माझा औंगाबाद ऋणानुबंध अन सुखावणारे क्षण...

 माझा औंगाबाद ऋणानुबंध अन सुखावणारे क्षण...


या पूर्वी मी नोकरीनिमित्त विविध शहर आणि राज्यात भटकत भटकत अनंत अनुभव आणि त्याच्या गमती जमती एका लेख मालिकेत गुंफूल्या आहेत. आज ही आठवण झाली की वहितील झाकून ठेवलेले ते मोरपीस मी उघडुन पाहतो. 


परवाच काही प्रासंगिक कार्यास उपस्थित राहण्यासाठी निघालो. गाडी चालवताना ते आठवांचे मोरपीस सारखे पिंगा घालत होते. माणुसकी, आपलेपण आणि जात धर्म या पलीकडे जाऊन एका  रेशमी धाग्यात गोवलेले ऋणानुबंध अनुभवताना होणारा आनंद शब्दात साठवता येत नाही, तरीही ती अनुभूती द्यावी असं राहून राहून वाटलं आणि त्यासाठी हा प्रपंच. 


माझ्या प्रत्येक भेटीत मी यातील जसे जमतील तसे भेटीचे सोहळे घडवतो. वास्तविक ती यादी एवढी मोठी आहे की अशी एका लेखात समावणारी नाहीच.


आलिशान परफ्यूमस - हे आमचं हक्काचं दुकान. हे तुमच्या रस्त्यात पडत नाही, तिथे मुद्दाम जावं लागत.  रोशन गेट वरून शहागंज भागात जाताना डाव्या हाताला ही छोटीशी सुगंधी अत्तराची एक दुकान. गेली 25 वर्षांहून अधिक काळ मी जो काही भला बरा दरवळलो तो याच दुकानातून घेतलेल्या विविध अत्तराच्या फाया ...हो फाया चा तो जमाना गेला पण शब्द आठवला म्हणून वापरला. One man show नावाचं एक रोल ऑन इह वर्ष मी विकत घेतलं, हल्ली ते येत नाही, त्याची जागा इतर अनेक नावीन्यपूर्ण सुगंधानी घेतलीय.  यांची ओळख माझ्या डझनभर मेहुण्यामुळे झाली आणि याच नात्याने दुकानदार ही मला जिजा म्हणून संबोधतो. आपण गेलो की मोठ्या अदबीने तो ऊठुन उभा राहतो, चहा पाण्याचा आग्रह होतो. अंग भर सुगंधाचा पाऊस पडत राहतो. चार सहा महिन्याचा स्टॉक घेऊन आपण पैसे द्यायला गेलो की तो रक्कम सांगत नाही. प्रेमाने सांगतो हमारी दीदी से क्या लेंगे जीजा, जो देना है वो देदो, आपण दोन चार वेळा विचारायचं मग पैसे देऊन टाकायचे. सर्व झालं की तो दोन छोट्या छोट्या छान बाटल्या हातात ठेवतो, ये हमारी तरफ से रखलो, हे म्हणताना आणि देताना चा जो क्षण, भाव आहे मी त्या क्षणांचा भुकेला. आतल्याआत गहिवरतो तो व्यापक सुगंध घेऊन मी मार्गस्थ होतो, अगली बार जरूर आणा असं तो प्रेमानें म्हणत असतो.


मिन्हाज ऑप्टिकल्स - मीनहाज भाई. इथे पुन्हा आमच्या मेहुण्यांचा उल्लेख... त्यांच्यामुळे ओळख झाली. चष्मे, गॉगल नवीन किंवा जुनी दुरुस्ती असेल तर हे हक्काचं ठिकाण. परवा गाडीत जे गॉगल होते ते काही केल्या सापडले नाहीत, हा दोष आमच्या वेंधळेपणाचा ही कबुली देऊन पुढे सरकतो. मग त्वरित मिनहाज च्या दुकानात गेलो. तीच अदब,तेच प्रेम अन तसच स्वागत. नवरदेवाला सुट दाखवावा याच भावनेत तिथला कर्मचारी rayban, polarise असे विविध डब्बे उघडुन दाखवत होता, हा हा म्हणता डझनभर आवडलेले बाजूला ठेवले, अन आश्चर्य वाटेल मी तेवढे सर्व घेऊन आलो. पैसे देताना तेच वाक्य, तेच भाव तोच क्षण.  पैसे दिले की खरेदी कुठेही होतेच, पण ही आपुलकी आणि तो आनंद हे आम्हा मिळालेलं एक सुंदर वान जे मी आनंदाने स्वीकारतो. 


चालुन चालुन पाय थकलेले असतात, रस्त्याच्या एका कडेला शेकडो कचोऱ्या तळत घातलेल्या आणि दुसऱ्या बाजुला त्यांची तोंडातल पाणी गिळत वाट पाहणारी माझ्यासारखी खादाड माणसं. त्या चवदार खमंग वासाच्या दिशेने पावलं आपोआप तिकडे ओढून घेऊन जातात कचोरी, समोसा, मुंगभजी दोन दोन प्लेट खाल्ल्याशिवाय राहवत नाही ती जागा म्हणजे " गायत्री चाट भांडार," हे कुठल्याही औरंगाबादकराला सांगण्याची गरज नाही. ती तृप्ती घेऊन पुढे निघायचं. 

