आषाढीचा पवित्र दिवस अन साक्षात दत्तगुरु दर्शन - कुरवापुर
आषाढीचा पवित्र दिवस अन साक्षात दत्तगुरु दर्शन - कुरवापुर
नेमेची येते आषाढी
एकादशी दुप्पट खाशी
तशीच आताही आली
सर्वार्थाने दिव्य जाहली
खरं तर अगदी उपवास ही घडेल की नाही ही शंका घेऊन कांदेनवमी ची रात्र (खरं तर कांदेनवमी ला कांद्याची गरम गरम भजी खाऊन सुस्त लोळलो) काढली. इथे कर्नाटकात उपवास पद्धत वेगळी आहे, भात पोळी न खाता काही तरी नाश्त्याच्या गोष्टी (डोसा, उपमा) खाल्ल्या तरी ही तो घडतो. पण सुदैवाने आमचा canteen वाला साबुदाण्याची खिचडी देण्यासाठी तयार झाला, सोबत केळी अन दही मिळाल अन घडला की हो उपवास. खरं तर रविवार होता तरीही आम्ही कार्यालयात होतो जराशी कामं आटोपुन निवांत झालो अन चमत्कार झाला. आमचे सहकारी साई क्षीरसागर यांनी अचानक कुरवापुर ला जाण्याचा प्रस्ताव मांडला. तो स्वतः ही दत्त भक्त आहे आणि नित्य गुरुचरित्र पारायण आणि सदैव दत्त चरणी लीन असतो. क्षणाचाही विलंब न करता गाडी सुसाट निघाली, सोबत शेजारी वीरकुमार आणि त्याचे मुलं घेऊन निघालो.
कृष्णा स्टेशन पासून २७ कि. मी. अंतरावर बेट (रायचुर कर्नाटक)
श्रीपादश्रीवल्लभ
तपोभूमी, ध्यानधारणा, उपासनेसाठी उत्तम ठिकाण
श्रीपाद श्रीवल्लभ पादुका
आमची कंपनी आणि कुरवापुर म्हणजे अगदी 60 किमी अंतर. रस्त्यात फुल, हार, फळं, प्रसाद आणि दर्शनासाठी धोतर पंचा वगैरे खरेदी झाली. पावसाची भुरभुर सुरूच होती. दत्त, विठ्ठल अशी विविध भक्तिसंगीत यात गाडीत आषाढीचा रंग फुलत गेला. तिकडे वारकरी पायी दिंडीने पंढरीत पोचले होते अन आम्ही ती अनुभुती वाहनातून निघालो. कृष्णा नदीच्या काठावर गाडी थांबली. पावसाळा असल्याने नदी ओसंडुन वाहत होती. पलीकडे दत्त माऊलीचे देऊळ खुणावत होते. पुढचा प्रवास बोटीने होता. जणू आमचीच वाट पाहत असावी अशी एक बोट आली, भरली अन निघालीही... सहजच गाणं ओठाशी आलं ...निघालो घेऊन दत्ताची पालखी. फोटो, व्हिडिओ असं करत करत नदीचा तिर गाठला. खरं तर पावसाळी हवा, थेंब थेंब येतच होते ...पण क्षणाचाही विलंब न करता कपडे बदलुन कृष्णेच्या पवित्र नदी पात्रात स्नान केलं... थंडी नाही साधी हुडहुडी ही भरली नाही. वीरकुमार च्या अम्मू आणि पवन ने ही भरपूर आनंद घेत स्नान केले. छोट्या अमुला अजून खेळायचं होतं पण दर्शनाची ओढ ते करू देत नव्हती. नवे कोरे धोतर, पंचे नेसून दत्त दर्शनासाठी शुचिर्भूत होऊन नदीपात्रातुन वर चालत गेलो. अगदी एकादशी असून ही फार गर्दी नव्हती, आमच्या बोटीत मुंबईतील एक मोठे कुटुंब तिथे राहण्याच्या योजनेने आले होते. अगदी तुरळक भक्त गण, काही सभोवताली 108 प्रदक्षिणा करत होते.
