नित्य आचरणात "अग्निहोत्र"

 💥🔥🌈🔥💥


नित्य आचरणात "अग्निहोत्र"


ॐ अग्निमीले पुरोहितं यज्ञस्य देवमृत्विजम्। होतारं रत्नधातमम्।।

अग्निहोत्र हा दैनंदिन केला जाणारा एक यज्ञ आहे. सूर्योदय व सूर्यास्तावेळी घरामधील वातावरण पवित्र करण्यासाठी अग्निहोत्र यज्ञ केला जातो.


हिंदू धर्मातल्या विविध परंपरांपैकी एक म्हणजे अग्निहोत्र. अग्नी हा पंचमहाभूतांपैकी एक. अग्नीला अत्यंत पवित्र मानलं जातं. अग्निहोत्राच्या माध्यमातून सूर्य आणि चंद्राद्वारे प्राप्त होणार्‍या उच्च शक्तीयुक्त ब्रह्मांड ऊर्जेला योग्य पद्धतीने ग्रहण करता येऊ शकतं. अग्निहोत्राशी संबंधित बरंच संशोधनही करण्यात आलं आहे. अग्निहोत्र सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी करायला हवं.


अग्निहोत्र हा मानवी शरीरासाठी, उत्तम आयुरारोग्य आणि परिपूर्ण जीवनशैली साठी एक रामबाण व्रत, उपाय, पद्धत आहे. त्याचं आचरण आपल्या दिनचर्येत नित्य, प्रातः, आणि सायंकाळी करावे. दीर्घायुष्य आणि निरोगी सौष्ठव या साठी हे अत्यंत लाभप्रद असे आचरण आहे. सृष्टीची जी पाच तत्व आहेत - अग्नी, जल, वायू, पृथ्वी, आकाश - या सर्वां मध्ये अग्नीचा उल्लेख प्रथम आहे कारण तो श्रेष्ठ आहे.  तसे अग्निहोत्र आचरण आणि पद्धती याचे विविध प्रकार आहेत जी आदरणीय अहिताग्नि श्री सुधाकर शास्त्रीजी यांनी गेल्या वर्षीच्या दैनंदिनी मध्ये विस्तृतपणे विशद केली आहेत. इथे नित्य अग्निहोत्र या विषयी सविस्तर माहिती, त्याचा प्रसार व्हावा या उद्देशाने मांडत आहोत. 


नित्यकर्म म्हणजे काय : जे केले असता ज्याचे फल चित्तशुद्धीहून अधिक मिळत नाही; पण न केल्याने मात्र दोष लागतो, ते नित्यकर्म होय, उदा. ब्राह्मण व्यक्तीसाठी संध्या करणे आणि गायत्री मंत्राचा जप करणे, ही नित्यकर्मे आहेत. नित्यकर्मांची काही उदाहरणे. तसेच काही विधी ही आहेत जे नित्य करावेत, अग्निहोत्र, वैश्वदेव, नैमित्तिक यज्ञ हे देवयज्ञ या संस्काराचे भाग आहेत. 


अग्निहोत्र करण्याच्या वेळा शास्त्रोक्त आणि वैज्ञानिक अशा दोनीही बाजूने वैचारिक मंथन करूनच ठरवल्या आहेत त्या म्हणजे सूर्योदय आणि सूर्यास्त.  ही एक साधी, सरळ आणि अगदी सोप्पी पध्दत आहे ती. पुर्व मुखी बसून सकाळी आणि संध्याकाळी करावे.


या दिव्य नित्यकर्माचे साहित्य, कृती आणि फायदे खरं तर फायदे तसे एका लेखात किंवा शब्दात कथित करण्यापलीकडचे आहेत. काही उदाहरणं खाली क्रमाने मांडली आहेत. 


