माझी लुटुपटू ची नाट्य चळवळ, भाग 2 मी मागे माझ्या नाट्य प्रवासाविषयी लिहिले होते त्याचा हा दुसरा भाग. काल जून्या फोटो मध्ये एक फोटो दृष्टीस पडला आणि मी थेट त्या कार्यक्रमात पोचलो. सोबत फोटो जोडत आहेच. आम्ही म्हणजे मी, प्रशांत कुलकर्णी, भगतसिंग देशमुख, नितीन जोशी, विवेक गंगणे, बाळू मुकादम, श्रीपाद कुलकर्णी, आनंद कऱ्हाडे आणि लेखक दासू वैद्य आणि संजय कुलकर्णी-सुगावकर सोबत (आणि लिहिण्याचा संदर्भ आणि काशीनाथ घाणेकर सोबत जोडू नये) इतर अनेक असा आमचा एक समुह होता. खरं तर मी सोडला तर हे सर्व विज्ञान शाखेचे विद्यार्थी होते. पण माहीत नाही कशी पण आमची चांगली भट्टी जमली. तसे हे सर्व आमच्या बाळासाहेबांचे वर्गमित्र, पण दोस्त आमचे. या मैत्री चा ते दुवा होते. युवक महोत्सव हा एक मुख्य धागा होता ज्या मुळे मी यांच्यात रमलो. इतकं की मी आमच्या महाविद्यालयाच्या ऐवजी यांच्यातच असायचो, घुसायचो म्हणा हवं तर. सुधीर वैद्य, प्रकाश प्रयाग सर हे ही जणू माझेच HOD आहेत असं समजून एकरूप होतो त्यांच्यात. युवक महोत्सव ही एक महाविद्यालयीन जीवनात मिळालेली आशीर्वाद रुपी देणगी, जिथुन तुमच्या आतला कलाकाराला साद जाते, तारुण्याच्या भरात ती नशा औरच, इथे एकदा तुम्ही झिंगला की झालं. युवक महोत्सवाच्या अनंत आठवणी आहेत, एक गठ्ठा बक्षिसे जिंकायची, अंबाजोगाई औरंगाबाद अशी शर्यत असायची. यातच आमचा आपला असा एक हौशी समूह झाला. युवक महोत्सवातील एकांकिका इतकी गाजली की तिच्या प्रयोगाची मागणी येऊ लागली. "आम्हाला बांधायचंय मंदिर" अशी दासू लिखित ती एकांकिका होती. दरम्यान बीडला एकांकिका स्पर्धेत आम्ही ती सादर करण्यासाठी निघालो तिथल्या आणि त्या अनुषंगाने इतर गमती पण सांगणार आहे. त्या काळी ST चा प्रवास. संध्याकाळी प्रयोग होता, आम्ही सकाळी लाल गाडीत निघालो. कुठल्याही प्रकारची विशेष तयारी नाही, फार नाटकं नाही अगदी आपलं काही सरकारी काम करून संध्याकाळी परत यावं एवढीच ती तयारी. प्रायोगिक असल्याने नेपथ्य ही काही नव्हतं. प्रवासात टीवल्या बावल्या, खोड्या, असं होतं बीड आलं. चालतच आम्ही नाट्यमंदिर वर पोचलो. प्रयोग झाला, प्रचंड टाळ्या शिट्ट्या आणि हसणं अशी दाद घेत घेत एकांकिका पुढे जात होती. नेहेमी प्रमाणे संजू ने त्याची भुमिका बहारदार सादर करून प्रेक्षकांची मनं जिंकली होतीच. तांत्रिक बाबी नितीन जोशी आणि रंगमंच व्यवस्था, नेपथ्य आणि बारकावे हेरून ते व्यवस्थित करणारा प्रशांत. असं ते रसायन फार मिळून आलं होतं. माझी छोटी भूमिका होती त्यामुळे विंगेतून दोनीही म्हणजे रंगमंच आणि प्रेक्षक मी अनुभवत होतो. अतिशय थाटात प्रयोग झाला. आम्हाला लगेच परतायचं होतं. पण आमचे मित्र भगतसिंग एकदम संचारले आणि निळू फुले, श्रीराम लागु, ते आंबेजोगाईतील अनेक प्रतिष्ठित व्यक्ती नि त्यांना पछाडलं. मी मुद्दाम नावं घेणार नाही. त्या सर्व व्यक्ती रेखा तो एक एक करून जगत होता. दरम्यान आमची आवरा आवर झाली आणि निघण्यासाठी मुख्य प्रवेशद्वार जवळ आलो. पण यांचा संचार अजून उतरत नव्हता, हे अर्थात फक्त विनोदापोटी चालू होतं, वेगळा अर्थ घेऊ नये. एक फर ची टोपी घालुन ती त्या त्या व्यक्तीच्या लकबी सारखी फिरत होती. जरा वेळ हसण्यावारी नेऊन आम्ही थांबलो, पण हे सुसाट निघाले होते. त्या काळी जर चला हवा येऊ द्या असतं तर 4 त 5 एपीसोड नक्की झाले असते, एवढं ते बाहेर निघत होतं. संचार संपला आणि आम्ही थेट ST स्टँड गाठले. रात्रीचे 10 वाजले असतील. औरंगाबाद वरून लातुर ला जाणाऱ्या त्या गाडीत आम्ही बसलो आणि पुन्हा एका भन्नाट प्रवासाला सुरुवात झाली. गाडी भरलेली होती. भगतसिंग ने कंडक्टर ला विनंती केली आणि त्यांची गळ्यातली पिशवी, तिकिटाची पेटी, कानात पेन घेऊन पूर्ण बस भर ते स्वतः कंडक्टर म्हणून वावरले. त्यात आम्ही सर्व त्याला साथ देऊ लागलो आणि अख्खी गाडी हास्याने खळखळली. बीड अंबाजोगाई प्रवासात "मस्साजोग" एक गाव जिथे थांबल्याशिवय तो प्रवास पूर्ण होत नाही. गरमागरम पोहे, चिवडा आणि चहा हे आवर्जून झालेच पाहिजे. रात्रीचे 11.30 होऊन गेले होते पण आम्ही त्यावर यथेच्च ताव मारून निघालो. दरम्यान आता मूळ कंडक्टर होते. गाडी जरा संथ झाली की आम्ही एकमेकाच्या डोक्यावर टपल्या मारणं सुरू केलं. तसे आम्ही 15 ते 20 जण होतो आणि पुढे मागे रांगेत बसलो होतो. अंधारात कोण कोणाला मारत होत याचा पत्ता लागत नव्हता, अशी धमाल करत तो प्रवास संपला. आता गंमत आहे ती आमच्या रोजच्या बैठकी, तालमी इत्यादी. ती पुढच्या अंकात, नक्की. थांबतो..... शरद पुराणिक


Comments

Popular posts from this blog

How do I say a Good Bye once for all Harish Sir !!

ओढ लावती अशी जीवाला गावाकडची होळी