मैदान गल्ली ....भजनी मंडळ....शाकंभरी ...एक आठवण
मैदान गल्ली ....भजनी मंडळ....शाकंभरी ...एक आठवण
गेले काही दिवस झाले काही लिहिणं झालंच नाही, आता काही चुटुपुट काव्य वगळता फारसं काही हातुन घडलंच नाही. ज्यांना याचा त्रास होतो ते किती सुखावले असतील ..बरं झालं बाबा हा एकदाचा थांबलाय, नाही तर काहीतरी रटाळ लिहुन पाठवतो ते ही हात हात लांब लचक. कधी ते वाचायचं अन उरवठ्यावर पुरवठा त्यावर काही तरी बोटं वाकडे, तिकडे करा, बळजबरी काही तरी प्रतिक्रिया द्या ...किती तो छळ रे बाबा. असो पण काय करणार माझी काही ही खोड मोडत नाही. आज लहानपणीची एक आठवण सतत गिरक्या घेत होती अन मग लिहायला घेतलं. खरं तर अगदीच सामान्य बालपण जगलो आम्ही, आताच्या पिढीला सांगितलं तर हसतात...पण कितीही लिहिलं तरी ते काही संपत नाही. असो.
तर आमच्या बीडच्या मैदान विठोबा गल्लीत महिलांचे एक भजनी मंडळ होतं. आमच्या मातोश्री ही त्याच्या एक अविभाज्य घटक होत्या , आज ही आहेतच, तश्याच गल्लीतील सर्व काकू आत्या मावशी. मैदान विठोबाचे एक छान मंदिर आहे. अतिशय वेगळी रचना. मंदिर एका गाभाऱ्यात, त्या समोर अजून एक छोटा गाभारा (इथे सप्ताह असेल तर उभे राहुन तास तास हजेरी लावण्याची जागा) आणि त्या समोर एक मोकळा आणि ऐसपैस असा सभामंडप, सर्वात शेवटी विठ्ठला अगदी समोर एक गरुड, मारुतीच छोटं मंदीर. एकादशी, द्वादशी आणि सर्व शुभ मुहूर्तावर, सण वार, कार्तिक महिना भरगच्च कार्यक्रम असायचे. गल्लीतील महिला मंडळाची भजन सेवा अव्याहत अगदी आज ही सुरू आहे. अगदीच चार दोन जणी ते एक मोठं विस्तारित भजनीमंडळ ज्यांचे रेडिओ, किर्तनमहोत्सव, दूरदर्शनवर कार्यक्रम झाले असा यशस्वी प्रवास मी स्वतः अनुभवला आहे. बरं हे मंदिर म्हणजे अगदी गल्लीतील रस्त्यावर आणि खुला सभामंडप असल्यानें ते भजन स्वर जाता येता दृष्टीस आणि कानावर पडत होतेच. आमच्याच नाही तर येणाऱ्या जाणाऱ्या सर्वांच्याच. मग कित्येक जनींचे नवरे, सासरे दीर, मुलं असे हे सर्व हे तिथुन वावरताना ती आतली बाई बिचारी डोळे विठ्ठलाकड करून टाळ वाजवण्यात मग्न (काही लोक याचा टाळ बडवणे हा ही उच्चार करतात). त्यात आमच्या मातोश्री आणि इतर अनेक मित्रांच्या आई या भारुड करायच्या आई आज ही करते, आता भारुड म्हणजे जरा अभिनय, उभं राहून बोलत चालत आणि हलकं नृत्य वजा हावभाव करून केलं तरंच ते भिडते, पोचते. आता वडिलांची, बाप्या लोकांची ऑफिसमधून, उद्योगावरून घरी जाण्याची वेळ आणि भारुडाची वेळ एकत्र आली तर त्या माउलीला दुहेरी अभिनय करावा लागे. इथे अध्यात्मिकतेलाही कडक धाक आणि संस्कार असं घट्ट आवरण होतं, आज ही आहे. जिथे अगदीच नाईलाज होता, ती माऊली त्या साहेबांच्या मागोमाग तडक घर गाठायची. याच्या ही अनेक गमती जमती होत्या. आता या काही किटी पार्टी करत नव्हत्या तरी काही पुरुषी अवतारांना ते आवडायच नाही.
जशा प्रत्येक समूहाच्या आणि संघटनांच्या काही ज्येष्ठ श्रेष्ठ प्रभृती असतात तशाच इथे ही काही नेत्या, उत्साही सदस्या होत्या. आता सर्वांची नावे घेणे शक्य नाही त्या सर्वांना आज या निमित्ताने नमस्कार. त्यात ही तगारे मावशी या मुख्य होत्या, त्यांच्या खालोखाल कुसुम काळे मावशी - हे एक भारदस्त व्यक्तिमत्त्व. दोन शालिनी म्हणजे एक माझी आई आणि दुसरी शालिनी मावशी मुळे, आमच्या आत्या विमलबाई कडेकर. खूप उल्लेख आहेत..एक तर गल्लीच सर्व नातेवाईकांनी भरून त्यामुळे सर्वच आहेत यात. तर तगारे मावशी चा विशेष उल्लेख तो यासाठी की ती माऊली मुळातच तेजपुंज, गोरी पान, पश्चिम महाराष्ट्र भाषेचा ठहराव, शांत संयंमी व्यक्तिमत्त्व. ते म्हणजे अगदीच तिखट जाळ पोह्यासमोर नारळाच्या दुधाचे दडपे पोहे अशा त्या आमच्या मराठवाडी घोळात त्या ही एकरुप होऊन गेल्या इतक्या की विचारू नका.
