हा कुठला रे विधात्या न्याय ?? घेऊन गेलास हजारोंची माय 😢😢
हा कुठला रे विधात्या न्याय ??
घेऊन गेलास हजारोंची माय 😢😢
ती ना खेळली, बागडली तर सतत धडपडली
ऐन बालपणात बोहल्यावर ढकलली गेली
झिम्मा खेळण्याच्या वयात झोळ्या बांधू लागली
कुशीत झोपायचं आईच्या, ही तर सताड उघडी
असह्य यातनांचा सुरू झाला अघोरी खेळ
जसं दिवस मावळत येते भयाण कातरवेळ
पण ती ना डगमगली घाबरली तशीच निघाली
पदोपदी अपमान अन सतत नाकारली गेली
कदाचित तिचा पान्हा वेगळाच होता बनवला
एक ना दोन, हजारो कोकरांसाठी सजलेला
काटेरी जमीन अन उघड्या आकाशाची चादर
घर ना दार, असा उघड्यावर तिचा हा संसार
या वासरांच्या मायेनं सजवली तिची झोपडी
स्वतःच निराधार पण कोकरांचा आधार झाली
उपाशीपोटी राहून तान्ह्यांची भूक मिटवत गेली
अशी ही माय आज का बरं अशी परागंदा झाली
तिच्या मायेला भरती अशी जोरात आली की
तिच्या या पवित्र पात्रात ओहोटी नाहीच आली
निगरगट्ट ढोंगी जगात हिचं प्रेम कोरडं नव्हतं
ऐर गैर पात्र कुपात्र अनाथ सनाथ भेदभाव नाही
अडला तो हिनं उचलला जोडला वाढवला
ज्यांनी नाकारलं हेटाळलं होतं तीला पदोपदी
त्यांनीच मिरवला तोरा डोक्यावर नाचत
प्रत्येकाची वेळ असते कधी ना कधी
सुरकुत्या पडल्या गुडघे थकले चालून
माया तिची आटली नाही कधीही चुकून
आज मात्र गेली ती वाऱ्यावर सारं सोडून
शिवलेली गोधडी उधडून गेलं मायेचं पांघरूण
ज्यांनी फेकले रस्त्यावर तर नाकारले ही
भिऊन लपवलीही उधळून ही पापं पुण्य
ते जगत असतील उघड्या माथ्याने आज ही
पण नियती निष्ठुर गेली की हो हिलाच घेऊन
हा कुठला रे विधात्या न्याय ??
घेऊन गेलास हजारोंची माय 😢😢
शरद पुराणिक
050122
Comments