या विषयी अनेक आठवणी असंख्य औंगाबाद  करानी गिरवल्या आहेत तेंव्हा पुढे सरकतो.


समोरच गेली ३० वर्ष हून जास्त दिवस मैत्री असलेलं city shoes centre. त्याच नाव नेहेमी बदलत राहत पण गुलमंडी वर त्याचे दोन ते तीन दुकान आहेत... सलाम नमस्कार आदाब, खुशाली घेत पुढच्या वाटेने. मध्ये सुपारी हनुमान दर्शन ठरलेलं.


भोला चाट ची गाडी खुणावतेच पण पोटात जागा नसते, मग संध्यकाळी चा बेत भल्ला, दहिभल्ला पाणीपुरी शेवपुरी अस हादडायच, तो ही आस्थेनं चौकशी करतो अं आग्रहाने खाऊ घालतो. काही सच्चे शिवसैनिक त्यातला हा भोला चाटवाला. 


पण ही खादाडी अजून संपत नाही, दुसऱ्या दिवशी संधयाकाळीच पुन्हा पान दरिबा .. भोलेशंकर चाट वाले अप्पा.... हसतमुख व्यक्ती... तुम्ही इथली दहीपुरी नाही खाल्ली तर आयुष्याला अर्थ नाही, मग रगडा समोसा अन् चाट चे अनेक प्रकार.... अस्सल खवय्याची ही चाट पंढरी.... तोच स्नेह आपुलकी ओलावा....ही चटकदार नाती आयुष्याच्या थाळीत अशी काही सजतात की जणू एक शाही भोजन... समोर अप्पा हलवाई आणि त्यांचा पेढा घ्यायचा घरी गेल्यावर त्याची पोळी किंवा सहज हात मारण्यासाठी गोड म्हणून.  


आता उत्तम ची इम्रती, खैरे साहेबांच्या घरासमोर ची ती भज्जीची चव न्यारी ते ही तुम्हाला अनेक ठिकाणी वाचायला मिळेल....


माझा विषय आहे तो जीवापाड प्रेम करणाऱ्या या व्यावसायिक नात्यांचा. एक खरंतर नातेवाईक कसला भाऊच तो म्हणजे अतुल पुराणिक.... मालशेटवार ऑप्टिकल्स ... आधुनिक ढंगाने सजलेल्या नीराला बाजार मधली ही जागा म्हणजे अगदी दोन मिनिट का होईना जायचं, अतुल अतिशय आस्थेनं चौकशी करतो, आपण आलोच आहोत तर एखाद चष्मा घेऊ म्हणताच तो स्वतः डोळे तपासून त्याच्या आवडीच्या फ्रेम दाखवतो, आपल बजेट एकच असत तो दोन चार घ्यायला लावतो आर्थिक व्यवहार या विषयी तो अवाक्षर बोलत नाही सोबत एखाद छानसा गॉगल ही मिळतो...पण त्याच्या चेहेऱ्यावर चा आनंद मी दर वेळी टिपतो. आम्ही भाऊ भाऊ घरीही भेटूच शकतो पण मी अनेकदा त्याला इथेच भेटतो, आमच्या दोघांच्याही वेळापत्रकात ते पक्क बसत....आता बाकी नातेवाईकांना वाटेल फक्त अतुलच का तर तो नातेवाईक तर आहेच पण आमचं अस एक वेगळ नातं आम्ही जपतो म्हणून हा उल्लेख....


सिद्धार्थराव टेलर, फॅशन जंगल, साजन सरिता, भावे आणि कंपनी, मॅचवेल, अशी असंख्य नाती गोंजरण्यासाठी पुढच्या लेखाची वाट पाहावी लागेल....


नाट्यक्षेत्रात आणि सिनेमात काम करणाऱ्या, कलावंत, लेखक अशा अनेक पिढ्या ज्याच्या टपरीच्या बाकावर घडल्या अशी दहिवाल च ते पान मंदिर हा एक Ph.D. चा स्वतंत्र असा प्रबंध होऊ शकतो त्यावर ही एक synposys लिहायचा मानस आहेच....


या व्यतिरिक्त असंख्य मित्र त्यांचं प्रेम, आग्रह हे अनेकवेळा ठरवून ही या झोळीत भरता येत नाही .. याचं शल्य आहेच त्या सर्वांची माफी मागतो....फिर मिलेंगे रे कभी तो... हाय काय अन् नाय काय... यादी खूप मोठी आहे त्यात तुमचं नाव आहे अस समजून चला.... भेटू तारा पान सेंटर वर जीभेचा रंगा सोबत आयुष्याचे ही रंग बदलण्यासाठी ... गोपाल टी च्य्या निशाणी मिटलेल्या चौकात....


शरद पुराणिक

फिर भी दिल है औरंगाबादी

Comments

Popular posts from this blog

ओढ लावती अशी जीवाला गावाकडची होळी

गौरी गणपती