आमच्या पिशव्या एका बाजूला ठेऊन, गळा दाबलेले मोबाईल कंबरेला खोचून मंदिरात प्रवेश केला. आता आम्ही आमचे नव्हतो, समोर साक्षात दत्तगुरू, पुष्पहार आणि पूजेने सजलेले, फक्त दिव्याचा मंद प्रकाश. एक तेजपुंज गुरुजी समोर आले, पूजा साहित्याची देवाणघेवाण झाली. निरांजन ओवाळून त्याच तेजात गुरूंचे दिव्य दर्शन होत गेले आणि आम्ही ते न्याहाळत गेलो. ती अनुभूती शब्दांत मांडता येणे केवळ अशक्य. बाहेर येउन संक्षिप्त गुरुचरित्र, एकादशी असल्याने भगवद्गीता अशी उपासना करून, प्रदक्षिणा सुरू केल्या. जिथे श्रीपाद वल्लभ यांनी 14 वर्षे तपस्या आणि वास्तव केले तो वटवृक्ष ही समोर दिमाखात डोलतोय. प्रसादात मिळालेले केळी, सफरचंद, संत्र आम्ही गुरुजींच्या आशिर्वादाने घेतली. दर्शनाची वस्त्र बदलून इच्छा नसतानाही तिथुन बाहेर पडलो. अनेकदा वाटलं, पुन्हा जावं आणि गुरुसानिध्यात बसून राहावे, पण अंधार होण्याआधी होडीने त्या बाजूला जाणे गरजेच होत.
दत्तभक्तांचा वेद समजला जाणाऱ्या ‘गुरूचरित्र’ या मंत्र ग्रंथांतील अध्याय ५ ते १० हे प्रथम दत्तावतार यांच्याविषयी आहेत. भगवान दत्तात्रेय यांनी सुमती व आपलराज यांना दिलेल्या वचनाप्रमाणे त्यांच्या पोटी जो प्रथमावतार संपन्न केला ते श्रीपादवल्लभ होय. वयाच्या सोळाव्या वर्षी माता-पित्यांचा निरोप घेऊन श्रीपाद श्रीवल्लभ प्रथम गोकर्ण महाबळेश्वरला गेले व तेथून श्रीशैल पर्वतावर जाऊन तेथे त्यांनी काही काळ वास्तव्य केले. नंतर फिरत फिरत ते कुरवपूर येथे आले. तेथे बावीस वर्षे तपश्चर्या करून इथूनच ते अंतर्धान पावले
इथेच एक गुहा आहे, ही गुहा निसर्गनिर्मित असून प्राचीन आहे. या ठिकाणी श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामी यांनी १९१० मध्ये चातुर्थाश्रमीय चातुर्मास संपन्न केला. आता या ठिकाणी बांधकाम होऊन शिवमंदिर बांधले आहे.
या ठिकाणी टेंबे स्वामी महाराजांनी प्रत्येक संकटावर रामबाण उपाय असलेल्या घोरकष्टोधरण स्तोत्राची रचना केली
एका छोट्या खिडकीतून रांगत जाऊन एक माणूस मांडी घालुन बसू शकतो एवढीच ती आहे, जिथे एक शिवलिंग आणि स्वामींचा फोटो ठेवला आहे. तसंच रांगत परत बाहेर पडलो. तसा तो सर्व दिव्य परिसर जरा दुर्लक्षित आहे असं वाटलं.. अगदी स्वामींच्या वास्तव्याविषयी लिहिलेली माहीतीही स्पष्ट दिसत नाही. त्याच्याच बाजूला एक भलामोठा वटवृक्ष आहे जिथे अनेक लोक गुरुचरित्र पारायण करतात. तो एवढा भव्य आहे की कॅमेर्यात सामावत नाही. सोबत अनेक आठवणी फ़ोटो च्या रुपात जोडत आहेच.
परत बोटीने पैलतीरी, इथेही एक दोन मंदिर आहेत, त्या दर्शनानंतर चहा पाणी घेऊन परतीचा प्रवास सुरु झाला. कुठलाही थकवा नाही, आळस नाही अन तो दिव्य अनुभूतीचा भक्तिमय प्रवास उत्तरार्धात निघाला ....
संध्याकाळी शेजारी वीरकुमार ने आणुन दिलेल्या साबुदाणा खीचडी ने दिवसाची सांगता झाली.
दत्तगुरूंच्या गाणगापूर, पिठापुर, माहूर, कर्दळीवन सारखंच हे ही स्थान अवश्य पहावे असेच आहे ... अर्थात मी ही वरील कुठलीही ठिकाण अजून पाहिली नाहीत .... आजच्या या दिव्य दर्शनासाठी साईबाण्णा चे आभार मानावे तेवढे कमीच.
शरद पुराणिक
देवशयनी आषाढी एकादशी
कुरवापुर
Comments