अग्निहोत्र हा एक सोपा पण परिणामकारक विधी आहे आणि घरी दररोज अगदी दररोज सहज करता येतो. कोणीही अग्निहोत्र ​​करू शकतो, तर सर्वात महत्त्वाचा विचार म्हणजे अग्निहोत्राची वेळ. हे सर्वोत्तम परिणामासाठी सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी केले पाहिजे. सूर्योदय व सूर्यास्ताच्या अचूक वेळेबद्दल जाणून घेण्यासाठी त्या विशिष्ट दिवसाच्या पंचांग (हिंदू कॅलेंडर) मध्ये जाणे आणि सर्व तयारी आधीपासूनच ठेवणे आवश्यक आहे.


अग्निहोत्रासाठी आवश्यक वस्तू:


गाईच्या शेणाचे गोवऱ्या, शुभा

लहान आकाराचे तांब्याचे ( पिरामिड आकाराचे) यज्ञकुंड

शुद्ध गाईचे तूप 

दोन चिमूटभर तांदूळ

अग्नि प्रज्वलित करण्यासाठी आगपेटी किंवा तत्सम साहित्य

कापूर


अग्निहोत्र कसे करावे ?


वाळलेल्या शेणाच्या गोवरीचा एक लहान चौरस तुकडा घ्या आणि यज्ञकुंडाच्या  तळाशी ठेवा.

 दोन तुकडे आडवे आणि दोन तुकडे अनुलंब ठेवा जेणेकरुन तांबे भांड्याच्या मध्यभागी पोकळीची जागा तयार होईल.

आणखी एक तुकडा घ्या आणि त्यामध्ये गाय तूप लावा.

योग्य वेळी आगीचे प्रज्वलन करा  सूर्योदय / सूर्यास्ताच्या पाच मिनिटांपूर्वी)

डाव्या हातात तांदळाचे काही धान्य घ्या आणि तांदूळात शुद्ध तुपाचे काही थेंब घाला आणि चांगले मिसळा.


 खालील मंत्राने सकाळी 

ॐ सुर्याय स्वाहा, सुर्याय इदम न मम

ॐ प्रजापतये स्वाहा, प्रजापतये इदम न मम


आणि सायंकाळी

ॐ अग्नये स्वाहा, अग्नये इदम न मम

ॐ प्रजापतये स्वाहा, प्रजापतये इदम न मम


अशा दोन दोन आहुत्या द्यायच्या. 

या अग्नितून जो धुर  निघतो तो आजूबाजूचा परिसर शुद्ध करतो... तो धूर सरळ  (ozone) मध्ये मिसळतो. म्हणजे आपण जो प्राणवायु हवेतून घेतो त्याचं शुद्धीकरण किंवा तो अधिकाधिक तिव्र, स्वछ, शुद्ध करण्याची शक्ती या आहुती मध्ये आहे.    याला धार्मिक क्रिया असं म्हणून चालणार नाही तर ती एक वैज्ञानिक प्रक्रिया आहे. खरं तर मागच्या माझ्या काही लेखामध्ये मी या वर जे वरचेवर संशोधन होत आहेत ज्यात ते अगदी वैज्ञानिक पद्धतींनी सिद्ध करून दाखवले आहे.


अग्निहोत्र करण्याचे विविधरूपी (शारीरिक, मानसिक आणि पर्यावरण साठी) फायदे :

अग्निहोत्र हवा आणि परिसर शुद्ध करण्यासाठी मदत करते. यात वापरलेला यज्ञकुंड (pyramid shape copper pot) नकारात्मक आयन निर्माण करतो आणि विविध घातक कणांची हवा साफ करण्यास मदत करतो. शिवाय, शेण आणि शुद्ध तूप नैसर्गिक जंतुनाशक म्हणून काम करते आणि हवेमध्ये आणि आसपासच्या भागात जीव जंतु आणि विषाक्तता कमी करते.


 अग्निहोत्र केवळ हवेतील रोगजनक जीवाणू आणि इतर प्रदूषन कमी करण्यातच मदत करत नाही तर आजूबाजूच्या परिसरातील जलस्रोतांचे शुद्धीकरण देखील करते. अग्निहोत्र होम निरोगी हवा आणि शुद्ध पिण्याचे पाणी याची हमी देते - यामुळे चांगल्या आरोग्यासाठी एक मजबूत आधार मिळतो.


