एक अनोखे आणि कुतूहलात्मक गौरी पुजन

 एक अनोखे आणि कुतूहलात्मक गौरी पुजन


खरं तर हल्ली या सोशल मीडियावर गौरी या विषयी इतकं काही लिहून झालंय की विचारूच नका. श्रध्दा, नाती गोती, कौटुंबिक सोहळे, या निमित्ताने आमच्या भगिनींची होणारी धावपळ, देखावे, गौरींची विविध रूपे, दर कोस दर मजल तिच्या साजरे करण्याच्या पद्धती. माझ्या हाती आलेले सर्व लेख मी आवर्जून वाचतो अन या सणाच्या निमित्ताने होणाऱ्या अनेक गंमती जमती, प्रसंग आणि सश्रद्ध भावनेतून केल्या गेलेल्या सणाची महती आणि त्याचं प्रासादिक फळ हे सर्व अनुभवायला मिळतं.  काही लेख वाचताना तर मला असं ही वाटून गेलंय की ही जणु काही आपलीच कहाणी आहे की काय.  


पण आज मी एका आगळ्या वेगळ्या गौरीपूजनाविषयी लिहिणार आहे.  आमचे एक स्नेही, मित्र आणि सर्वांचे लाडके श्री मुकुंद गोस्वामी आणि सौ. नभा मुकुंद गोस्वामी यांच्या घरच्या गौरीपूजनाविषयी.  गेल्या वर्षी एक सुंदर गौरी चा फोटो मी मुकुंद च्या स्टेटस ला पाहिला अन आश्चर्यकारक रित्या त्याला विचारले अरे हा फोटो कसला, तर तो अगदी सहज म्हणाला ही आमची लक्ष्मी / गौरी आणि हे आमचे पुजन. त्या फोटोविषयी थोडेसे - आकर्षक लाल रंगाच्या साडीत एक लक्ष्मीस्वरूप, कमळाच्या भल्या मोठ्या फुलावर विराजमान आहे, समोर तिच्या आवडीच्या पदार्थांचे नैवेद्य रुपात एक ताट सजलेले आहे , आणि प्रसन्न हसतमुख मुद्रेने ती लक्ष्मी "तथास्तु" म्हणुन आशिर्वाद देत आहे हे मुद्रभाव. चौकशी अंती समजलं की ती लक्ष्मी दुसरी कोणी नसुन आमच्या मुकुंदाची सुनबाई आहे, सौ कीर्ती वल्लभ गोस्वामी. मुळातच अतिशय प्रेमळ, लाघवी आणि सर्वांशी हसतमुख राहून असंख्य नाती आणि माणसं जोडणाऱ्या मुकुंदाविषयी "अभिमान" अजून उंचावला. सोबत त्या पूजेचा फोटो जोडत आहे. 


आयुष्यभर अत्यंत इमाने इतबारे योगेश्वरी महाविद्यालयात कार्यालयीन अधिकारी हुद्द्यावर नोकरी करत, वर सांगितल्या प्रमाणे सतत मानस जोडण्याचा छंद, निरपेक्ष व्यवहार अशी हसतखेळत नोकरी करत तिथेच सेवानिवृत्त झालेला मुकुंद दादा आज एक यशस्वी सेवानिवृत्त आयुष्य जगत आहे.खरं तर अंबाजोगाई च्या देवघर संस्थानातल्या वंशज म्हणून तसा प्रचंड मोठा कौटुंबिक वारसा आहे. त्यातील धर्म, कर्मकांड, निष्ठा, सेवा एकीकडे, एका बाजूला नोकरी आणि आता स्वतःच्या मुलाच्या आणि मुलीच्या आयुष्यात ही एक "मजबुत" मानसिक , शारीरिक सर्वतोपरी आधार असा जो समन्वय साधून तो जगतो हे अक्षरशः हेवा वाटावा असंच आहे... पण इथेच काजळाचा "ठिपका" लावतो. 


तर त्याच्या घरी गौरी म्हणुन आपल्याच सुनेची विधिवत पुजा करून त्या गृहलक्ष्मी चा केलेला आदर सन्मान पाहुन त्या विषयी लिहावं आणि ते लोकांपर्यंत पोचवावं हा एकमेव उद्देश आहे.  फ़क्त सूनच नाही तर नातीला ही त्याच आत्मीयतेने आणि लाडाने एक मित्र म्हणून आजोबाची जबाबदारी समर्थ पणे पेलतो तो वेगळा विषय. 


पण आजच्या काळात एक तर सण वार न करणाऱ्या, तर काही अत्यंत आवडीने करत त्यात तल्लीन होऊन अप्रुप वाटावं अशा, तर काही "हिला उगाच जोर" म्हणून हिनवणाऱ्या, तर आमच्या कडे तर आम्ही या सर्व प्रथा कधीच बंद केल्यात अशा अनंत अडवळणाच्या सोयीस्कर वाटा काढणाऱ्या काही जणी.  थोतांड, अंधश्रद्धा हे तर वेगळेच विषय आहेत. तर कुठे खुर्चीवर, सोफ्यावर बसून फ़क्त ऑर्डर सोडणाऱ्या आणि आमच्या काळी बाई असं अन तसं असे काही खरे तर काही खोटे दाखले देणाऱ्या, काही ठिकाणी कंबर कसून एकत्र आवडीने सण वार करणार, काही ठिकाणी अगदी ऐन सणवार आले की तब्येत बिघडणाऱ्या आणि एक हक्काचं अस्त्र वापरणाऱ्या, तर कुठे सुन राब राबून अक्खा सण साजरा करत असताना सतत "लेकीचं"(खरं की खोटं - ते देव जाणे)  उदाहरण देऊन तिच्या कष्टाचं चीज वितळवणाऱ्या,  तर चविवरून उगाच चर्चा करुन केलेल्या पदार्थांची चव घालवणाऱ्या ( यात ज्यांनी आयुष्यात काहीच केलेलं नाही त्यांची संख्येने जास्त) ...तर काही आवडीने केलेले पदार्थ FB वर आणि स्टेटस वर टाकून तो आनंद वाटणाऱ्या, तर काही ठिकाणी सण वार हे हक्काचं व्यासपीठ कुरापती साठी आहे असा "गैरसमज" असणाऱ्या, तर कुठे देश विदेश, राज्य पर राज्य येथुन येऊन चार दिवस मनसोक्त आनंद लुटून तो एका कोपऱ्यात गच्च भरुन घेतात ...तर काही फराळाचे उरलेले पदार्थ ज्याला त्यांनीच नाव ठेवले ते आनंदाने आपल्या पिशवीत भरणाऱ्या..... या जगात मुकुंद आणि सौ वहिनी यांचं कौतुक वाटतंय की त्यांनी ज्या हौसेने आणि आनंदाने गृहलक्ष्मी चा सन्मान केला, तीच आपली लक्ष्मी मानुन तिची मनोभावे पुजा केलीत आणि एक वेगळा Trend set केलात त्या साठी आपले विशेष कौतुक ....अभिनंदन ...आणि त्यांची ती भावना दृढ करण्यासाठी सून आणि ल्योक महणून वल्लभ आणि सौ किर्तीचेही अभिनंदन ...नांदा सौख्य भरे !! 


शरद पुराणिक

070922



Comments

Popular posts from this blog

ओढ लावती अशी जीवाला गावाकडची होळी

गौरी गणपती