्यासाठी अनेक शहर / जिल्हे / तालुके तयार होते. त्यात कोविड चा दोन वर्षे सासुरवास यामुळे अनेक जण सरसावले होते. पण हे पुण्याचं दान माउलींनी पुण्याच्या पदरात टाकले आणि आम्ही कृतकतार्थ झालो. हे म्हणजे IPL चं यजमानपद मिळावं तसं काहीतरी. तिथे खेळ, स्पर्धा आणि बरेच काही (?) असते, पण इथे फ़क्त धार्मिक उद्देश आणि सेवा हेच घडतं. असो, इतर अनेक यजमानपदातील संभाव्य ठिकाणची मंडळी जर दुखावली असतील तर त्यांची माफी मागुन पुढे सरकतो.
महाराजांच्या वेद विद्यालायात संहिता शिकुन त्यातील अनेक विद्यार्थी पुण्यात पौरोहित्य व्यवसायात स्थिर होऊन स्थायिक आहेत ही जमेची बाजू होतीच. पण त्याच बरोबर माझ्यासारखी अनेक शिष्य मंडळी ही उद्योग, व्यवसाय, नोकरी किंवा काही सेवा निवृत्त ज्येष्ठ ही आहेत. मुळात विद्यार्थ्यांचा आग्रह तर होताच पण त्याच बरोबरीने शिष्य मंडळींची ही इच्छा होतीच. पण ते श्रध्येय वाटणं आणि प्रत्यक्षात ते अमलात आणणं याची जुळवाजुळव म्हणजे खरंच "शिवधनुष्य" पेलण्यासारखं च आहे.
गणेश मंडळांच्या सुरुवातीला होतात तशा आमच्याही बैठका साधारण वर्षभरा पूर्वी पासून सुरू होत्या. पण एकतर अवधी बराच असल्याने, आणि एकंदरीतच मनुष्य स्वभाव आहे "देखेंगे, कर लेंगे" म्हणुन त्याला हवी तशी गती मिळत नव्हती. पण काही जण मात्र अगदी मजबूत पाठपुरावा आणि सतत काही तरी घडवत होतेच. मी नामोल्लेख आवर्जुन टाळतो आहे कारण यातील सहभागी व्यक्तींची, आणि त्यांच्या मेहेनतीची, कार्याची व्याप्ती आणि यादी मोठी आहे, उगाच कोणी राहिले तर अन्याय होईल. तेंव्हा आपण सर्वच याचा भाग आहेत हे नक्की.
गुरुमहाराजांच्या संस्कारात वाढलेले आणि घडलेले विद्यार्थी, शिष्य यांनी हा शिवधनुष्य उचलन्यासाठी स्वतःच्या प्रबळ इच्छाशक्ती, भक्ती आणि प्रेम यांनी घडवलेला रथ हळूहळू चालत, धक्का मारत ओढत इथवर आणलाच. खरं तर अनंत अडथळ्यांची ही शर्यत आहे जी आज ही सुरूच आहे. पहिल्या एक दोन बैठकात तर असं वाटलं हे होईल की नाही. एक तर पुणे घरातील दूर दूर अंतर, व्यावसायिक जबाबदाऱ्या, कामाच्या वेळा यात आपण हे करू शकु की नाही या सह असंख्य प्रश्नांची मालिका घोंघावत होती. काही दिवसांनी गुरुमाऊलींनी त्यांच्या अनुभव, नितांत श्रद्धा आणि सकारात्मक, शांत, संयमी तिजोरीतुन अगदी एक दोन आणे सूचना रुपात दिले आणि त्या रथाला आता जरा धीमी का होईना गती मिळाली. भव्यदिव्य कार्यालय ज्याचं भाडं ऐकून आमचीच भंबेरी उडाली ते माउलींनी निश्चित केलं आणि तयारीला लागण्याचा निरोप देऊन पुन्हा त्यांच्या यज्ञीय कार्यात व्यस्त झाले. आता इथलं स्थानिक अष्टप्रधान मंडळ, इतर सदस्य, विद्यार्थी, शिष्य अशी अनेक मंडळ निधी संकलना साठी मोहिमेवर निघाली. दर कोस दर मजल, आज इथे तर उद्या तिथे, ही कॉलनी ती गल्ली, ती सोसायटी असा हा नित्यक्रम सुरू झाला. प्रत्येक जण आपल्या परीने आणि क्षमतेपेक्षा दुपटीने प्रयत्न करत होते, आहेत आणि करत राहणार आहेत. तन मन धन असं सर्वस्व गुरुचरणी अर्पित आणि भक्तीचा गुलाल उधळत हा दिव्य रथ आज खूप सजून, धजून, गुरू नामस्मरण आणि यज्ञ नारायणाच्या जयघोषात कार्यस्थळी पोचला आहे ...ती दिव्यपूर्ती लोकसहभाग, आणि सहकार्याने यशस्वी होण्यास श्री समर्थ आहेतच. 29 जुलै पासून सुरू होणाऱ्या या श्रावणमास शिवपूजनासाठी आदरणीय महाराज, सौ मायबाई आणि अनेक भक्तगण आपल्या कुटुंब कबिल्या सोबत "महेश सांस्कृतिक भवन" अप्पर इंदिरानगर इथे आज पोहचले आहेत...त्याची काही बोलके चित्र सोबत जोडत आहे.
आज अग्निस्थापन, त्या नंतर शुक्रवारी शोभायात्रा होऊन शिवपूजनाचा बिगुल वाजणार आहे ...इथवर पोचण्याच्या अनेक गमती जमती, किस्से असं बरंच काही पुढच्या लेखात...
यज्ञ नारायण भगवान की जय !!
शरद पुराणिक
270722
सैदापुर, रायचूर, कर्नाटक
Comments