तर या तगारे मावशीकडे दरवर्षी शाकंभरी नवरात्र हा अतिशय भक्ती भाव आणि भव्यदिव्यतेने भरभरून असलेला सोहळा व्हायचा. माझ्या माहितीत तरी त्याकाळी शाकंभरी चे नवरात्र त्या प्रमाणावर फ़क्त यांच्या कडेच असायचे. वा व्वा त्या फ़क्त आठवणीने मी व्याकुळ झालोय... त्यातल्या त्यात शेवटचा दिवस विशेष, नऊ दिवस सजणारी ती देवी तिचे फुलांनी सजवलेले रूप, भजन पूजनाचा अलंकार, कुमारिकांचा पूजन सोहळा, अगदी त्यांच्या पायावर चंदनाचे लेप लाऊन त्यावर शिंपला उलटा ठेउन त्यावर तो रेघोळी रांगोळी, त्या वर कुंकवाचे बोटं, गजरे आणि भेटवस्तु असा किमान एक दोन तास चालणारा सोहळा ...त्या नंतर नैवेद्य आरती ...इथे संचार वगैरे उल्लेख मुद्दाम टाळतो कारण तो एक वेगळा विषय आहे...
या दरम्यान इकडे पोटात कावळे ओरडुन ओरडुन थकून जायचे, जेवणाची ती मेजवानी, अर्थात आमच्याकडे ही दर सणाला, मुहूर्ताला ही पुरण वरणाचे भरगच्च जेवण असायचे, आज ही असते अगदी आवर्जुन. पण इथे पुरणाची दिंड (कडबू), सोबत खीर, आणि इतर अनेक पदार्थांची रेलचेल. जेवायला संपूर्ण गल्ली अगदी चुलबंद आमंत्रण (टाळ बडवणे म्हनणारे येत नव्हते)..तसं या खाण्याचं अप्रुप का वाटावं हे आजही पडलेलं कोडंच, कारण या पेक्षा भरगच्च पदार्थ आणि स्वाद गौरी / महालक्ष्मी ला ही होते.. पण का कोण जाणे मला हा उत्सव फार आवडायचा ..त्यात एक लय होती, शिस्त होती, भक्तिभाव, श्रद्धा आणि परिपूर्णता होती. त्यात नऊवारी साडीत कुंकवाने माखलेली तगारे मावशी अक्षरशः शाकंभरी च वाटायची. नाही नाही म्हणता एक शे दोनशे माणूस होत असावं. काळे च्या वाडयात तगारे कुटुंब राहायचे, हे काळे म्हणजे आमच्या गल्लीतली मोठी आसामी ..राजकारणाचा वारसा....वाडा कसला ती एक मोठी वाडीच म्हणा ज्यात 15 ते 20 कुटुंब मालक किरायादार असे सुखात नांदत होते. बरं वाड्यात वाडे दोन आत मोठा पाटलांचा ही वाडा होता ..त्या वाड्याच्या भल्या मोठ्या ओसरीवर या पंगती बसायच्या ...याची जास्त गंमत होती. त्या सहभोजनाचा आनंद कदाचित पदार्थांपेक्षा जास्त आकर्षित करत असावा. एवढा तो स्वयंपाक सर्व माहिला एकत्र येऊन करायच्या.. कसलं कॅटरिंग अन आचारी... ही एक जमेची बाजु ज्या मुळे ते भोजन स्वादिष्ट वाटायचं...आज हे लिहिताना मी त्या घरातल्या आणि वाड्यातल्या प्रत्येक कोपऱ्यात डोकावले अन ती शाकंभरी पुन्हा अनुभवली एवढा तो जिवंत अनुभव माझ्या शिदोरीत आज पुन्हा सजला. तो असा की सर्व कार्यक्रम उरकुन थकल्या भागलेल्या त्या सर्व नऊवारीतील काकू मावशी आत्या कुंकवाच्या मळवटात भरलेल्या पण देवीच्या सेवेने तेजपुंज शाकंभरी रुपात दर्शन देऊन गेल्या ..हे ही नसे थोडके.
किती लिहू किती नाही...बालपण माझे संपत नाही.
सोबत आईचे काही भारुड करतानाचे फोटो पाठवत आहे.
शरद पुराणिक
170122 शाकंभरी पौर्णिमा
Comments