अग्निहोत्र मंत्राचा जप विशेष स्पंदने सक्रिय करते. असे म्हटले जाते की मानवी जीवनाच्या आणि आजूबाजूच्या प्रत्येक बाबीवर मंत्रांचा सकारात्मक प्रभाव पडतो.


होमामध्ये मंत्राचा जप केल्याने मन शांत होते आणि मानसिक तणाव कमी होतो.


 अग्निहोत्राने तयार केलेले चुंबकीय क्षेत्र नकारात्मक उर्जा तटस्थ करते आणि घरात ‘प्राण’ आणि सकारात्मक उर्जा तीव्र करते. आपल्या प्रगतीतील अडथळे दूर करण्यात देखील हे चांगले मानले जाते


 होमा द्वारे निर्मित धूर हवेत हानिकारक किरणांना बांधतो आणि किरणोत्सर्गी प्रभावाला तटस्थ करतो.

 संपूर्ण होम रक्त शुद्ध करते आणि रक्ताभिसरण प्रणालीला फायदा करते.

होमा दरम्यान जप आणि एकाग्रता मेंदूच्या पेशींचे नूतनीकरण देखील करते

होमामध्ये नियमितपणे सहभाग घेतल्यास ठराविक कालावधीत त्वचेचे पुनरुज्जीवन करण्यास देखील मदत होते

होमा नंतर शिल्लक राहिलेली राख झाडांना ही देता येते आणि झाडाचे पोषण करण्यास मदत करते. 


स्वच्छ आणि निरोगी वातावरण चांगले आरोग्य सुनिश्चित करण्यासाठी एक प्रमुख गरज आहे. अशाप्रकारे, अग्निहोत्रासारख्या पुरातन पद्धतींद्वारे आपण आपल्या घरापासून सुरुवात करुन हवा व पाणी स्वच्छ करून आपण पर्यावरणीय प्रदूषणामुळे उद्भवलेल्या काही महान आरोग्यासंबंधी धोका कमी करू किंवा कमीतकमी रोखू शकतो.


शेतीसाठी होणारे फायदे : 

काही लोकांनी शेत जमिनीत ही हा संस्कार करून पाहिला आणि त्यात अतिशय आश्चर्य जनक फायदे झाले. जमिनीचा कस उत्तम झाला, पिकांच नुकसान ही झालं नाही आणि उत्तम प्रतीचे धान्य, फळं, भाज्या निर्मित केल्या गेल्या. 


अग्निहोत्र केलेल्या क्षेत्रातील पोषक वायूंचे प्रमाण परिणामकारक रितीने वाढले. (इथिलीन ऑक्साईड, प्रॉपिलीन ऑक्साईड, फॉर्मॅल्डिहाईड, ब्यूटाप्रोपियोलॅक्टोन) त्या भागातील पॅथोजेनिक बॅक्टेरियाजचे प्रमाण ९६% ने घटले व हवा शुद्ध होण्यास मदत झाली. अग्नीत आहुती घातल्यावर गायीच्या तुपामुळे ऍसिटिलीन तयार होऊन त्यामुळे प्रदूषित हवा शुद्ध होण्यास मदत होते.


पिकाची गुणवत्ता व उत्पादनात वाढ.

 कृषी रसायनांच्या फवारणीच्या खर्चात घट.

चव, रंग, पोत व पोषणमूल्यांच्या दृष्टीने सरस पीक.

अधिक टिकाऊ व निर्यातीस अनुकूल उत्पादन.

कमी काळात जास्त पीक. एका वर्षात अधिक वेळा पीक घेऊ शकता.

अग्निहोत्रात वापरल्या जाणाऱ्या तुपाची सूक्ष्म स्तरावर प्रक्रिया होऊन त्यामुळे वनस्पतींना हरितद्रव्य उत्पन्न करण्यास मदत मिळते.

 मधमाश्या अग्निहोत्र केलेल्या क्षेत्रातील पिकाकडे, झाडांकडे अधिक प्रमाणात आकृष्ट होताना दिसून आले आहे. त्यामुळे परागसिंचनास मदत होऊन उत्पादन वाढण्यास मदत होते.

अग्निहोत्रातील राख घन, द्राव, जैव-रसायनांच्या रूपात किंवा बायोसोल सारख्या स्वरूपात शेतात वापरल्यास पिकाला अधिक पोषण देण्यास, तसेच कीड व रोगांपासून त्यांचा बचाव करण्यास मदत करते असेही दिसून आले आहे.


वैश्वदेव


पुर्वी आपल्या सर्व घरांमध्ये वैश्वदेव हा एक प्रकार होता,  ही एक प्रकारची अग्निसेवा आहे. ज्यात अग्निपुजन आणि शुचिर्भूत होऊन ताज्या स्वयंपाकातील शिजवलेला भाताचा एक  छोटासा भाग किंवा तांदुळ घेऊन तो यज्ञ संपन्न होतो. एक भाग अग्निकुंडामध्ये आहुती देऊन विश्वकर्त्या परमेश्वराला अर्पण करावा.याप्रकारे, हे पंचयज्ञ केल्यानंतर राहिलेले अन्न प्रसाद म्हणून ग्रहण करावे.अन्न शिजवून झाल्यानंतर पंचयज्ञ झाल्याशिवाय अन्नाचे कधीही सेवन करू नये.म्हणजे तो उपभोग होत नाही, तर श्रद्धाभक्तियुक्त अंतःकरणाने ग्रहण केल्यामुळे तो प्रसाद होतो.ती प्रसादबुद्धि चित्तशुद्धीचे साधन होते.म्हणजेच प्रमाद, हिंसा, दुसऱ्याला अपमानात्मक बोलून यातना देणे वगैरेदि पापांच्यापासून तो मुक्त होवून सदाचारी, सत्शील होतो.मनशुद्ध झाल्यामुळे तो सत्त्वगुणप्रधान होतो.

गृहस्थाश्रमामध्ये कळत-नकळत दैनंदिन जीवनात पाच प्रकारची पापे होत असतात.

१) कण्डनं– कांडणे, 

२) पेषणी – दळणे, 

३) चुल्ली – चूल पेटविणे,

 ४) उदकुम्भी – पाणी भरून ठेवणे , 

५) मार्जनी – झाडलोट वगैरेदि.

वर सांगितलेल्या नित्य क्रिया आणि यातून होणाऱ्या ‘पंचसूना’ जीवहिंसेचे प्रायश्चित्त म्हणून वैश्वदेव करणे. नित्य उपजीविका करत असतांना मानवाच्या हातून नकळत होणारी जीवहिंसा शास्त्रात ‘पंचसूना’ या नावाने ओळखली जाते.

 वैश्वदेवः प्रकर्तव्यः पञ्चसूनापनुत्तये ।

त्याचं प्रायश्चित्त म्हणून वैश्वदेव यज्ञ नित्य केला पाहिजे.

 प्रथम अग्नीपूजन होऊन हा विधी सुरू होतो : 


विश्वानि नो इति तिस्त्रणामात्रैयो वसुश्रुतो$ग्निस्त्रिष्टुप । द्वयोरर्चने$न्त्याया उपस्थाने विनियोगः ।।

ओम् विश्वानि नो दुर्गहा जातवेदः ।।

ओम् सिंन्धुं न नावा दुरिताति पर्षि ।।

ओम् अग्ने अत्रिवन्नमसा गृणानः।।

ओम् अस्माकं बोध्यविता तनूनाम् ।।

ओम् यस्त्वा ह्रदा कीरिणा मन्यमानः ।।

ओम् अमर्त्य मर्त्यो जोहविमी ।।

ओम् जातवेदा यशो अस्मासु देहि ।।

ओम् प्रजाभिरग्ने अमृतत्वमश्याम् ।।

ओम् यस्मै त्वं सुकृते जातवेदः ओम् लोकमग्ने कृणवः स्योनम् । अश्विनं स पुत्रिणं वीरवन्तं गोमन्तं रयिं नशते स्वस्ति।।


वरील सर्व मंत्र हे अग्नीच्या स्तुतीप्रीत्यर्थ म्हंटल्या जातात.

हे अग्ने आम्हाला भोगण्यास कठीण संकटातून नावाडी नाव समुद्राच्या पार नेतो त्याप्रमाणे पार पाड!

हे अग्ने !  तू आमच्या शरीराचा रक्षक आहेस,  मर्त्य आम्ही किंवा मी  आणि तू अमर तुला स्तुति करून निमंत्रित करतो! आम्हाला यश प्राप्त होऊ दे ! आमच्या प्रजेच्या द्वारा आम्ही अमरपदाला प्राप्त व्हावे! तू ज्या सुकर्म करणाऱ्या यजमानाला सुखी करतोस त्याला पुष्कळ घोडे ,पुत्र ,सामर्थ्य, गाई बैल यानी युक्त असे धन प्राप्त होवो!


अशी अग्नीची स्तुती करून यानंतर शिजलेले अन्न भात एका पात्रावर उकरुन घेऊन ते पात्र अग्नीवर (ज्या अग्नीवर स्वयंपाक केला त्याच अग्नीवर) तापवून घ्यावे. नंतर ते प्रोक्षण करून कालवून अग्नीच्या पश्चिमेला ठेवावे.त्या भाताचे तीन भाग करून तूप घालून डावा हात छातीवर ठेऊन उजव्या हाताने प्रथम उजव्या भागातील अन्न घेऊन (अगदी छोटे छोटे भाग).ओंकार न म्हणता पुढे दिलेले मंत्र स्वाहा म्हणून  आहुती देतात.

 सूर्याय स्वाहा । -प्रजापतये स्वाहा ।-अग्नये स्वाहा। प्रजापतये स्वाहा ।-सोमाय वनस्पतये स्वाहा। -अग्नीषोमाभ्यां स्वाहा। 

इंद्राग्निभ्यां स्वाहा ।-द्यावापृथिवीभ्यां स्वाहा । - धन्वन्तरये स्वाहा । इन्द्राय स्वाहा । विश्वेभ्यो देवेभ्यः स्वाहा । ब्रह्मणे स्वाहा । भूः स्वाहा ।भुवः स्वाहा ।-स्वः स्वाहा । भूर्भुवः स्वाहा ।


अशी ही दिव्य नित्यकर्म आपण काळाच्या ओघात मागे टाकत गेलो, त्या सर्वांचा प्रसार व्हावा, आपण सर्वांनी ते आचरणात आणुन दिव्य अनुभूतीचा साक्षात्कार घ्यावा. 


माझे गुरू आदरणीय, वंदनीय, पूजनीय प्रातःस्मरनिय, बहू सोमयाजी, यज्ञ मार्तंड श्री यज्ञेश्वर सेलुकर महाराज हे त्यांचे 100 वर्ष परंपरा असलेले  अग्निहोत्र हे व्रत करत त्या सोबत  श्री सूक्त हवन हे ही नित्य आचरणात आणण्यासाठी अहोरात्र प्रयत्नशील आहेत.  या विषयीची अधिक माहिती पुढील भागात किंवा यज्ञभूमी गंगाखेड येथे उपलब्ध होईल. किंवा आमच्या फेसबुक पेज वर ही या विषयीचे फोटो इत्यादी उपलब्ध आहे. 


यज्ञ नारायण भगवान की जय 


शरद पुराणिक

Comments

Popular posts from this blog

ओढ लावती अशी जीवाला गावाकडची होळी

गौरी गणपती